#आईच्या आठवणी
आईची आठवण काढता काढता आपल्या आयुष्याचा पट उलगडत चाललाय. खूप दिवसात न उघडलेला फोटो अल्बम चाळायला घ्यावा तसे झाले आहे. एकेक फोटो पाहताना जसे एकेक घटना आठवत जावी तसे होत आहे. आई दिवाळीला मला घेऊन नंदूरबारला जायची. तेथे एका वाड्यात भाड्याच्या खोलीत वारी आजी शरद मुरलीधर व शिवाजी मामा रहायचे. शिवाजी मामा तेव्हा बहुतेक चौथीला होता. सकाळी सायकलवर घरोघरी पाव विकायचा. वारी आजी धुणीभांडीची कामे करायची. घरी येताना पदराखाली झाकून मालकिनीने दिलेले वरण भात भाजी पोळी आणायची. आई सांगायची. आजी ज्या घराण्यात दिली ते श्रीमंत घराणे होते. नारायण लक्ष्मणराव शेळके म्हणजे माझे आजोबा त्यांना सगळे अप्पा म्हणायचे. अप्पा गेल्यानंतर तेथे शेतीत शेण उचलायचे काम आजीला अपमानास्पद वाटल्याने ती मुलांना घेऊन नंदूरबारला पळून आली होती.
नंदूरबारला भाड्याची छोटी खोली होती. उन्हाळ्यात एके रात्री सगळे गरम होते म्हणून दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. शरदमामा उंबरयावर उशी ठेवून झोपला होता. सगळे गाढ झोपेत असताना कधी चोर घरात शिरले आणि त्यांनी अलगद घरातले सगळे सामान लंपास केले कोणाला कळले सुद्धा नाही. सकाळी सगळे उठून पाहतो तर पिण्याच्या पाणाचा माठ सुद्धा नाही. प्रातर्विधीला जायला डबा नाही. आंघोळीला पातेले नाही. घराच्या ओट्याखाली पाण्याचा नळ होता. तिथेच मग सगळ्यांनी हातपाय तोंड धुतले. नव्याने मग एकेक वस्तु आणून वारी आजीने पुन्हा छोटासा संसार उभारला. दिवाळीच्या दिवसात आजी रहायची त्या गल्लीत सर्वत्र शेणाचा सडा सारवण असायचे त्यामुळे वातावरणात तोच दर्वळ असायचा. आजी व आई धुणे धुवायला तापी नदीच्या काठी जायचे. तिथल्या एका खडकावर मी नदीच्या लाटा पहात उभा रहायचो तर असा भास व्हायचा की मी उभा असलेला खडक पाण्यातून लाटा कापत पुढे पुढे चालला आहे. मोठी मौज वाटायची. तिथेच एक मारुतीचे मंदिर होते. गल्लीत फटाके फुटत रहायचे आणि रस्ता कपट्यांनी भरलेला असायचा व जळालेल्या दारुचा वास येत रहायचा. मुरलीधर मामा मला बाजारातून बंदूक आणि टिकल्यांची पाकिटे घेऊन द्यायचा.
आजी रहायची त्याच्या शेजारीच वयस्क आजोबा होते. ते टॅक्सी चालवायचे. मी हळूच डोकावून ते काय करतात ते पहायचो तर ते चहाच्या कपात लालसर तपकीरी पेय पित बसायचे. त्यांचे डोळे तारवटलेले लाल झालेले असायचे. मला का कोणास ठाऊक पण त्यांची भिती वाटायची. आईपण दम द्यायची तिथे जाऊ नको म्हणून पण मी आईचा डोळा चुकवून हळूच तिथे डोकवत रहायचो. त्या आजोबांनी मला डोकावताना बघितले व प्यायचे थांबवून आत ये म्हणाले. काय आहे चहा आहे का म्हणून मी जिज्ञासेपोटी कपाकडे बोट दाखवून विचारले तर ते हसत म्हणाले की तुला प्यायचे का. मी मान हलवली. त्यांनी दुसऱ्या कपात बाटलीतून काहीतरी ओतले. तेवढ्यात आईची हाक आली 'विलास' मी तिथूनच ओ दिली. नंतर लक्षात आले की आपल्याला इथे यायला आईने सांगितले नव्हते. आता आईचा मार बसून माझी लटलट सुरु झाली. आईच्या हाका सुरुच होत्या. मी कसाबसा घाईघाईने तिथून जायला लागलो तर माझा तोल जाऊन मी खाली नळ होता त्या दगडी चौकात जाऊन पडलो. डोक्याला नळ लागून चांगली खोक पडली. रक्त यायला लागले. तेवढ्यातही आईने चांगलेच कुथलून काढले. एक दिवस सुखाचे खाऊ देत नाही. काहीतरी रोज डोक्याला ताप करुन ठेवतो. सांगितले होते ना जाऊ नको तिथे. का गेलास तिथे म्हणून ती मला दणक्यावर दणके ठेवत होते. मामा कंपनी धावून आली. आजोबाही बाहेर येऊन त्यांनी आईला विनवले. माझे रडणे सुरुच होते. कसेबसे खोक पडली तिथे आजीने हळद दाबली. मोठा बाका प्रसंग उभा राहिला होता. आज अगदी जसाच्या तसा आठवतो.8/4/2018
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment