SarjanSpandan

Search results

Saturday, May 29, 2021

देवभूमी हिमाचल प्रदेशात 3

 #देवभूमि हिमाचल प्रदेशात ३

      

          चंदिगडहून खरे पर्यटनास सुरुवात होणार म्हणून सगळे उत्साहात होते. सकाळी सातच्या आत आवरुन बॅगा घेऊन सारे हाॅटेल स्टारच्या आवारात उभे राहिले. नऊ आसनांऐवजी सात आसनांचीच गाडी आम्हाला नेण्यासाठी आरुंद गल्लीत उभी होती. उन्हाची तिरीप आलेली. सगळ्यांनी कुटूंब चमूचे फोटो काढून घेतले. तरुण पंजाबी बंदा ड्रायव्हर हजर होता. ट्रॅक पॅन्ट. काळा टी शर्ट. कानांवर दोन्ही बाजूला आधुनिक पद्धतीने केस भादरलेले. मध्ये कोंबडा उभा केल्यासारखे केस. उजव्या कानात सोन्याची बाळी. त्याने भराभर गाडीच्या टपावर दोरखंडाने सर्व बॅगा करकचून बांधल्या. त्याचे पिळदार दंड आणि हातातले कडे लक्ष वेधून घेत होते. कोणी कुठे बसायचे हे आपसात ठरवून सगळे त्या गाडीत बसले. वेगवेगळ्या वयाचा वेगवेगळा उत्साह जाणवत होता. बरोबर सकाळी ७.३० वाजता गाडी चंदिगढवरुन निघाली. चंदिगढचे मोठे रस्ते नजरेत भरत होते.

          दुतर्फा सुव्यवस्थित इमारती लक्ष वेधून घेत होत्या. पुढे नाष्ट्याला चांगले रेस्टॉरंट आले की थांब असे ड्रायव्हरला सांगितले. परमजीत त्याचे नाव. त्याने एका पंजाबी रेष्टारंट जवळ गाडी थांबवली. आवारात एक शोभेसाठी हिरवी जीप उभी केलेली. रेष्टारंटच्या काचेच्या भिंतीवर पंजाबी स्रियांची घरकाम करतांनाची पोष्टर लावलेली. सगळ्यांनी पंजाबी पराठा वगैरेची आॅर्डर देऊन हिरव्या जीपमध्ये बसून फोटो काढून घेतले. नाष्टा उरकून पुढील प्रवास सुरु झाला. दुपारी एक दीडच्या सुमारास स्वार घाट लागला. मोठा घाट. तेथून पुढील प्रवासात समतल भागच नाही. तेथून मनाली २२६ किमीचा प्रवास सलग घाटातूनच.

         खोल दरया. वळणावळणाचे रस्ते. बिनाकठाड्याचे रस्ते. झपकन वर वळसा घेणारे वळणे. चित्तथरारक प्रवास. ड्रायव्हर निष्णात होता. न बोलता गाडी चालवत होता. मधूनच फोन आला की गाडी चालवता चालवता खास पंजाबी ढंगात धारदार आवाजात गाडी कुठपर्यंत आली ते बहुधा मालकाला सांगत होता. मध्येच त्याने दरयाखोरयातून दिसणारा बिलासपूरच्या अलिकडे गागल येथील ए सी सी सिमेंट कंपनीचा अजस्र कारखाना दाखवला. अजस्र पाईपसवर मातीचाच रंग चढलेला होता. मोठ्या परिसरात पसरलेला तो कारखाना जणू तेथील पर्वतरांगेतील एक पर्वतच वाटत होता. दरयांची खोली वाढतच होती. मध्ये २.८ किमीचा मोठा बोगदा लागला.(क्रमशः)

@विलास आनंदा कुडके 

No comments:

Post a Comment

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...