#आईच्या आठवणी
एकाएकी आभाळ भरुन यावे तशा या आठवणी. गेलेले दिवस पुन्हा मनात परतून येतात आणि चिंब चिंब भिजवून टाकतात. अगदी अबोध मन होते तेव्हाच्या आठवणीही तरळून जातात. एक आठवण अजूनही सारखी अस्वस्थ करीत राहते. पंचवटीत तेव्हा घोटकरांच्या घराच्या ओट्यावर वडील मला कुशीत घेऊन झोपायचे. आत खोलीत आई झोपायची. मला लवकर झोप लागत नसायची. मग मी मंद रस्त्यावरील बल्बच्या उजेडात हलणारया निंबाच्या पानांकडे पहात कितीतरी वेळ जागाच रहायचो. एकदा त्या निंबाच्या पानाच्या हालचालीत एक बाई सज्जात हातात ताट घेऊन काहीतरी निवडत असल्यासारखा भास झाला. बल्बचा उजेड त्या पानांवर पडलेला अगदी अद्भुत होता. एकामागून एक चित्र सरकावे तसे मी त्या हलणारया पानांमधून ती बाई अंगण झाडत आहे. पाणी भरुन ठेवत आहे अशा चित्रभासात हरवून गेलो. कदाचित उघड्या डोळ्यांना दिसलेले ते एक स्वप्नही असावे. मला नेहमी प्रश्न पडतो की काहीच कळत नव्हते त्या वयात नेमके ते भास काय असावे कळत नाही.
समोरच बोळीत उंच पार करुन उंबराचे झाड होते. तिला लागून असलेल्या खोलीत एक फेरीवाला रहायचा. एका काठीला खेळणी चष्मे पिपाण्या भिरभिरे शिट्ट्या लावून तो दिवसभर ती विकायचा. एकदा आम्ही सारया लहान पोरांनी त्याच्या खोलीत डोकावून पाहिले तर कोपर्यात खेळण्याची काठी उभी करुन तो परातीत शेव कुरमुरे आणि दोन बुंदीचे लाडू घेऊन सावकाश खात होता. एकटाच होता. घरी दुसरे कोणीही नव्हते. कदाचित तेच त्याचे जेवण असावे. तिथल्या उंबराच्या पारावर आम्ही पोरं किती धुडगूस घालायचो पण तो जराही रागवायचा नाही.
घोटकरांच्या घरातील तेव्हाची ती खोली अंधारी होती. आत चुलीच्या जाळात स्वयंपाक करीत असलेली आई रस्त्यावरुनही सहज दिसायची. माझ्या पाठीवर एक भाऊ होता मला. त्याला घेऊन आई बाजेवर पहुडलेली असायची आणि मी बाजेला टेकून ताटात वाढून दिलेला दूध भात वेचून वेचून खात असायचो. नंतर तो भाऊ रात्री एकाएकी गेला.
तेव्हा सार्वजनिक नळावरुन वडील हंडे भरभरुन आणायचे तेव्हा मी झोपेत असायचो. पण त्यांच्या पायांची धाप धाप मला झोपेत ऐकू यायची.त्याच नळावर आम्ही पोरं घसरगुंडी खेळायचो. जवळच शामराव यांचे घर होते. ते सायंकाळी दारु पिऊनच घरी यायचे आणि ओसरीवर बराचवेळ एकटेच कोणालातरी शिव्या देत रहायचे.
सकाळीच एक नाथपंथी अल्लख निरंजन म्हणत यायचा. त्याच्या कमरेला सोडलेल्या एका घुंगराचा हेलकाव्याने निघणारा नाद अजून माझ्या स्मरणात आहे.
बहुधा तेव्हा कुंभमेळा असावा. तेव्हा एक साधू घरी आला होता. वडिलांच्या भालप्रदेशावरील रेषा पाहून त्याने वडिल खूप भाग्यशाली असल्याचे उद्गार काढले होते असे मला आठवते. घराच्या पाठीमागे तारा मावशी माझ्या आईची जिवलग मैत्रीण रहायची. ती नेहमी घरी जिलेबी तळायची व मला हाक मारुन जिलेब्या खायला द्यायची. एकदा वडीलांनी माझ्यासाठी जव जवान ड्रेस आणला होता. तो घालून मी ओट्यावर कितीतरी वेळ स्टाईलमध्ये हुंदडत राहिलो. गल्लीत घरोघरी जाऊन मिरवून आलो होतो मला आठवते.
समोरच्या बोळीत छत्रे कंपनी रहायची . चेहऱ्यावर रबराचा मास्क चढवून भो करुन ते मला एकसारखे गंमतीने घाबरवत रहायचे. एकदा तर दक्षिणेकडून उगवलेल्या लालसर चंद्राकडे बोट दाखवून तो बघ आला तुला खायला म्हणून घाबरवले तेव्हा मी धूम ठोकून आईकडे आलो होतो तेव्हा आईने त्यांना चांगलेच दटावले होते. त्याच घरात नगरसूलच्या सकडे आजीने मला बाहेरील मोरीत पायांवर पालथे पाडून तेल लावून चोळून चोळून आंघोळ घातलेली होती. कितीतरी आठवणी मनात गर्दी करतात.8/4/2018
@विलास आनंदा कुडके
No comments:
Post a Comment