SarjanSpandan

Search results

Saturday, May 29, 2021

कडकडीत मोबाईलचा उपवास



          सांप्रत अस्मादिक ऐतावार असल्याने व अतुलशास्त्री भगरे गुरुजींच्या भविष्याच्या वेध कार्यक्रमास अवकाश असल्याने अंमळशा लोळण्याचे सुख घेत पहुडलेले होते.

         भ्रमणध्वनी विद्युत प्रवाहे भारीत होत असता राहवले नाही म्हणून हलके हाताने जवळ घेतला. कळ दाबून पाहता अघटीत जाहले. भ्रमणध्वनीची स्पर्श त्वचा असंवेदनशील जाहली.

     अनामिका मध्यमा तर्जनी कनिष्ठीका व सरतेशेवटी अंगुष्ठ भ्रमणध्वनींच्या त्वचेवर चालवून पाहिले पण काही परिणाम होईना. भ्रमणध्वनी जसजसा प्रतिसादशुन्य जाहला तसतसे मन अतिउद्विग्न जाहले.

        लोळत पहुडण्याचे सुख कुठल्या कुठे फरार जाहले. ऐसे कधी घडले नव्हते. चित्त बिघडले नव्हते. भ्रमणध्वनी कर्णास लावून पाहिला तो वाॅटसअॅप फेसबुकवरील मधुर घंटी जी वाजत राहायची तिच बंद जाहली .

      अखेर नाद सोडला आणि गवाक्षातून भरुन आलेले श्यामल मेघ न्याहाळले. वारयावर डुलणारी झाडे पाहिली. गृहकृत्यदक्ष सहचारिणीकडे कौतुकाने पाहिले. सकाळ इतकी मनोहर असते या साक्षात्काराने धन्य वाटले . पक्षांचे कुजन ऐकतच रहावे असे वाटले. दोन घास उदरात भरताना प्रथमच बहुत चव लागली. ऐसे भ्रमणध्वनी जवळ असता कधी घडले नव्हते. 

        भारीत भ्रमणध्वनीची विद्युतघटीका भारविरहीत होईपर्यंत प्रतिक्षा करण्याखेरीज अन्य उपाय नव्हता. मध्ये मध्ये विद्युतघटीकामध्ये किती भार शिल्लक राहीला ते तपासण्याचा चाळा लागला. भार घटीत होण्याचा मंद वेग पाहून अस्मादिक अगदी कंटाळून गेला. दिवसभर भ्रमणध्वनी कितीतरी वेळा भारीत करीत बसावे लागे ते आठवून चित्त अधिक खिन्न जाहले.

         इतके ऐतवार येऊन गेले पण वाॅटसअॅप फेसबुकशिवाय हा पहिलाच ऐतवार अगदी घातवार उगवला.विधात्याला जणू सुख पाहवले नाही. 

       उपवास परवडला पण वाॅटसअॅप फेसबुकशिवाय आख्खा दिवस आणि आख्खी रात्र घालवणं असे अस्मादिकांनी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. कुलूपबंद असंवेदनशील भ्रमणध्वनीच्या निर्जीव कलेवराकडे हताश होऊन विरहवेदनांनी व्याकुळ होत तळमळत मध्यरात्रीस कधी डोळा लागला ते अस्मादिकास कळलेही नाही.

         अखेर पहाटेस नेत्र खुलले तो विद्युतघटीका अंतिम घटीका मोजत लाल दिवा मिचकावीत असल्याचे पाहून मनास धीर आला. भ्रमणध्वनी कधी बंद पडतो आणि भारीत करुन पुन्हा सुरु कधी करतो ऐसे होऊन गेले. अखेर विद्युतघटीकेने शेवटचा आचका देऊन भ्रमणध्वनी काळोखला तसा अस्मादिकांनी टुणकन उडी मारुन विद्युत प्रवाहे भ्रमणध्वनी भारीत करावयास ठेवून नित्यविधीसाठी खुशीत गुणगुणत गेले.

        विद्युतघटीका अंमळशा भारीत झाली तोच कळ दाबून भ्रमणध्वनी सुरु केला आणि वाॅटसअॅप  फेसबुकच्या घंट्यांंनी घर डोक्यावर घेतले. झोपमोड झाल्याने घरातून उद्धार उद्गार बाहेर पडले पण अस्मादिकांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. कर्ण तृप्त जाहले आणि वाॅटसअॅप फेसबुकचा कडकडीत उपवास सुटून आनंद आंतरजालात मावेनासा जाहला.

@विलास आनंदा कुडके 

No comments:

Post a Comment

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...