#आईच्या आठवणी
आज आई नसली तरी तिच्या आठवणी आणि त्यात सारे बालपण आहे. बकुळीच्या फुलांप्रमाणे या आठवणींना दर्वळ आहे. शेवटच्या श्वासापर्यंत हाच दर्वळ पुरणार आहे. खूप लहान असताना मी शंभराची नोट प्रथमच पाहिली. लांब. एका बाजूला पांढरा उभा भाग. निळसर हिरवी. गांधीछाप. घोटकरांच्या घरात तळमजल्यावर छोट्या खोलीत आम्ही तेव्हा भाड्याने रहायचो. खोलीला लागूनच बाहेर मोरी होती. छान ओटा होता. खोलीत एक बाज होती. भिंतीच्या कोनाड्यात पत्र्याच्या पेटीत आईने डब्यांमध्ये मला त्यावेळी आलेले चांदीचे बाजूबंद. तांब्याचे वाळे. कमरेची चांदीची साखळी ठेवलेली होती. बाबा म्हणजे माझे वडील शाळेत शिक्षक. लहानपणी आंब्याच्या झाडावरुन पडल्याने त्यांचा डावा हात अधू झालेला होता. पडले तेव्हा गावठी पध्दतीने मोडका हात बांधताना हरभरे भरल्याने हाताचा पुढील पंजा तिरकाच राहिला. अपंगांना तेव्हा नोकरीत घेत नसायचे पण तेव्हा कसेबसे ५० रुपये पगारावर ते शिक्षक म्हणून खासगी संस्थेत लागले. पगाराचे पैसेही आई त्याच पत्र्याच्या पेटीत ठेवायची. तर एके दिवशी आईने पेटी उघडली तेव्हा मी तिच्या मागेच आई काय करते ते कुतुहलाने उभा राहून पहात होतो. मुलांच्या नजरेस पैसे पडू देऊ नये असा कटाक्ष तेव्हा असायचा. तरी आईला १०० रुपयांची नोट काढतांना मी पाहिले तेव्हा ती मागे वळून माझ्यावर खूप रागावली. जा खेळ जा बाहेर म्हणून मला बाहेर तंगाडले.
एकदा भागापूरवरुन ब्रिजलाल मामा आला. पायजमा कुर्ता. किरकोळ अंगकाठी. हसताना सगळे दात दिसतील असा. विस्कटलेल्या केसांचा. त्यावेळी आईने मोठ्या कौतुकाने मला आलेले चांदीचे दागिने पत्र्याच्या पेटीतून एकेक काढून त्या मामाला दाखवले. मामा चांगला आठवडाभर राहिला. नाशिकमध्ये आले की सगळे गोदाकाठी फिरायला जायचे. एके दिवशी मामा बाहेर गेलेला होता. आईने नेहमीप्रमाणे जर्मलच्या पातेल्यात धुणे आणि धुपाटणे घेऊन ती खोलीला कुलूप लावून गंगेवर गेली. मला भोईरवाड्यात खेळायला जा म्हणून तेव्हा सांगितले होते. अर्ध्या रस्त्यात तिला काय आठवले कुणास ठाऊक ती धुणे घेऊन परत आली. कुलूप उघडून खोलीत पहाते तर काय ब्रिजलाल मामा तिची पत्र्याची पेटी उघडून चांदीचे दागिने आणि पैसे पायजाम्याच्या खिशात कोंबत होता. आईने त्याचा हात तसाच पिरगाळला आणि दोन चार लाफा ठेवून दिल्या तसा ब्रिजलाल मामा गयावया करुन रडत रडत आईच्या हातापाया पडू लागला. पण आई खूप संतापली. बहिणीच्या घरी चोरी करतो का काळतोंड्या म्हणून तिने मामाला चांगलेच तुडवले. पुन्हा असे करणार नाही असे मामाने सांगितले पण चल निघ परत घरात पाय ठेवायचा नाही म्हणून मामाला हाकलून दिले. मामा खोलीच्या बोळीकडील भिंतीवरुन चढून आत खुंटीच्या सहाय्याने खोलीत उतरला होता. आई जर अर्ध्या वाटेवरुन घरी परत आली नसती तर मामाने चांदीचे दागिने व पैसे घेऊन पोबारा केला असता आणि दागिने विकून साळसूदपणे पुन्हा परत आला असता. चोरीचा तपासही मग लागला नसता.
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment