#एक चंदनाची कहानी
खूप एकटे एकटे वाटले की आठवणी सोबतीला येतात आणि साथ देतात. आठवणी आल्या की पाठोपाठ घळाघळा अश्रू येतात. अंधार त्या अश्रूंवर मायेने पांघरुन घालतो. अन त्या पांघरुनात हुंदकेही येतच राहतात. डोळ्यात झोप येत नाही तेव्हा आठवणीच स्वप्नांसारख्या तरळत राहतात. दिसतात पण त्यांना स्पर्श करु शकत नाही म्हणून शब्दात त्या गुंफून ठेवाव्या लागतात. कोणी म्हणेल कशासाठी या आठवणी. आठवणी या पुढील पिढीसाठी लिहून ठेवायच्या असतात. वाडवडिलांनी कसा संघर्ष केला आणि आपण कोणत्या अनुभवांचे वारसदार आहोत हे जर जाणून घ्यायचे असेल तर याच आठवणींना चाचपडून पहावे लागेल
ते जून १९७६ ला सेवानिवृत्त झाल्यानंतर १७/११/२००२ पर्यंत त्यांचा तब्बल २६ वर्षांचा सहवास लाभला. सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन नव्हते. मला १९७८ ला नोकरी शोधावी लागली. १९८० ला मी ज्या रेडिमेड कपड्याच्या दुकानात कामाला होतो त्या दुकान मालकाची परवानगी घेऊन ११वी काॅमर्सला के टी एच एम काॅलेजला प्रवेश घेतला. सकाळी १०.३० पर्यंत पिरीएड अटेंड करुन मी दुकानात जायचो.
३० रुपये आठवड्याला उचल मिळायची. वडील त्यातून गहू तर गहूच आणायचे. पुन्हा दुसरा किराणा आणायचा तर पैसे नसायचे. कधी कधी आठवड्याचे ३० रुपये आणून मी मांडणीत पितळी बारीक डब्यात ठेवायचो तर कोणीतरी त्यावर हात मारायचे. मग आठवडाभर काय खावे अशी विवंचना असायची.
तेव्हा काॅलेजला जायला मी मोठ्या हौसेने पांढरा सफारी शिवला होता. वडील पावसाळ्यात तो धुवून घरात वाळत घालायचे तर त्यावर कौलातून टपकणारया गढूळ पाण्याचे टिपके पडायचे.
मला आठवते. त्या छोट्याशा खोलीत मी अब्राहम लिंकनचा छोटासा फोटो लावलेला होता. तसेच दाराशी हाताची घडी घातलेल्या स्वामी विवेकानंद यांची एक तसबीर होती. पुस्तकांची छोटी रॅक होती. एकदा मला मेनरोडवर एक पोस्टर आवडले ते मी पुस्तकांच्या रॅकजवळ लावले. एक वादळात एका स्त्रीचा तो चेहरा होता. डोळ्यातून अश्रू ओघळत असलेला. कलात्मक म्हणून तो मला आवडला. पण तो खाली पाणी भरता भरता खिडकीतून खाली दिसायचा. ते पोस्टर काढून टाकावे म्हणून एक वर माडीवर येऊन सांगायला लागले तेव्हा मी दुसरे पोस्टर आणून त्यावर चिकटवले. If you live right, ones is enough असे त्यावर वाक्य होते आणि उंचावरुन समुद्रात छलांग मारणारया युवकाची पोज होती.
घरात चिमणी होती. तिचा काळा धुर निघत रहायचा. वडील कधी कधी पांढरया मातीने भिंती पोचारायचे. जमीन सारवायचे. पाणी खालून आणावे लागायचे. घरात मोरी नव्हती. खाली अंगणात कोपर्यात नळाजवळ आडोशाला जावून अंघोळ करावी लागायची. वडील नळावर जाऊन एका हाताने भांडी घासायची तेव्हा सगळे माझ्याकडे वर खाली पाहून कुजबुजायची 'किती दिवस म्हातारयाला भांडी घासायला लावतो' मी खालमानेने सकाळी काॅलेजला जायचो. तेथून दुकानात जायचो. रात्री नऊ वाजता घरी यायचो. सुट्टीच्या दिवशी परशुराम साईखेडकर नाट्यगृहाजवळील सार्वजनिक वाचनालयात जायचो.
आठवड्याला नंतर नंतर १२५ रुपये उचल मिळायला लागल्यापासून मी पुस्तक प्रदर्शनातून एकेक पुस्तक घरी आणायचो. पाच दहा रुपये किंमत असायची पण त्या काळात त्यांना फार मोल होते. महानोर यांचा रानातल्या कविता, ग्रेस यांच्या सायंकाळच्या कविता हे संग्रह तेव्हा मी आणलेले आठवतात. एकदा विश्वकोश माझ्या नजरेस पडला तेव्हा मी दरमहा एक याप्रमाणे जवळ जवळ सगळेच खंड घरी आणले. पुस्तकांची रॅक तेव्हा कमी पडायला लागली. घरी येणारे नातेवाईक म्हणायचे हा छंद काही उपयोगाचा नाही. वडील तेव्हा रागवायचे नाही
आई गेल्यावर त्यांनी मला आईची उणीव भासू दिली नाही. आईसारखी माया माझ्यावर केली. कधी मी आजारी पडून घरी राहिलो की माझी चिठ्ठी ते दुकानात नेऊन द्यायचे. माझ्या अंगावर पांघरुन घालून येताना फुटाणे वगैरे आणायचे
मला आठवते. आई तेव्हा शालिमारजवळ सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट होती. तेव्हा ते घरी स्वयंपाक करुन हाॅस्पिटलमध्ये जाऊन शाळेतही जायचे. परत घरी येऊन संध्याकाळी स्वयंपाक करायचे. हाॅस्पिटलमध्ये आई कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला होती. तिला ते संत्री मोसंबी सोलून खाऊ घालायचे. आई म्हणायची 'आता माझ्या विलासचे कसे होईल' तेव्हा ते तिला धीर द्यायचे. कॅन्सरवरील महागाचे उपचार करण्याइतपत त्यांची तेव्हा परिस्थिती नव्हती. मी शाळकरी वयाचा. पुरेशी समज न आलेला.
त्यांची हतबलता तेव्हा मला समजण्यासारखी नव्हती. मी जरा जाऊन येतो असे म्हणून ते हाॅस्पिटलमध्ये जाऊन यायचे. एके दिवशी ते अक्षरशः हंबरडा फोडतच आले. 'आपली पमा आपल्याला सोडून गेली रे' असे म्हणून ते रडतच होते. मला काही समजत नव्हते. मी मनात तेव्हा म्हटले 'बरे झाले गेली. मारतच होती.' आज मला अगदी ओशाळल्यासारखे वाटते.
तेव्हा आम्ही चरण पादुका रोडला बोराडे यांच्या सीता स्मृती वाड्यात पहिल्या मजल्यावर रहायचो. आईला वडीलांनी टॅक्सीत घालून आणले. तेव्हा नुकतेच जंबुसरवरुन मामा कंपनी घरी आली होती. त्यांनी आणलेला ब्रेड लाकडी कपाटात तसाच पडलेला होता.
आईला हिरव्या लुगड्यात सजवण्यात आले. हिरवा चुडा भरण्यात आला. तोंडात पानाचा विडा ठेवण्यात आला. तिला घेऊन यात्रा निघाली तेव्हा वडील भाऊ पुढे विस्तव घेऊन चालत होता.
आईला सरणावर ठेवण्यात आले तेव्हा मात्र मला वेगळीच जाणीव झाली. आई उठत का नाही म्हणून मला एकसारखे वाटायला लागले तोच वडील भावाने आईला अग्नी दिला. खांद्यावर पाण्याच्या मडक्याला दगडाने कोच पाडून पाण्याची धार सांडत सांडत प्रदक्षिणा घातल्या आणि पाठीमागून एके ठिकाणी मडके मागे सोडून दिले. ते फुटले तेव्हा आगीच्या ज्वाळांनी मला भडभडून आले.
आई आता पुन्हा दिसणार नाही ही जाणीव मला त्या वयात झाली. आई गेल्याचा माझ्या बालमनावर परिणाम होऊ नये म्हणून वडीलांनी पुढे मला फार जपले. ते सारखे माझ्याकडे लक्ष ठेवून असायचे.
२
एकटाच खिडकीत बसलो की वडीलांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा डोळ्यापुढे तरळत राहतात. कधी ते अंगातली कोपरी खिडकीशी उन्हात बसून शिवत बसायचे. तर कधी गुडघ्यावर धोतर शिवत बसायचे. त्यांची लालबुंद गव्हाळ कांती उन्हाच्या तिरीपेत चमकत रहायची. कधी कागदाच्या कपट्यावर शिसपेन्शिलने माझ्या आईचा चेहरा रेखाटत बसायचे. गुडघ्यांसाठी त्यांनी रुमानार्थी आयुर्वेदिक औषधे आणून ठेवलेली असायची ती ते घ्यायचे आणि सकाळी किंवा सायंकाळी वरच्या पेठेपासून ते थेट खालच्या पेठेपर्यंत फेरफटका मारुन यायचे. मध्ये राममंदिर लागले की तेथील ओट्यावर भेळभत्ता घेऊन खायचे. कधी कधी निवृत्त लोक कट्ट्यावर जमायचे तिथे त्यांच्यात जाऊन बसायचे. एकदा त्यांच्या चष्म्याची एक काडी तुटली तर तिथे दोरा लावून तोच चष्मा त्यांनी शेवटपर्यंत वापरला. शेवटी एक काच फुटली तर उरलेल्या काचेतून ते पेपर वगैरे वाचायचे. तो चष्मा जपून ठेवायला हवा होता अशी हळहळ आज वाटते. प्रथेप्रमाणे त्यांच्या वस्तू गंगेत विसर्जित केल्या त्या करायला नको होत्या असे आज वाटते.
सकाळी अंघोळ केली की ते एका हाताने देवपूजा करायचे आणि कपाळाला गंध लावायचे.
मोठ्या मुश्किलीने मी त्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकरण त्यांचे सेवापुस्तक ज्या शाळेत होते तिथे जाऊन, त्यांचे सन १९५० ते १९७६ चे वेतनाचे तपशील मिळवून करवून घेतले होते. रु ६० निवृत्ती वेतन बसले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळलेले मी पाहिले होते. ते वाढत जाऊन शेवटी ते रु ७०० इतके निवृत्ती वेतन घ्यायचे. त्याचेही त्यांनी हिस्से ठरवलेले होते. माझ्या हिस्स्याचे पैसे ते घरात द्यायचे व नाशिकला जाऊन माझ्या भाऊ बहीणीला त्यांच्या हिश्श्याचे पैसे कनवटीला ठेवून देऊन यायचे. स्वतः साठी तंबाखूची पुडी आणि भेळभत्ता एवढाच खर्च भागावता येईल एवढेच पैसे ते जवळ बाळगायचे. नवरात्रात पहाटे कोरा नेहरुशर्ट व कोरे धोतर घालून ते पायीच घाटनदेवीचे दर्शन घेऊन यायचे.
३
#एक चंदनाची कहानी
शुभ्र नेहरुशर्ट . शुभ्र धोतर आणि शुभ्र टोपी याच वेशात ज्यांना मी आयुष्यभर पाहिले.ज्यांचे जीवन अगदी साधे सरळ भाबडे आणि तितकेच खडतरही होते.त्या माझ्या वडिलांनी माझ्या आयुष्यातील जवळ जवळ सगळाच भाग व्यापलेला आहे. माझे बालपण, किशोर आणि तरुण वय त्यांच्या सावलीत गेलेले आहे
रविवार दि १५/४/१९१७ रोजी त्यांच्या जन्माने आनंद झाला म्हणून त्यांचे नाव 'आनंदा' ठेवण्यात आले. त्यांच्या पाठोपाठ यमुना 'दगु' 'मुरलीधर' झाले. नगरसूल गावात शेती होती. लहानपणी आंब्याच्या झाडावरुन पडण्याचे निमित्त झाले आणि वडिल डाव्या हाताने अधू झाले. शेतीच्या कामासाठी कुचकामी ठरले. शेळ्या मेंढ्या सांभाळायच्या कामाचेच फक्त उरले.
मालेगावच्या मामांनी त्यांना आपल्याकडे शिकायला घेऊन गेले. तिथे व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे सातवीपर्यंत शिकले. ते सांगायचे तेल्याच्या दुकानात ते दिवसभर तेल विकायचे. मोठे कष्टाचे ते दिवस होते.
नंतर नाशिकमध्ये पीटीसी केली. खिर्डीसाठे इथे शाळा सुरु केली. पुढे मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या बाल शिक्षण मंदिर, गोराराम गल्ली नाशिक येथे प्राथमिक शिक्षक म्हणून लागले.
पहिली पत्नी हाडके घराण्यातील होती. वडील नाशिकमध्ये नोकरी करीत होते तरी ती नगरसूलला शेतीकाम करायची. बाळकृष्ण तीन वर्षाचा असताना व उषाचा नुकताच जन्म झाला तेव्हा ती त्यांना सोडून देवाघरी गेली
तेव्हा ते पंचवटीत रहायचे. नगरसूलची सकडे आजी भोईरवाड्यात बहिणीकडे यायची. तिने वडीलांना पाहिले. माझी आई तिची भाची. तिच्यासाठी माझे वडील योग्य वाटले. तिने मग लग्न जुळवले.
तुटपुंज्या पैशात संसार सुरु झाला. पहिल्या पत्नीची मुलं आई सांभाळणार नाही असा त्यांना त्यावेळी सल्ला मिळाल्याने त्यांना त्यांनी आपल्या बहिणीकडे ठेवले. आईला तिच गोष्ट मनस्वी लागली. वडील पगारातून त्या दोन मुलांचा संभाळ करण्यासाठी बहिणीला वरचेवर पैसे द्यायचे त्यामुळे घरात चणचण भासायची. त्यावरुन आई बाबा यांच्यात नेहमी खटके उडायचे.
आई आणि बाबा यांच्या वयातही खूप अंतर होते. आई वयाने लहान सुंदर होती. सगळ्यांमध्ये उजवी होती. त्यामुळे तिचा सगळ्यांकडून दु:श्वास होत रहायचा. कोणी आईला चांगले पहायचे नाही. तिने खालुन वाहून आणलेल्या प्यायच्या पाण्यात आधीची मुलगी राख टाकून द्यायची. खणदूसपणे वागायची
बाबांचा आईवर खूप जीव होता. तिचा संताप राग सहन करुन घ्यायचे. आई रागावली की बाबा घराबाहेर निघून जायचे.
शुक्रवार दि १५फेब्रुवारी, १९७४ रोजी आई कॅन्सरने गेली तेव्हा वडील एकटे पडले. घरातला स्वयंपाक पाणी एका हाताने करुन ते शाळेत जायचे. घरातली भांडी ते एका हाताने घासायचे. मी तेव्हा आठवीला होतो. असमंजस आणि हट्टी होतो. एकदा दारावर लाकडी टेबल विकायला आले तर मला अभ्यासाला वडीलांनी घेऊन दिले. टेबलाला खुर्ची पाहिजे म्हणून मी हट्ट धरला तर वडीलांनी मला फर्निचरच्या दुकानात नेऊन माझ्या पसंतीने घडीची लाकडी खुर्ची घेऊन दिली. खुर्ची घेऊन आम्ही रामसेतू पुलावरुन येत होतो तेव्हा श्रीराम विद्यालयाचे तेव्हाचे मुख्याध्यापक श्री टेकाडे गुरुजी भेटले. ते माझ्याकडे पाहून म्हणाले गुरुजींना किती त्रास देतो.
एकदा हट्ट करुन मी बाबांना किशोर मासिक घ्यायला लावले होते. दोन रुपये किंमत होती तरी तेव्हा ते महागच होते. तेवढ्या किमतीत तेव्हा दोन तीन किलो गहू मिळायचा.
बाबा जून १९७६ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्या आधी फंडातून पैसे काढून उषाचं लग्न करुन दिले. सेवानिवृत्त झाले पण पेन्शन नाही. खासगी संस्थेत तेव्हा पेन्शन नव्हते. घरातले एकेक पितळी भांडे कुंडे विकून एकेक दिवस कसाबसा चालला होता. तेव्हा आम्ही दोघेच लाटेवाड्यातच पण आतेमामांच्या शेजारी रहायचो. आतेमामांनी आत्या गेल्यानंतर दुसरे गंधर्व लग्न केले होते. बाळकृष्ण आणि उषा तेव्हा आतेमामांकडेच रहायचे. उषाच्या लग्नात जेवण कमी पडले तर आतेमामाने आईच्या हातची मोठी पंचपात्री ठेवून घेतली व पैसे पुरवले तेव्हा पंगतीत वाढता आले.
सणासुदीला इकडे आम्ही दोघे आज काय खायचे या विवंचनेत असायचो तर शेजारी मोठमोठ्याने मामा श्रीखंड काय मस्त आहे असे मुद्दाम आवाज यायचे. आतेमामाने बाळकृष्णाला मालविय चौकात रथ रस्त्याच्या कोपर्यावर पानपट्टी टाकून दिली होती. कधी कधी मीही त्या पानपट्टीवर बसायचो. सेवानिवृत्त झाल्यावर उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. तेव्हा आतेमामाने पंचवटी कारंजावरील एक पानपट्टी बाबांना चालवायला दिली. तेव्हा मी दहावीत गेलेलो होतो. पानपट्टीच्या माळ्यावर व घरी रात्री आल्यावर रस्त्यावरील लाईटच्या उजेडात मी अभ्यास करायचो. घरात लाईट नव्हती. चिमणीच्या उजेडात आम्ही रहायचो.
खूप जणांनी उधारी बुडवल्याने पानपट्टीही चालली नाही. मग बाबा चार रुपये रोजाने द्राक्षाच्या बागेत रात्री राखणदारी करायला तपोवनाकडे जायचे. येताना जाळण्यासाठी रानातून काड्याकुड्या गोळा करुन आणायचे. एकदा आतेमामाने त्यांच्याकडील कोरिया जपानची भारी पॅन्ट घालायला दिली आणि दुसरया दिवशी मागूनही घेतली होती. सकाळी गाणगापूरहून आणलेल्या सोन्याच्या साखळ्यांच्या गप्पाही कधी कधी ऐकू यायच्या.
मी दहावीत गेलो तेव्हा एकमुखी दत्ताकडे रहात असलेल्या पिसोळकर सरांनी त्यांची जुनी खाकी फुलपॅन्ट जी मागे सीटवर विरली होती ती देऊन ठिगळ लावून वापर असे सांगितले होते.
अशा एकेक आठवणी आज जाग्या होत आहेत.
४.
#एक चंदनाची कहानी
तो काळच वेगळा होता. आज तो धूसर सोनेरी भासत आहे. पावसाळ्यात वडील घरी यायचे तेव्हा मोठी बंद छत्री ते दाराच्या पाठीमागे उभी करुन ठेवायचे. धोतर वर पोटरयांवर खोचलेले असायचे. 'काय शिळंदार पाऊस' असे अंगभर ओले कपडे झटकत म्हणायचे. 'जरा पल्याड जाऊन येतो' म्हणून टोपी चढवून ते निघायचे. एकदा मला त्यांनी गोदावरी पलिकडे यशवंतराव पटांगणातून चढ असलेल्या मार्गाने त्यांच्या शाळेत नेले होते. बाल शिक्षण मंदिर ही गोराराम गल्लीतील शाळा भरायची तो एक वाडाच होता. वर्गात मुलं जमीनीवर बसकर पट्ट्या टाकून बसायचे. दर शनिवारी वर्ग सारवायचे. वडील उत्तम चित्रकार होते. बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील रंगीत चित्रे त्यांनी हुबेहुब त्याच रंगात रंगवून वर्गात लावली होती. तेव्हाच्या लोकराज्य वगैरे मासिकातील चित्रे, पक्षांची पिसे, राजा रवीवर्माने काढलेल्या श्रीकृष्णाची चित्रे यांचा सुंदर चित्र संग्रह त्यांनी बनवलेला होता. इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पुस्तकातील शिवाराची श्रीमंती, जत्रा, माझ्या मामाची रंगीत गाडी इत्यादी धडे कवितांची त्यांनी आपल्या वळणदार निळ्या अक्षरात काढलेली टिपणवही मी अजून जपून ठेवली आहे. त्यांचे अक्षर मोत्यासारखे टपोरे सुंदर होते. एका वहीत माकडा माकडा कान कर वाकडा सारख्या बडबड गीतांचा त्यांनी स्वअक्षरात केलेला संग्रह देखील मी जपून ठेवला आहे. मोडीमध्ये त्यांची आ गो कुडके ही स्वाक्षरी सर्वत्र असायची.
शाळेतून सायंकाळी परतताना ते हमखास मालविय चौकातून मोठी बालुशाही घेऊन यायचे.
मला घेऊन ते शाळेत जायचे तेव्हा दुपारच्या सुट्टीत सुंदरनारायण मंदिराजवळील त्यांच्याच एका विद्यार्थ्याच्या हाॅटेलमध्ये घेऊन जायचे व मस्त गोल भजी खाऊ घालायचे.वर्गात ते शिकवायचे तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा अगदी धाक होता. चुकले की त्यांच्याकडून जोरात गुद्दा मिळायचा. कधी कधी तर ते कानही अगदी लाल होईपर्यंत पिळायचे. पाढे बाराखडी धडे कविता ते अगदी घटवून घ्यायचे. मुलांचे पालक शाळेत आले की ते वडीलांशी अगदी घरच्यासारखे बोलायचे. वडील त्या शाळेचे कीर्द खतावणी सुद्धा लिहायचे. स्व. खासदार वसंत पवार हे त्यांचे विद्यार्थी होते. सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तेव्हा वडील ८७ वयाचे होते. तेव्हा स्व. खासदार वसंत पवार त्यांना म्हणाले 'मला ओळखले का गुरुजी, मी तुमचा विद्यार्थी, तुम्ही माझा कान पिळला होता.' वडीलांनी आठवून आठवून मग मान हलवली होती.
बाल शिक्षण मंदिर या शाळेत मागील बाजूस एक दगडी चौक होता. तिथे सुतकताईचे चरखे असायचे. मोठ्या वर्गातील मुलांना ते सुतकताई सुद्धा शिकवायचे. अशा कितीतरी आठवणी जाग्या झाल्या आहेत.
@विलास आनंदा कुडके