#आईच्या आठवणी
आठवणी एवढ्या सुंदर आणि सुगंधी असू शकतात हे मला आज इतक्या वर्षांनी उमगले. १९६७ ते १९७४ चा तो कालखंड एकेक गंमती जमतीने भरलेला होता. सुरवातीला घोटकरांच्या घरात मग आतेमामा आत्याला घेऊन गाणगापूरला गेले तेव्हा लाटेवाड्यातील त्यांचे घर ते गाणगापूरहून परत येईपर्यंत रहायले दिले होते. पुढील खोलीत त्यांचेच देवघर होते. आई सकाळ संध्याकाळ तेथे दिवा लावायची. दत्ताची नृसिंह सरस्वती यांची मोठी तसबीर व पुढे चंदनी पादुका मोठा शंख आणि घंटी असा कोपर्यात देव्हारा होता.
याखेरीज एकमुखी दत्ताच्या किंवा देवमामलेदार यशवंतराव यांच्या यात्रेत मातीची रंगीत दत्ताची मूर्ती आई घेऊन द्यायची तिची खोटी खोटी पुजा मी वेगळ्याच खणात खिडकीजवळ मांडायचो. ते वेगळेच. सगळे घरच दत्तभक्तीत होते.
आईने मधल्या अंधारया खोलीत वर उंचावरल्या कोनाड्यात आपले देव ठेवलेले होते. तिथे ती सकाळ संध्याकाळ तुपाची निरंजनी लावायची. मला देव काही दिसायचे नाही पण निरंजनाचा उजेड तेवढा दिसायचा. आई दोन्हीकडे हात जोडायला सांगायची. सायंकाळी ती नेहमी कुठलेतरी गाणे गुणगुणत रहायची.
पुढील देवघर आणि मधली अंधारी खोली यांच्यात एक जिना होता. त्या पायर्यांवरुन मी खेळून आलो की दबकत दबकत वर येऊन बाबा आले आहे की नाही याचा अंदाज घ्यायचो. बाबांचा बराच वेळ आवाज आला नाही की तसाच खाली उतरुन पुन्हा अंगणातील गोल दगडावर बसून सायंकाळी बाबांची वाट पहात वर आकाशाकडे नजर लावून बसत असत. पावसाळ्यात आकाशाचे बदलते रंग पाहता पाहता त्या रंगात मी हरवून जायचो. ढगांवर पडलेल्या मावळत्या किरणांनी जणूकाही एक रस्ता आणि त्यावरुन बाबा पिशवी घेऊन येत आहेत असा मला भास व्हायचा.
बाबा घरात आल्याशिवाय मी घरात जात नसे कारण ते घरात असले की आईला मला मारता यायचे नाही. तरी देखील मारलेच तर बाबा विनवायचे पमा नको मारत जाऊ पोराला.
आई मला मारायचे म्हणून मारत नव्हती. एकूण सगळ्या परिस्थितीचा संताप ती माझ्यावर काढायची. नंतर तिचा तिलाच पश्चाताप व्हायचा आणि मग ती जवळ घेऊन कुरवाळत रहायची. कोणी म्हणायचे तिला गरका येतो. पण तसे नव्हते. स्वतःचं घर असावे असे तिला नेहमी वाटायचे. एक महंत उत्तर प्रदेशात जायला निघाला तेव्हा त्याने त्याची पंचवटीतील गजानन चौकातील जागा विकायला काढली होती. अवघ्या ३०० रुपयात. आईने पोटाला चिमटे काढून थोडे थोडे करुन तेवढे पैसे गुपचूप गाडग्यात वडीलांच्या नकळत जमवलेही होते. आईने ती जागा घ्यायचा विषय बाबांकडे काढला तेव्हा वडिलांना त्या बचतीबद्दल कळले.
नेमके त्याचवेळी आत्याने बाबांकडे हट्ट धरला एक सायकल घेऊन द्या. आतेमामा तेव्हा बांधकामाच्या कामासाठी काम मिळेल तिथे जायचे. त्यांना कामावर जाण्यासाठी सायकल लागत होती. झालं बाबांनी आईकडून ३०० रुपये घेऊन बहिणीकरिता आतेमामाला सायकल घेऊन दिली आणि ती जागा हातची गेली. आतेमामा नेहमी म्हणायचे मास्तर मागच्या बाजूला खोल्या बांधायच्या आहेत त्यातली एक खोली तुम्हाला. वडीलही त्या भरवशावर तिथेच लाटेवाड्यात राहिले पण ते बांधकामही झाले नाही आणि खोली मिळणे तर दूरच.
पण ते घर आजही माझ्या मनात आहे. एकदा मी दुपारी झोपेतून उठलो तर खिडकीत संध्याप्रकाश दाटलेला. मला वाटले सकाळ झाली म्हणून मी शाळेत जायचे म्हणून तयारी करायला लागलो तर आई म्हणे आता कुठे शाळा आहे. शाळा उद्या आहे. आणि खरेच थोड्यावेळाने अंधारले व रात्र झाली.
स्वयंपाक घरात बारदान व फळ्यांचे पार्टीशन होते. पलिकडे कंदिलाच्या उजेडात सायंकाळी इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे, देवाचे घर बाई उंचावरी अशी कविता ऐकू यायची.
लाटेवाड्याला उत्तरेकडे एक चिंचोळी बोळ होती. त्या बोळीतून भोईरवाड्याकडे जाणे येणे व्हायचे. एकदा तर गंमतच झाली. येण्याजाण्याच्या वाटेवर एक बकरी रवंथ करीत बसली होती. मी लहान. पलिकडे कसे जायचे या विवंचनेत पडलो. तिच्यावरुन टांग टाकून जायला लागलो तर ती धडपडत उभी राहिली आणि मी पडलो दातावर. पुढचा दात खालच्या ओठातच शिरला. मग रडारड. हळद जखमेत भरणे असे सगळे झाले. तिथेच रखमा व त्याची मंडळी रहायची. दोघेही विठ्ठल भक्त. घरची गरिबी. दिवाळीला विठ्ठलाच्या फोटोपुढे फक्त एक पणती लावायचे. रखमा मग कोरे धोतर कुर्ता घालून वर टोपी चढवून बुक्का कपाळी लावून सकाळीच घरोघरी जाऊन काय कसे काय चालले विचारायचा. तिथे दिलेला बशीभर फराळ तारीफ करीत चाखायचा. अशा रितीने त्यांची दिवाळी व्हायची. त्यावेळी उन्हाळ्यात घरोघरी सातुचे पीठ गुळात मिसळून चाटून खायचे. असे सगळे आठवते.७/४/२०१८
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment