SarjanSpandan

Search results

Thursday, June 3, 2021

आईच्या आठवणी 17(10/4/2018)

 #आईच्या आठवणी

       आठवणी व्याकुळही करुन टाकतात. मन आक्रंदायला लागते. डोळे एकसारखे भरुन येतात. काही केल्या पाणी खळत नाही. असाच तो कालावधी होता. गाणगापूरहून आतेमामा, आत्या, सावत्र भाऊ बहीण परतले.

         सुरुवातीला ते गोदावरी ओलांडायची नाही म्हणून मधल्या होळीत बुधा हलवाई आणि गोरख पान गादीच्या गल्लीत भाड्याने खोली घेऊन राहिले. आई डब्यात पीठ घेऊन त्यांना नेऊन द्यायची. बरोबर मीही असायचो. एके दिवशी ते लाटेवाड्यात परतले. आतेमामाने दाढी वाढवलेली होती. आत्या छातीतील कर्करोगाने ग्रासलेली होती. फार मायाळू. मी कधी आईबरोबर गाणगापूरला जायचो तेव्हा ती मायेने इलास हाक मारुन जवळ घेऊन डोक्याला तेल लावून द्यायची. मोठा सावत्र भाऊ मठात तिर्थ द्यायला होता. मठात भक्तांकडून मिळणारे पेढे नारळे घरी घेऊन यायचा. काही भक्त सोन्याची साखळी अंगठी द्यायचे ते त्याच्या गळ्यात बोटात असायचे. सकाळी आंघोळ करुन सोवळे नेसून तो मठात जायचा. मठाच्या देवडीवर पहाटेपासून चौघडा झडायचा.

            दगडी फरशांचे आवार होते. मठासमोर उंच मंडप होता. आत्या कधी कधी सायंकाळी आरतीला त्या मंडपावर चढून जायची व तरातरा खाली उतरायची. तेव्हा ती खाली पडेल की काय म्हणून फार भिती वाटायची. भाऊ मला उंच उचलून झरोक्यातून नृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका आणि त्रैमूर्तीचे दर्शन घडवायचा. मठा बाहेर तसबीरींची दुकाने होती. तिथे मी एकेक तसबीर निरखित हरखून जायचो. गुरुचरित्राच्या सुट्ट्या अध्यायांच्या पुस्तकांवर दत्तात्रेय महाराजांची चित्रे मनमोहक असायची. दुपारी सगळे बारा ते साडेबारा या दरम्यान माधुकरी मागायला निघायचे. घरोघर ओट्यावर माधुकरी मागायला आलेल्यांना शेंगदाणे गुळ भाजी पोळी वरण भात असे काही काही पदार्थ माधुकरी म्हणून वाडग्यात वाढायचे. पाच घरी माधुकरी मागितली की मिळेल त्यावर रहायचे असा नियम होता. घरी स्वयंपाक नव्हता. पहाटे उठून सर्व भीमा अमरजा संगमावर आंघोळीला जायचे. तिथे भस्माचा डोंगर होता. आई नेहमी तेथून घरी घेऊन जाण्यासाठी भस्म घ्यायची. वाटेत दत्तात्रेय महाराजांचा विश्रांती कट्टा लागायचा.

         मठात चंदन केसर कापूर यांचा दर्वळ असायचा. दर्शनाला आलेल्या सेवेकरयांच्या प्रदक्षिणा चालू असायच्या. आवारात गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले सेवेकरी असायचे. कधी मठातून दत्तात्रेय महाराजांची पालखी निघायची. मोठे अद्भुत वातावरण होते ते.

        आत्या घरी आली ती अंथरुणाला खिळूनच होती. एके दिवशी मी झोपेत असताना सगळ्यांचे रडण्याचे आवाज ऐकू आले. आत्या गेली होती. तिला हिरवे पातळ हिरवा चुडा तोंडात विडा असे अंगणात सजवून ठेवले तेव्हा सर्व हंबरडा फोडत होते. मला काहीच समजत नव्हते पण मीही गलबलून गेलो होतो. आतेमामा धायमोकलून रडत होते. सर्वच रडत होते. नंतर लक्षात आले की आत्या आता उठणार नाही. तिला चौघांनी खांद्यावर नेले तेव्हा आईने मला जवळ घट्ट धरुन ठेवले होते. मृत्यू म्हणजे काय हे कळत नसलेल्या वयात एवढ्या जवळून पाहिलेला तो पहिलाच मृत्यू होता. 

             आत्या गेल्यानंतर आतेमामा भाऊ बहीण आणि आम्ही एकत्र त्याच घरात राहू लागलो. मधेच कशावरुनतरी बिनसले. आईने सगळी पितळी भांडी कुंडी भोईरवाड्यात आजीच्या घरी नेऊन ठेवली. आम्ही त्या वाड्यातून निघून आजीकडे रहायलो गेलो. आई मग दिवसभर भाड्याची खोली शोधायला बाहेर जायची. चरण पादुका रोडला बोराडे यांच्या सीता स्मृती वाड्यात पहिल्या मजल्यावर एक खोली मिळाली. तीस रुपये महिना भाडे होते. तेथून मी श्रीराम विद्यालयात जायचो.

         एकाएकी आईला पोटात त्रास सुरु झाला. ती म्हणायची कोणीतरी पोटात शिंगं मारतय. अनेक ठिकाणी दाखवून झाले पण त्रास काही कमी होत नव्हता. राणा प्रताप चौकात एक धोबी होता. त्याच्या घरी ती जायची. तो काहीतरी उपचार करायचा पण गुण येत नव्हता. कोणीतरी सांगितले मेनरोडकडे विश्रामबागेत एक नाथपंथी आहे. तिथे गुण येईल. आई मला तिथे घेऊन जायला लागली. केशवपुरी गोसावी संसारी होते. नाशिकरोडला प्रेसमध्ये होते. गोसावी वाडीत त्यांचे घर होते. ते भक्तांसाठी विश्राम बागेत यायचे. छोटीसी खोली होती. धुनीजवळ देव्हारयात सप्तशृंगीची पितळी मूर्ती होती. ते बसायचे तिथे पाठीमागे त्यांच्या गुरुची तसबीर होती. तसबीरीत भगव्या वेशात दाढी वाढवलेले ते नाथपंथी साधू होते. केशवपुरी महाराज ब्रिस्टॉल सिगारेट ओढायचे. येणाऱ्या भक्तांना आयुर्वेदीक औषधे विनामोबदला द्यायचे. सप्तशतीचे पाठ करायचे. तेवढ्याशा खोलीत भिंतीवर सगळ्या देवदेवतांच्या तसबीरी लावून ठेवलेल्या होत्या. त्रिकाळ ते सर्व देवांना धूप अगरबत्ती करायचे. गुरुवारी भक्तांची गाऱ्हाणी ऐकून उपाय सांगायचे. त्यांच्या अंगात भगवे जाकीट आणि धोतर असा वेष असायचा. दाढी केलेली असायची. त्यांच्या कानावर दाट केस होते. त्यांच्या पायावर डोके ठेवायला आई सांगायची. वडीलही बरोबर असायचे. तेही त्यांच्या पायावर डोके ठेवायचे. एके दिवशी त्यांनी आम्हा सर्वांना अनुग्रह दिला. मला गुरुसाठी फळ सोडायला सांगितले तेव्हा मी म्हटले नारळ तेव्हा म्हणाले नारळ नको. मग तुला प्रसाद खाता येणार नाही. कसेबसे सगळी फळे आठवून शेवटी मी रामफळ सोडले. गुरुपौर्णिमेला गोसावी वाडीत त्यांचा मोठा उत्सव असायचा. त्या दिवशी ते सर्व जमलेल्या भक्तांना अध्यात्मिक उपदेश करायचे. मालपुव्याचा प्रसाद द्यायचे. तेव्हा मला गुरु म्हणजे काय ते तितकेसे कळत नव्हते. त्यांनी एकदा विचारले तू गुरु का केला. मी म्हटलं मला ब्रम्ह ज्ञान हवे. आईकडून ऐकलेला शब्द तेव्हा मी उच्चारला तेव्हा ते माझ्या लहान वयाकडे पाहून नुस्तेच हसले होते.

                   आईचा त्रास दिवसेंदिवस वाढत गेला. स्वयंपाकसुध्दा तिला करता यायचा नाही. मला शाळेत जायचे असायचे तेव्हा ती मला ताटात दूध पोहे साखर घालून द्यायची. कधी कधी वडील स्वयंपाक करायचे. नंतर नंतर ती गुडघ्यात डोके खुपसून बसायची. तिला होत असलेल्या त्रासाची कल्पना येत नसायची. चिडचिडेपणाही वाढला होता. एकदा मी स्काॅलरशीपला बसायला फीचे पैसे मागायला लागलो तर ती वैतागली. काही मिळायचे नाही पैसे. निबंधाच्या वह्यांनाही पैसे मिळेना. मला वर्गात तोंड दाखवायची लाज वाटू लागली. एके दिवशी आईचे व वडीलांचे कशावरुनतरी कडाक्याचे भांडण झाले. वडील मला घेऊन घराबाहेर रात्री एक सतरंजीची वळकटी घेऊन बाहेर पडले. जिना उतरुन आम्ही खाली ओट्यावर आलो. शेवग्याचे झाड होते. खरं तर वडीलांना रागाच्या भरात असताना मला घेऊन कुठेतरी दूर जायचे होते.

पण आम्ही रात्रभर डासांचा मारा सहन करीत शेवग्याखाली ओट्यावर सतरंजी अंथरुन आणि तिच थोडी अंगावर ओढून झोपलो पण आई काही जिना उतरुन खाली आली नाही कुठे गेले ते पहायला. आईला वडीलांचा स्वभाव माहित होता. कितीही भांडले तरी ते एकवेळ त्यावेळी घराबाहेर जातील पण घर सोडून जाणार नाही.

माझे सातवीचे वर्ष होते. घर सोडून गेलो तर माझ्या शिक्षणाचे काय असा वडीलांना प्रश्न पडला असावा. सकाळी पुन्हा जिना चढून आम्ही दरवाजा ठोठावला. आईने दरवाजा उघडला. म्हणाली फिटली का हौस. बोराडे आठवतात. पत्नी गेल्यानंतर एकटेच भाड्याने दिलेल्या खोल्यांची देखरेख करीत असायचे. रात्री दहाला लाईट बंद म्हणजे बंद असा त्यांचा दंडक होता. मेन स्वीच दहाला आॅफ करण्यापूर्वी ते सर्वत्र फिरुन जेवणं झाली का असे विचारायचे. त्यांची मुलगी आमच्या शेजारीच रहायची. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती. ते काही खायचे झाले की दोन्ही हातांनी लपवून खात. शेजारी एक शिक्षक होते. ते सदाचार चिंतामणी पुस्तक वाचत असायची. मलाही बोलावून वाचून दाखवायचे. अशा एकेक आठवणी.

@विलास आनंदा कुडके 

No comments:

Post a Comment

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...