SarjanSpandan

Search results

Sunday, August 8, 2021

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन


         वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपेक्षित बसगाडी येईपर्यंत, अपेक्षित व्यक्तीची वाट पाहताना वेळ कसा घालवावा असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल. लहानपणी शाळा सुटायच्या आधी घंटा होण्याची वाट पाहताना वेळ जाता जात नाही याचा तुम्ही अनुभव घेतला असेल. एरव्ही भराभर सरणारा काळ त्यावेळी सरत कसा नाही या प्रश्नाने तुम्हाला भंडावून सोडलेले असते. उगाचच दोन्ही हातांच्या घड्या घालून वेगवेगळ्या कोनातून बदलून व कळ लागलेल्या पायांची अनावश्यक हालचाली करुन तुम्ही न जाणाऱ्या वेळेबद्दल बोटेही मोडून पाहिलेली असतील. उगाचच जांभाई दिलेली असेल. “श्या” या निरर्थक शब्दाने तुमच्या ओठांचा उंबरठा तुमच्या नकळत कितीदा ओलांडला असेल. हातात सैल पट्‌ट्याचे घड्याळ असेल तर उगाचच मनगट वर खाली करुन पाहिले असेल. हाताशी येईल ते गवत, फुल, पान उगाचच तोडून त्याच्याशी खेळून पाहिली असेल. इतकेच कशाला हाताशी एखादा दगड लागला असेल. तर तो जवळच्या जलाशयात फेकून सहज उठणाऱ्या गोल तरंगाकडे वेड्यासारखे पाहिले असेल. जलाशय नसेल तर हा हाताशी आलेला दगड कुठे भिरकवावा याही प्रश्नाने तुम्ही बुचकळ्यात पडला असाल. 

  वेळ जेव्हा भराभर सरतो तेव्हा कळत नाही. मात्र वेळ जाता जात नाही तेव्हा मात्र अगदी वेड्यासारखी अवस्था होऊन जाते. काहींना वेळ पुरत नाही तर काहींचा वेळ जाता जात नाही अशी विलक्षण परस्पर विरुध्द टोकाची विषमता सर्वत्र आहे. काहींना विनाकारण वेळ गमवावा लागतो. तर काही कमी वेळात उंच भरारी मारुन जातात. ज्यांनी कशाला तरी “वाहून” घेतले आहे. त्यांना वेळेचे भानही राहत नाही. प्रश्न पडतो तो ज्यांचा वेळ जाता जात नाही त्यांचा. तसे पाहिले तर आजकाल याही प्रश्नाची तीव्रता आंतरजाल, भ्रमणध्वनी इत्यादी वेगवान सुविधांमुळे कमी झाली आहे. तुमची कामे पूर्वी इतकी वेळखाऊ राहिलेली नसल्याने जास्तीत जास्त वेळ तुम्हाला घालवायला उपलब्ध झालेला आहे. 

  प्रदीर्घ प्रवास असेल तर लोक एकसारखे आडवे पडून झोपलेले तरी असतात. नाहीतर येईल ते वेफर्स, कुरकुरे, बिस्कीटे, चहा, कॉफी, आईस्क्रीम इत्यादीमध्ये आपल्या जीभेला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रवास वेळ घालवण्याचा मोठा प्रश्न असतो. काही एकसारखे एका जागी बसता येत नाही म्हणून सतरा वेळा दरवाजापर्यंत ये-जा करीत असतात. तिथे वेगळी हवा लागते का ते पाहत असतात. ज्यांना कुठेही कोणत्याही अवस्थेत झोप लागू शकते. त्यांना वेळ कसा घालवावा हा प्रश्न अजिबात पडत नाही. अगदी रंगलेल्या गप्पा ऐकता ऐकता हो हो म्हणता ते सहज निद्रिस्त होऊन स्वप्ननगरीचा फेरफटका मारुन पुन्हा पुढच्या संवादाला टाळी द्यायला डोळा उघडून हजर होऊ शकतात.

  अचानक वीज गेल्यावर वेळ घालवणे अतिशय जिकरीचे असते. पंख्याने किंवा वातानुकूलित यंत्राने साथ देण्याचे सोडल्याने जी तडफडण्याची अवस्था असते ती अगदीच असह्य अशी असते. नैसर्गिक हवेची फारशी सवय नसलेल्यांची तर अशा वेळी हमखास पंचायत होऊन बसते. महागड्या अत्तराच्या वासात धर्मबिंदूंचा वास तसे सगळे विचित्र होऊन बसते. मग अशा वेळी उगाचच ती असेल तर ओढणीने पदाराने वारा घेत फेऱ्या मारणे किंवा तो असेल तेवढेच निमित्त साधून जागेवर पोबारा करणे असे चित्र हमखास पाहायला मिळते. जसे काही वीज गेली तर ती येईपर्यंत आपण जगूच शकत नाही असे किमानपक्षी ज्याला त्याला दाखवल्याशिवाय आपले समाधानच होत नाही. वीज गेलेली असूनही काहीच फरक न पडलेल्यांकडे मग सगळे अशा विचित्र नजरेने बघतात की तो माणूसही आपल्याला सहज मागील कित्येक शतकांपूर्वीचा मागासलेला वाटू लागेल. 

  आणखी एक वेळ जाता जात नाही असे ठिकाण म्हणजे जिथे मारायला एकही माशी नसते. हातपाय न हलवता गिळायची सोय असलेल्यांना न जाणाऱ्या वेळेची समस्या अधिक भेडसावते. काही ठिकाणी तर कामच नाही तेव्हा तर भयाण परिस्थिती असते. काम नसतांना आपण कामात आहोत असे पाहणाऱ्याला एकसारखे भासवत राहणे वाटते तितके सोपे काम नाही. सतत घड्याळाच्या काट्यावर नजर ठेवणे, हाताने काहीतरी खालीवर करत राहणे, संधी मिळाली की आंतरजालावर फिरून येणे, आपल्याला पत्ते गेम खेळता येतात की नाही त्याची चाचणी घेणे मात्र हे सर्व करीत असताना नाकावर सोनेरी काड्यांचा चष्मा असा काही सरकवून ठेवायचा व वर गंभीर मुद्रा करुन बसायचे पाहणाऱ्याला असे वाटेल की, ते जणू काही देशाचा अर्थसंकल्पच तयार करीत आहेत.  कोणाच्या लक्षात येणार नाही असा बेमालूम वेळ घालवणारा माणूस तुम्हाला कोठे दिसला तर त्याला गुरु मानले पाहिजे. कारण ज्याला वेळ घालवता आला तो जिंकला. नाहीतर मर-मर कितीही मेले तरी वेळ काही तुम्हाला हसायला, रडायला, गप्पा मारायला, चकाट्या पिटायला मोकळी संधी देणार नाही आणि तुम्ही त्या गोष्टींच्या अवर्णनीय आनंदापासून वंचितच राहाल. आपण या जगात येऊन काय केले हा प्रश्न ज्याला वेळ पुरत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे. पण “इतके करुनही शेवटी काय मिळवले” असा प्रश्न शेवटपर्यंत पडू नये म्हणून वेळ घालवण्याची कला आत्मसात केलीच पाहिजे !

  वेळ घालवणे फारसे अवघड नसते. ज्यांचा अजिबात वेळ जात नाही असे मित्र तुम्ही जोडले पाहिजेत. त्यांच्याबरोबर   शॉपिंगला, रेसला, क्लबमध्ये, जिममध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचे बेत आखले पाहिजेत. त्यांच्यावर वाट्टेल तेवढा पैसा उडवण्याची तुमची तयारी असली पाहिजे. कारण अशा मित्रांचा जर तुमच्यासोबत वेळ तऱ्हेने घालवला गेला नाही तर असे मित्र गमवण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. पुन्हा पैसा असून वेळ कसा घालवावा असा प्रश्न तुम्हाला भेडसावू लागेल आणि असा प्रसंग शत्रूवरही येऊ नये. यासाठी वेळ घालवण्याची कला जमल्यास जन्मजात आत्मसात करण्याची निकड आहे. कामाचा उपदेश करणाऱ्यांकडे तुम्ही सोयीस्कर दुर्लक्ष करुन अशा मित्रांसोबत खुशाल चकाट्या पिटल्या पाहिजे, टिवल्या बावल्या केल्या पाहिजे, उणी-दुणी काढायला आजू-बाजूला खुप उदाहरणे असतात. तीही हौस या मित्रांसोबत तुम्ही भागवून घेतली पाहिजे. स्वत:ला चमकवायचे असेल तर इतरांवर गर्द अंधार करायला शिका. त्यासाठी वाट्टेल ते करा. लावालाव्या करा, चहाड्या करायला शिका कदाचित तुम्हाला हे पटणार नाही. पण त्याशिवाय तुमचा वेळ चवी-चवीने आनंदात जाणार नाही. तुम्हाला गंभीर आणि प्रौढ बनवणाऱ्या, डोक्यावरचे केस कमी करणाऱ्या किंवा अकाली डोक्यावर चांदी पेरणाऱ्या “जबाबदारी” “कर्तव्य” यासारख्या जड जड शब्दांपासून तुम्ही चार हात लांब असले पाहिजे. तसेच खूप गंभीर उपदेश करणाऱ्या लोकांपासून तुम्ही कोसभर दूर राहिले पाहिजे. मुळात तुमचा वेळ हा आनंद उपभोगण्यासाठीच आहे. एरंडाकडे पहा त्यांच्यासारखे वाढत रहा. हत्तीकडे पहा त्यांच्यासारखे मस्तवाल बना. इतरांची काळजी करण्यापेक्षा इतरांनी तुमची काळजी घेतली पाहिजे असे तुमचे इप्सित असले पाहिजे. एवढी कला आत्मसात करायला मात्र तुम्हाला थोडा वेळ वाया घालवण्याशिवाय गत्यंतर नाही !  

@विलास आनंदा कुडके

0 0 0 0 0  0

Tuesday, August 3, 2021

मैत्री आणि प्रेम

 *मैत्री आणि प्रेम....*


            ‘इक लब्ज मोहब्बत का अदनाई फसाना है, सिमटे तो मोती, फैले तो जमाना है’ असे एका शायराने प्रेमाबद्दल सुंदर लिहिले आहे.  एकाशी होते ते प्रेम आणि जगाशी होते ती मैत्री.  एकाच प्रेमाची ही दोन रुपं.  प्रेम आपल्या आयुष्यात वेगवेगळया वयात, वेगवेगळया रुपात प्रकटत असते.  पहिल्यांना जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा आपल्या रडण्याची वाट पहात असलेल्या आईच्या डोळयातील आनंदाश्रूंच्या रुपाने दुग्ध धारांतून प्रेम भेटते.  वाकड्या वाटेवरुन सरळ रस्त्यावर शिस्तीत चालायला लावणाऱ्या बापाच्या धाकात आपल्यादा प्रेम भेटते.  ज्यांचे रुप, रंग वगैरे काहीही न पहाता आपले मन जुळते त्या मित्रांच्या/सवंगड्यांच्या रुसव्या फुगव्यात प्रेम भेटते.  राखी बांधून घेणाऱ्या भावाच्या मनगटात प्रेम भेटते.  कितीतरी अशी नाती.. अनामिकही.. आपल्याला प्रेम भेटतच असते. 


            प्रेम हा खरेतर एक समुद्र आहे.  सर्वत्र जीवनसाखळयांमध्ये प्रेम हीच प्रेरणा आहे.  मोराचा पिसारा फुलविणे असेल, सुगरणीचे घरटे बांधणे असेल, एखाद्या पक्षाचे शीळ घालणे असेल. सर्वत्र प्रेम आहे.  प्रेमाच्या या समुद्रातील एक थेंबसुद्धा आपण आपल्या आयुष्यात स्वीकारलेला नसतो.  आपली संकुचित दृष्टी हा प्रेमाचा असीम समुद्र पाहूच शकत नाही. 


            जोपर्यंत आपली मैत्री होत नाही, आपण प्रेमात पडत नाही तोपर्यंत मैत्री आणि प्रेम यात पुसटशी सीमारेषा आपण आखून घेत असतो.  ‘छे, छे, प्रेमात वगैरे नाही, आम्ही निव्वळ मित्र आहोत आणि केवळ मैत्री आहे’ असे आपण शंकेने पाहणाऱ्याला खुलासे करीत राहतो.  पण खरेच या दोन्ही गोष्टी वेगळया आहेत का?


            कोणी म्हणते आधी मैत्री होते आणि तीच प्रेमाची सुरुवात असते.  म्हणजे मैत्रीचे सुरवंट प्रेमाच्या फुलपाखरांमध्ये रुपांतरित होते.  प्रेम तुटू शकते, प्रेमभंग होऊ शकतो पण मैत्री अतूट असते.  मैत्री प्रेमाच्याही पलिकडे निरंतर राहते, असे आपल्याला वाटते.  प्रेमात माणूस ‘पडतो’ तर मैत्रीत तो ‘उभा’ राहतो.  प्रेम ‘शापित' असते.  जो प्रेमात पडेल त्याच्या विरोधात सगळी कायनात उभी राहते.  चौबाजूने विरोध, संघर्ष, संकटे यांना त्याला/तिला सामोरे जावे लागते.  प्रेमाचा सहजासहजी कोणत्याही समाजात स्वीकार होत नाही.  प्रचंड विरोध होतो.  प्रसंगी प्राणही गमवावे लागतात.  याउलट मैत्री एक अलौकिक देणगी ठरते.  जो प्रेमात पडला त्याने आपले सुख चैन गमावलेले असतात.  वर ज्याच्या प्रेमात पडला त्याचेही रंजोगम परेशानी तो मागून घेतो.  या प्रेमाचा शेवटही काय होतो.  “एक दुजे के लिए” या चित्रपट आला तो पाहून त्याकाळात कितीतरी प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्या.  अलिकडेच “सैराट” सारख्या चित्रपटातूनही प्रेमाची शोकांतिका दाखवण्यात आलेली आहे.  प्रेमाचा सुखांत झाल्याचे एकही उदाहरण नाही.  प्रेमात शेवटी भंग, ताटातूट किंवा लग्न हे ठरलेलेच.  लग्न म्हणजे व्यवहार आणि व्यवहार आला की प्रेम कापरासारखे उडून जाणार हे ठरलेलेच.


आपल्याला आठवेल की लग्न जुळेपर्यंत व लग्न झाल्यानंतर नवखे दिवस इतकेच प्रेमाचे क्षण आपल्या आयुष्यात आलेले असतात.  नंतर संसाराचा रहाट गाडग्यात या प्रेमाचा कधी विसर पडतो आपल्याही लक्षात येत नाही.  संसाराचा गाडा ओढतांना दोघांना चाकांची भूमिका घ्यावी लागत असेल तर एकमेकांकडे पाहायला आयुष्यभर फुरसतही मिळत नाही.


            काहींच्या बाबतीत “चवळीची शेंग” पाहून झालेली प्रेमाची सुरुवात भोपळयात कधी रुपांतरित होते कळतही नाही.  रशियात “फुलदाणी”शी झालेले प्रेम, लग्नानंतर त्याचा ‘रांजण’ झाल्यावर त्यात फुलेही उरत नाही.  तो आणि ती यांच्यातील प्रेम तेवढे आपण प्रेम मानतो त्यामुळे प्रेम म्हटले की ‘छे छे आपण नाही बुवा’ म्हणून जो तो कानावर हात ठेवत असतो आणि तितकेच कुठे प्रेमाचा झरा, कवडसा मिळतो का त्याचा जगाच्या नजरा चुकवून शोधही घेत असतो.  काहीच मिळाले नाही तर कोल्‌हयासारखा आंबट चेहरा करुन म्हणतो की प्रेमाच्या वाटेला जायला नको!


            प्रेमाच्या आपल्या कल्पनाही धुर्कट झालेल्या, नंबर वाढलेल्या चष्म्यासारख्या असतात.  खऱ्या प्रेमापेक्षा लोक बेगडी प्रेमात हरवलेले असतात.  महागडे भेट देईल ते खरे प्रेम अशी आपली प्रेमाची स्वस्त व्याख्या असते.  कोणाकडून आपण अधिकाधिक सुखी होऊ असा शोध या प्रेमाच्या वाटेवर घेत असतो.  आपल्या प्रेमाला स्वार्थ चिकटलेला असतो.  त्या स्वार्थाची पूर्तता झाली नाही की प्रेमही उरत नाही.  पहिले प्रेम, दुसरे प्रेम अशा मालिका मग आपण करीतच राहतो.  एवढेही करुन खरे प्रेम आपण मिळवतो का?  तर नाही.  कारण खरे प्रेम आपण पाहिलेलेच नसते.  कल्पना करा स्वत: छिद्रे पडेपर्यंत एकच गंजीफ्रॉक वापरुन मुलाबाळांची हौस पुरवणारा भले कधी I Love You म्हणत नसेल, परिस्थितीमुळे कधी साधी वेणीही घेऊ शकत नसेल, रात्रंदिवस काबाडकष्ट करीत असताना साधी विचारपूसही करु शकत नसेल, जोडीदार येईपर्यंत उपाशी राहणारी ती असेल, पण त्या दोघात प्रेम नाही असे कसे म्हणता येईल.


            खऱ्या प्रेमाची ओळख नसल्यानेच “प्रेम भंग” ताटातूट, घटस्फोट होत राहतात.  पहिल्या नजरेत होईल ते प्रेम असे नसते.  सुखदु:खात एकमेकांसोबत एकमेकांचे होऊन जाणे, एकमेकांना आधार देत संसार करणे हेही प्रेमच म्हणावे लागेल.  जोडीदारासाठी आपल्या डोळयात अश्रू जपून ठेवते ते प्रेम.  प्रेम म्हणजे काय फक्त त्याचे आणि तिचेच असते का?  मुलीला सासरच्या मंडळीबरोबर पाठवणी केल्यानंतर मांडवात एकटाच कोपऱ्यात रडणारा बाप, जेवले असे खोटेच सांगून मुलासाठी टोपल्यात भाकर शिल्लक ठेवणारी आई, हक्काच्या साडीसाठी भावाबरोबर भांडणारी बहीण, शिकवता शिकवता घराचीही चौकशी करणारे गुरुजी, प्रेम कोठे नाही?  दोन मित्रांमध्येही असेत ते प्रेमच!  प्रेम सर्वव्यापक आहे.  आपल्या भोवतालचा निसर्ग, सृष्टी हीही नकळत जीव मात्रावर प्रेमच करीत असते.  एक आपणच असे असतो की जीवनाला वैतागतो, हैराण होतो.  आपले प्रेम फक्त स्वत:वर, स्वत:च्या गरजांवर असते.  निसर्गावर, सृष्टीवर उलट प्रेम करायला आपले हृदय तितके विशालही कधीच नसते. 


            मित्रप्रेम म्हटले की कृष्ण सुदाम्याचे उदाहरण दिले जाते आणि प्रेमाचे उदाहरण द्यायचे झाले तर राधा कृष्णाचे उदाहरण दिले जाते.  एकदा रुख्मिणीने रागाने कृष्णाला उष्ण दूध नेऊन देतांना विचारले “मिही तुमच्यावर प्रेम करते.  पण तुम्हाला मेले त्या राधेचेच कौतुक”  काय फरक आहे तिच्यात आणि माझ्यात.  कृष्ण म्हणाले “तूच जाऊन बघ फरक” तशी रुख्मिणी फणकाऱ्याने राधा जिथे होती तिथे महालात जाते.  तिला महालाच्या द्वाराशीच अतिशय सुंदर स्त्री दिसते.  रुख्मिणीला वाटते तिच राधा असावी.  पण ती निघाली तिची दासी.  दासीच जर इतकी सुंदर तर राधा किती सुंदर असेल या विचाराने ती अंत:पुरात राधेपर्यंत पोहोचते.  तो तेथील दासींची पळापळ सुरु असते आणि राधेच्या कोमल गळयावर आतून भाजल्यासारखे बाहेर व्रण उमटलेले होते.  दासींकडून कळाले की तिने सकाळी उठल्यापासून काहीच घेतलेले नव्हते.  तेव्हा रुख्मिणीला आठवले आपण कृष्णाला उष्ण दूध दिले होते.  मनोमन तिला ती आणि राधेतील फरक कळतो, अशी ती प्रेमाची कथा.  प्रेम अनंत प्रेम कथाही अनंत!  आपली प्रेमाची भूक ही खऱ्या प्रेमाची भूक नाहीच.  ती आहे आपल्या पंचेंद्रियांची भूक.  त्या पलिकडे आपल्या आत्म्याला कधीही भूक लागत नाही.  म्हणून आपण खऱ्या प्रेमापासून वंचित राहतो. 


            रवींद्रनाथ टॅगोर यांची ‘काबुलीवाला’, प्रेमचंद यांची ‘इदगाह’, एच.ई.बेट्स यांची ‘तिच्या हृदयाची हाक’, गाय दी मोपासा यांची ‘चंद्रिका’ यासारख्या साहित्यातून खऱ्या प्रेमाची ओळख अनेक साहित्यिकांनी करुन दिलेली आहे.  ज्ञानेश्वर माऊलींनी तर आपल्या पसायदानात ‘मैत्र जीवांचे’ मागितले आहे.  संत तुकडोजी महाराजांनी ‘मित्रा! कर मैत्री त्यासी जो सत्यविन शब्द न बोले सहजहि कोणासी/ सहनशीलता, सरळ वृत्तिची, वागणूक ज्याची/अपुले दु:ख न वदे कुणाला, चिंता इतरांची/चरित्र निर्मळ, राहणी साधी, निंदी न कवणासी, दिनचर्या सततची योग्य ती, हाव न मानाची, दिन दिनांची प्रगती करण्या, कमाल निष्ठेची’ असा मित्र जोडण्यासाठी सुचविले आहे.  मैत्री आणि प्रेमाबद्दल समाज माध्यमांमध्ये अनेक सुविचार मैत्री दिनाच्या निमित्ताने आपल्या वाचनात येतात.  त्यामध्ये मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात.  प्रेम ही सुंदर भावना आहे कारण ती हृदयातून येते पण मैत्री त्याहून अधिक सुंदर आहे कारण ती हृदयाला आधार देते.  एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात, म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात.  मनावरचं ओझं हलकं करण्याचे ठिकाण म्हणजे मैत्री!!!  असे कितीतरी सुविचार आपले मन सुखावून टाकतात.  मन उदात्त सुंदर करीत राहतात.  तरीही प्रेमाची आणि मैत्रीची परिपूर्ण व्याख्या अपूर्णच आहे.@विलास कुडके

Friday, July 23, 2021

गुरु पौर्णिमा

 #गुरु पौर्णिमा


        आईसोबत कानमंत्र घेतला ते नाथपंथी केशवपुरी गोसावी महाराज मला आज आठवतात. मधुकर चित्रमंदिर टाॅकीजमागे विश्रामबागेत एक छोट्याशा खोलीत धुनी व जवळच सप्तशृंगी मातेची व्हितभर पितळी मूर्ती असलेला छोटा देव्हारा. तिथेच ते भक्तशिष्य यांच्यासाठी आसनावर बसलेले असायचे. ते संन्यासी नव्हते. संसारी होते. त्यांना ब्रिटाॅल सिगारेट लागायची. देवी भक्त होते. सप्तशतीची कितीतरी अनुष्ठाने आणि पारायणे त्यांनी केलेली होती. काही भक्तांच्या घरी जाऊन ते नवचंडी वगैरे पूजा करायचे. अर्धी भगवी कोपरी. दोन्ही कानांवर भरगच्च केस. दाढी मिशी काढलेली. एकटांगी धोतर असा त्यांचा वेष असायचा. ते नाशिकरोडला शिखरे गल्लीत रहायचे. दत्त जयंती, गुरु पौर्णिमा या उत्सवप्रसंगी सर्व भक्तमंडळींना ते शिखरेवाडीतील घरी दर्शन उपदेश द्यायचे.

              केशवपुरी गोसावी संसारी होते. नाशिकरोडला प्रेसमध्ये होते. गोसावी वाडीत त्यांचे घर होते. ते भक्तांसाठी विश्राम बागेत यायचे. छोटीसी खोली होती. धुनीजवळ देव्हारयात सप्तशृंगीची पितळी मूर्ती होती. ते बसायचे तिथे पाठीमागे त्यांच्या गुरुची तसबीर होती. तसबीरीत भगव्या वेशात दाढी वाढवलेले ते नाथपंथी साधू होते. केशवपुरी महाराज ब्रिस्टॉल सिगारेट ओढायचे. येणाऱ्या भक्तांना आयुर्वेदीक औषधे विनामोबदला द्यायचे. सप्तशतीचे पाठ करायचे. तेवढ्याशा खोलीत भिंतीवर सगळ्या देवदेवतांच्या तसबीरी लावून ठेवलेल्या होत्या. त्रिकाळ ते सर्व देवांना धूप अगरबत्ती करायचे. गुरुवारी भक्तांची गाऱ्हाणी ऐकून उपाय सांगायचे. त्यांच्या अंगात भगवे जाकीट आणि धोतर असा वेष असायचा. दाढी केलेली असायची. त्यांच्या कानावर दाट केस होते. त्यांच्या पायावर डोके ठेवायला आई सांगायची. वडीलही बरोबर असायचे. तेही त्यांच्या पायावर डोके ठेवायचे. एके दिवशी त्यांनी आम्हा सर्वांना अनुग्रह दिला. मला गुरुसाठी फळ सोडायला सांगितले तेव्हा मी म्हटले नारळ तेव्हा म्हणाले नारळ नको. मग तुला प्रसाद खाता येणार नाही. कसेबसे सगळी फळे आठवून शेवटी मी रामफळ सोडले. गुरुपौर्णिमेला गोसावी वाडीत त्यांचा मोठा उत्सव असायचा. त्या दिवशी ते सर्व जमलेल्या भक्तांना अध्यात्मिक उपदेश करायचे. मालपुव्याचा प्रसाद द्यायचे. तेव्हा मला गुरु म्हणजे काय ते तितकेसे कळत नव्हते. त्यांनी एकदा विचारले तू गुरु का केला. मी म्हटलं मला ब्रम्ह ज्ञान हवे. आईकडून ऐकलेला शब्द तेव्हा मी उच्चारला तेव्हा ते माझ्या लहान वयाकडे पाहून नुस्तेच हसले होते. माझे वय अकरा बारा वर्षांचे असेल. मेनरोडवरील रत्नांच्या दुकानात त्यांचा मोठा कृष्णधवल फोटो मिळायचा. त्यांच्या नाथपंथी गुरुचा फोटो ते बसायचे तिथेच मागे लावलेला होता. त्या एवढ्याशा खोलीत सगळ्या भिंतींना वेगवेगळ्या देवी देवतांच्या तसबीरी लावून ठेवलेल्या होत्या. आयुर्वेदाचा त्यांचा चांगला अभ्यास होता. ते भक्तांना उपचारासाठी आयुर्वेदीक गोळ्या भस्म इ. द्यायचे. ते सर्व सेवार्थ असायचे. एका लाकडी कपाटात धार्मिक पुस्तके ग्रंथ होते. मला काही समजत नसताना एकदा मी त्यांना मला ब्रम्हज्ञान हवे असे म्हटले तर ते माझ्या लहान वयाकडे पाहून नुसतेच हसले होते. आजच्या दिवशी त्यांचा एक फोटो देखील माझ्याकडे नाही. तो कुठे मिळत नाही. पण गुरुचरणी शत शत नमन आहे

@विलास आनंदा कुडके 

Friday, July 16, 2021

नवीन चष्मा

 #नवीन चष्मा


           चष्मा कधी लागला ते आता आठवत नाही. पण तेव्हा प्रचंड डोके दु:खायचे. कारण कळत नव्हते. डाॅक्टरांकडे दाखवले. त्यांनी गोळ्या लिहून दिल्या. गोळ्यांनी फरक नाही पडला तर डोळे तपासून घ्या असा सल्ला दिला. झालं. गोळ्या घेऊनही फरक पडला नाही. मग डोळे दाखवले. मायनस असा काहीसा नंबर होता. चष्मा बनवायला टाकला. तेव्हा मी नुकताच मंत्रालयात रुजू झालेलो होतो. एका सोमवारी मी चष्मा लावून हजर झालो तर सगळे काहीतरी नवीनच पाहतोय अशा नजरेने पाहू लागले. मला सगळ्यांच्या नजरा चुकवता येईना. दिवसभर माझ्या चष्म्याची.. दिसण्याची चर्चा होत राहिली. प्रशासन भवनमधून मंत्रालयात जाताना सिग्नल ओलांडताना मी चष्म्यातून रस्त्याकडे पहात होतो तर सगळे खालीवर दिसत होते आणि मी नक्की रस्त्यावरच पाय टाकतो ना ते चष्म्यातून पायांकडे पाहून खात्री करुन घेत होतो.

        बाॅसच्या दालनात मी चष्म्यासह प्रथमच प्रवेश केला तर बाॅसने देखिल क्षणभर चष्म्यातील माझे नवीन ध्यान पाहिले आणि 'चालायचेच' अशा नजरेने कामकाजाच्या सूचना दिल्या. दिवसभर मी कार्यालयातील स्वच्छतागृहात वारंवार जाऊन 'आपण चष्म्यावर कसे दिसतो ते पाहून घेतले' रात्री नवीन चष्म्यासह घरी प्रवेश केला तर घरच्यांनाही तो खूप आवडला. तसे पाहिले तर मी अनेकांना त्यावेळी मी चष्म्यावर पाहिले होते. चष्मा लावलेली मुले मुली अधिक बुद्धीवान आणि हुशार वाटायची. वाटायचे एकसारखे पुस्तकात डोके खुपसून या मंडळींना चष्मा लागला असावा. पहावा तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर अभ्यास आणि अभ्यासच दिसायचा. चष्म्याचा एक फायदा म्हणजे खरे डोळे कसे ते कुणाला कळतच नाही. चष्मा काढून डोळे चोळताना कुणाला पाहिले की चष्म्यातील डोळ्यांपेक्षा नुसते डोळे वेगळेच टोपसलेले भासायचे.

            काही व्यक्तिमत्त्वे केवळ चष्म्यावरुन ओळखू यायची. महात्मा गांधीजींचा गोल काचेचा चष्मा. पु ल देशपांडे यांचा काळ्या फ्रेमचा मोठा चौकोनी चष्मा. त्रिं च्य खानोलकरांचा तसाच चष्मा. जी ए कुलकर्णींचा काळ्या काचांचा चष्मा.अॅन्टान चेखव यांचा गळ्यात दोरी असलेला चष्मा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा चष्मा. खुद्द वडीलांचा साधा तपकीरी रंगाचा गोल भिंगाचा चष्मा जो त्यांनी आयुष्यात बदलला नाही. एक काडी तुटली तर त्या जागी पांढरा दोरा बांधून शेवटपर्यंत तोच चष्मा वापरला. कितीतरी चष्मे एक ओळख बनून गेले. शोर चित्रपटातील राजेश खन्नाचा चष्मा तर एक नवीन फॅशन आणायला कारणीभूत झाला.

           चष्मेबद्दूर सिनेमा लागला तेव्हा आम्हाला वाटले काहीतरी चष्मा लावलेल्या बहाद्दरचा सिनेमा असेल पण चष्मेबद्दूर वेगळाच निघाला.

        'ए चष्मिष्ट' असे चिडवायला तेव्हा खूप आवडायचे. ज्याला हाक मारली तो मग चष्म्यातून असेकाही रागाने पाहायचा की विचारता सोय नाही. पण स्वतःलाच चष्मा लागल्यावर मग गंभीर चेहरा झाला. चष्म्यामुळे पोक्त अनुभवी नजर आल्यासारखे वाटले. गप्पा गोष्टी विनोद हसणे खिदळणे यावर चष्म्यामुळे दिवसेंदिवस मर्यादा येत गेल्या. वाढत्या वयाची जाणीव रोपट्यासारखी वाढीस लागली आणि पुढे पुढे त्या जाणिवेचा केव्हा वटवृक्ष झाला कळलेच नाही. सोनेरी काड्यांच्या चष्म्याची हौस असलेले आणि डोक्यावर फरची कॅप असलेले काही माणसे तेव्हा पाहिली होती.

          अनेकदा आरशात वेगवेगळ्या चष्म्यात स्वतःला पाहण्याचा छंद असलेली माणसे पाहिली. चष्मा म्हणजे नजरिया नवीन सोच असेही परिमाण आहे. तारक मेहता का उलटा चष्मा सारख्या मालिकेतून नवीन दृष्टी देण्याचा प्रयत्न झाला. जसा चष्मा तसे दिसेल असे म्हटले जाते ते उगाच नाही

         अनेक लोकांना आपल्याला चष्मा लागलेला आहे हे दाखवायला आवडत नाही. मग हे लोक हळूच आतल्या खिशातून चोरुन चष्मा काढून नाकावर ठेवून पटकन काम करुन घाईघाईने पुन्हा लगबगीने खिशात ठेवून देताना पाहिले की मोठी गंमत वाटते. लेखापरीक्षकाचा चष्माही असाच गंमतीदार. मोठ्या नाकावर इवलासा अगदी खाली लावलेला छोटा चष्मा लावून ते मोठमोठे रजिस्टर कसे काय तपासता याचेच कौतुक वाटते.

         चष्म्याचा आणखी एक फायदा काही लोक घेताना दिसतात. बाॅस जेव्हा झापत असतो तेव्हा बाॅसच्या डोळ्याला डोळा भिडविण्याची कुणाची टाप नसते पण चष्मा लावला की जणू तो ढालच आहे असे समजून त्यातून सरळ पाहण्याचे धाडसही काही करु शकतात.

         अनेकदा मी घरी चष्मा विसरायचो किंवा ऐनवेळी चष्म्याची काडी तुटायची. अशावेळी मग कार्यालयात दोन दोन चष्मे ठेवत असलेल्या सावंताचा जाड भिंगाचा साधारणतः माझ्या नंबरपेक्षा जास्त नंबरचा चष्मा माझ्या उपयोगी पडायचा. गरजेला उपयोगी पडतो तो मित्र Friend in need is indeed या उक्तीप्रमाणे सावंतांबरोबर त्यांचा चष्माही मला माझा मित्र वाटायचा. उगाच नाही चष्म्याला 'पेरुचाच पापा' मध्ये स्थान मिळालेले आहे.

         कधी बाॅस चष्मा विसरुन आले की त्या दिवशी फाईली तिष्ठत टेबलावर साचायच्या आणि मग डोळे मिटून बाॅसला चिंतन करायला अधिक वेळ मिळायचा. त्या दिवशी बाॅसचे दालन वातानुकूलित यंत्र बंद ठेवले तरी थंड राहील असे वातावरण असायचे.

       चष्मा हा काही लोकांच्या जीवनशैलीचा भाग झालेला दिसून येतो. भाषण करताना हमखास चष्मा हातात घ्यायची व अधिक जटील विचार मांडायचा असेल तर चष्म्याची काडी तोंडात ठेवायची काहींची अगदी हमखास शैली असते. काही लोक तर कोणाला अधिक समजावायचे असेल तर तावातावाने चष्मा काढून डोळे वटारुन अक्षरशः दुसर्‍याच्या अंगावर जवळजवळ धावूनच जातात.

        बराचवेळ चष्मा लावून लिहितोय. डोळ्यांना विश्रांती दिली पाहिजे म्हणून जरा थांबतो!

        नवीन चष्मा आहे. काचा नवीन असल्या तरी नव्या कोऱ्या मुलायम कपड्याने पुन्हा पुन्हा पुसून दाखवून देतो की चष्मा नवीन घेतला आहे. प्रोगेसिव्ह ग्लासचा आहे. म्हणजे लांबचे आणि जवळचे पाहण्यासाठी एकच भिंग. 'नवीन नवीन सराव होईपर्यंत जरा नवीन वाटेल. लांबचे पहा पण जास्त लांबचेही पाहू नका' असा प्रेमळ सल्ला लक्षात ठेवून मी जरा नवीन चष्म्याची सवय करुन घेतो... तोपर्यंत तुम्हीही चष्म्याची विविध रुपे, शैली, रंग यांचा विचार करायला हरकत नाही

@विलास आनंदा कुडके

Thursday, July 1, 2021

डाॅक्टर म्हणजे देव

 *डाॅक्टर म्हणजे देव*


         जन्मापासून मरेपर्यंत एकच देव आपल्याला सातत्याने साथ देत असतो आणि तो म्हणजे डाॅक्टर! लहानपणी या देवाला मी अतिशय घाबरायचो. मला आठवते, कुठूनतरी कर्णोपकर्णी वार्‍यावर झोप उडवणारी वार्ता आली की चौकातील भेंडीखाली लस द्यायला डाॅक्टर आलेले आहेत आणि ते गल्लीतील एकेक पोराला बखोटे धरुन उचलून उचलून तिथे नेत आहेत. झाले जो तो पोर इकडे लप तिकडे लप असा लपू लागला. त्यात मीही होतो. लांबूनच बघितले तर भेंडीखाली डाॅक्टरांच्या कचाट्यात सापडलेली पोरं दंडावरच्या डागण्यांनी अक्षरशः गुरासारखी ओरडत होती, थई थई नाचत पाय झाडत होते. ते पाहून तर छातीत धस्स झालेले होते. लपायच्या नादात कुठूनतरी आई शोधत शोधत आली. तिने जवळजवळ झडपच घालून मला पकडले आणि ओढत ओढत भेंडीखाली डाॅक्टरांकडे घेऊन गेली. मरण जवळ आलेल्या डुकरासारखी माझी अवस्था झालेली होती. नाही नाही म्हणेपर्यंत आईने मला त्या डाॅक्टराच्या स्वाधीन केले तेव्हा मनात म्हटले आता संपले सगळे. तिथे बघितले तर स्टोववर छोट्या पातेल्यात पाणी थपथप उकळत होते. त्यात भल्यामोठ्या सुया बुडवून ठेवलेल्या होत्या. एकेक पोराला उचलून उचलून आणणे सुरुच होते. कोणीतरी दंड धरुन ठेवला आणि त्यावर गरम सुई जवळ जवळ डागली तसा मी गुरासारखा ओरडलो. ती खूण अजूनही दंडावर आहे. कळत नव्हते त्या वयातील हे सर्व दिव्य होते. नंतर कळाले की ती देवीची लस होती. ती घेतली नसती तर तोंडावर अंगावर देवीचे फोड येऊन चांगले मोठमोठे व्रण पडले असते. आज कळते की त्यावेळी कटू व कठोर निर्दयी वाटलेले डाॅक्टर देवच होते.

      जस जसं वय वाढत होते तस तसे डाॅक्टरांचे भय वाढतच होते. कधी तापाने फणफणलो की तापापेक्षा मला सुईची भीती वाटू लागायची आणि मग दरदरुन घाम फुटायचा. नको नको म्हणत असतानाही आई मला डाॅक्टरकडे घेऊन जायची. बरं डाॅक्टरही असा एक पेशंट झाला की उभे राहून दुसर्‍या येणाऱ्या पेशंटसाठी सुई भरायच्या तयारीला लागायचा. अशी तयारी करीत असतानांच त्याच्याकडे जायची वेळ आली की पेशंटला पाहून डाॅक्टरला आणखीच उत्साह आलेला दिसायचा. गोळ्या औषधेच द्या असे बजावलेले असताना डाॅक्टर हटकून इंजेक्शनच द्यायचे आणि मग हट्टी ताप घरी जाईपर्यंतच झरकन उतरुन जायचा. तर अशारितीने बालपणात डाॅक्टरांचा मी धसका घेतलेला होता.

      गल्लीत एक दंतवैद्याचा दवाखाना होता. काचेच्या शोकेसमध्ये कवळ्या औषधांच्या बाटल्या मांडून ठेवलेल्या असायच्या. मित्र सांगायचे तिथे वैद्य म्हणे दात उपटून काढत असतात म्हणून घाबरुन मी तिथून पळ काढायचो. न जाणो वैद्य मागे लागायचा आणि दात उपटून घ्यायचा अशी भीतीही त्यावेळी वाटायची.

       घरात त्यावेळी दम द्यायचा असला की 'थांब तुला डाॅक्टरकडेच घेऊन जाते आणि मोठ्ठी सुई मारायला सांगते' असा सज्जड दम भरला जायचा.नंतर दरवर्षी जसा पाऊस सुरु व्हायचा तसा दवाखाना ठरलेला असायचा. १९९० मध्ये अतिदगदगीने मी आजारी पडलो. वजन भराभर कमी होत गेले आणि अवघे ४६ किलो वजन झाले. डाॅक्टरचे नाव घेतले की मी हमखास नाही म्हणायचो. सहज फिरायला जाऊ म्हणून सासूबाईंनी हळूच मला नाशिकरोडच्या शिवगंगा हाॅस्पिटलला नेले. स्वतःला दाखवायच्या बहाण्याने हळूच डाॅक्टरांचा मोर्चा त्यांनी माझ्याकडे वळवला आणि मग मला घरच्यांचा कावा लक्षात आला. पण माझा नाईलाज होता. डाॅक्टरांनी मनसोक्त तपासणी केली आणि सांगितले की यांना लगेच हाॅस्पिटलमध्ये दाखल करुन घेतो.झालं. माझ्या डोळ्यापुढे तारे चमकले. सलग इंजेक्शनचे कोर्स सुरु केले. लोह वाढीच्या गोळ्या आणि टाॅनिकचा मारा सुरु झाला. रोज आलटून पालटून इंजेक्शन होते त्यामुळे मी अगदी जेरीस आलो. डाॅक्टरांच्या त्यावेळच्या प्रयत्नांमुळे मी मोठ्या गंभीर आजारातून बरा झालो. त्याबळावर मी मुंबईला अपडाऊन करुन सलग ३१ वर्षे सेवा केली. शेवटी शेवटी नोव्हेंबर २०१८ मध्ये मला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मला तातडीने जे. जे हाॅस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. अॅन्जिओग्राफी व अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली आणि पुन्हा एकदा डाॅक्टरांनी मला जीवनदान दिले. माझ्या या गंभीर जीवनमरणाच्या क्षणी डाॅक्टर देव म्हणून उभे राहिले.

      इगतपुरी पाऊसाचे माहेरघर. तिथे तर मुले लहान असताना मला पावसाळ्यात हमखास डाॅक्टरांकडे धावपळ करावी लागायची. तेथील डाॅक्टर मी पहायचो अगदी अल्प फी मध्ये स्वस्त औषध लिहून देऊन बरे करायचे. पाठीवर स्टेथोस्कोप लावून नाडीचे ठोके मोजून ते अचूक निदान करायचे. त्यांच्याकडे बहुतांश आदिवासी उपचार घ्यायला येत असायची. एकदा मी बघितले एक आदिवासी आजी फि द्यायला म्हणून कमरेला पिशवीत चाचपडत होती. कशीबशी तिने जेव्हा घडीघडीची दोन रुपयांची नोट काढली तेव्हा तिच्याकडे पाहून डाॅक्टर म्हणाले 'राहू द्या आजी. आधी बर्‍या व्हा.' आणि एवढे बोलून त्यांनी आपल्या जवळची औषध गोळ्या तिला दिल्या व कसे वाटते ते दाखवायला परत या म्हणून बजावले. फी नसली तरी चालेल असेही सांगितले. असेही माणूसकी असलेले डाॅक्टर मी इगतपुरीमध्ये पाहिले.

     आजच्या कोरोनाच्या जीवघेण्या वातावरणात डाॅक्टर स्वतःच्या जीवावर उदार होऊन रुग्णांचे जीव वाचवत आहेत. अनेकांच्या आयुष्यात डाॅक्टर देवासारखा धावून जात आहे. अशा या देवाला कोटी कोटी प्रणाम!!!

@विलास आनंदा कुडके

*न्यूज स्टोरी टुडे*

*०१.०७.२०२१*

*डॉक्टर दिन विशेष*


*- डॉक्टर म्हणजे देव* 

*✒️ टीम एनएसटी*  👇

http://www.marathi.newsstorytoday.com/डॉक्टर-म्हणजे-देव/

Sunday, June 20, 2021

एका चंदनाची कहानी

 #एक चंदनाची कहानी

            खूप एकटे एकटे वाटले की आठवणी सोबतीला येतात आणि साथ देतात. आठवणी आल्या की पाठोपाठ घळाघळा अश्रू येतात. अंधार त्या अश्रूंवर मायेने पांघरुन घालतो. अन त्या पांघरुनात हुंदकेही येतच राहतात. डोळ्यात झोप येत नाही तेव्हा आठवणीच स्वप्नांसारख्या तरळत राहतात. दिसतात पण त्यांना स्पर्श करु शकत नाही म्हणून शब्दात त्या गुंफून ठेवाव्या लागतात. कोणी म्हणेल कशासाठी या आठवणी. आठवणी या पुढील पिढीसाठी लिहून ठेवायच्या असतात. वाडवडिलांनी कसा संघर्ष केला आणि आपण कोणत्या अनुभवांचे वारसदार आहोत हे जर जाणून घ्यायचे असेल तर याच आठवणींना चाचपडून पहावे लागेल

      ते जून १९७६ ला सेवानिवृत्त झाल्यानंतर १७/११/२००२ पर्यंत त्यांचा तब्बल २६ वर्षांचा सहवास लाभला. सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन नव्हते. मला १९७८ ला नोकरी शोधावी लागली. १९८० ला मी ज्या रेडिमेड कपड्याच्या दुकानात कामाला होतो त्या दुकान मालकाची परवानगी घेऊन ११वी काॅमर्सला के टी एच एम काॅलेजला प्रवेश घेतला. सकाळी १०.३० पर्यंत पिरीएड अटेंड करुन मी दुकानात जायचो.

        ३० रुपये आठवड्याला उचल मिळायची. वडील त्यातून गहू तर गहूच आणायचे. पुन्हा दुसरा किराणा आणायचा तर पैसे नसायचे. कधी कधी आठवड्याचे ३० रुपये आणून मी मांडणीत पितळी बारीक डब्यात ठेवायचो तर कोणीतरी त्यावर हात मारायचे. मग आठवडाभर काय खावे अशी विवंचना असायची.

       तेव्हा काॅलेजला जायला मी मोठ्या हौसेने पांढरा सफारी शिवला होता. वडील पावसाळ्यात तो धुवून घरात वाळत घालायचे तर त्यावर कौलातून टपकणारया गढूळ पाण्याचे टिपके पडायचे.

          मला आठवते. त्या छोट्याशा खोलीत मी अब्राहम लिंकनचा छोटासा फोटो लावलेला होता. तसेच दाराशी हाताची घडी घातलेल्या स्वामी विवेकानंद यांची एक तसबीर होती. पुस्तकांची छोटी रॅक होती. एकदा मला मेनरोडवर एक पोस्टर आवडले ते मी पुस्तकांच्या रॅकजवळ लावले. एक वादळात एका स्त्रीचा तो चेहरा होता. डोळ्यातून अश्रू ओघळत असलेला. कलात्मक म्हणून तो मला आवडला. पण तो खाली पाणी भरता भरता खिडकीतून खाली दिसायचा. ते पोस्टर काढून टाकावे म्हणून एक वर माडीवर येऊन सांगायला लागले तेव्हा मी दुसरे पोस्टर आणून त्यावर चिकटवले. If you live right, ones is enough असे त्यावर वाक्य होते आणि उंचावरुन समुद्रात छलांग मारणारया युवकाची पोज होती.

          घरात चिमणी होती. तिचा काळा धुर निघत रहायचा. वडील कधी कधी पांढरया मातीने भिंती पोचारायचे. जमीन सारवायचे. पाणी खालून आणावे लागायचे. घरात मोरी नव्हती. खाली अंगणात कोपर्‍यात नळाजवळ आडोशाला जावून अंघोळ करावी लागायची. वडील नळावर जाऊन एका हाताने भांडी घासायची तेव्हा सगळे माझ्याकडे वर खाली पाहून कुजबुजायची 'किती दिवस म्हातारयाला भांडी घासायला लावतो' मी खालमानेने सकाळी काॅलेजला जायचो. तेथून दुकानात जायचो. रात्री नऊ वाजता घरी यायचो. सुट्टीच्या दिवशी परशुराम साईखेडकर नाट्यगृहाजवळील सार्वजनिक वाचनालयात जायचो.

        आठवड्याला नंतर नंतर १२५ रुपये उचल मिळायला लागल्यापासून मी पुस्तक प्रदर्शनातून एकेक पुस्तक घरी आणायचो. पाच दहा रुपये किंमत असायची पण त्या काळात त्यांना फार मोल होते. महानोर यांचा रानातल्या कविता, ग्रेस यांच्या सायंकाळच्या कविता हे संग्रह तेव्हा मी आणलेले आठवतात. एकदा विश्वकोश माझ्या नजरेस पडला तेव्हा मी दरमहा एक याप्रमाणे जवळ जवळ सगळेच खंड घरी आणले. पुस्तकांची रॅक तेव्हा कमी पडायला लागली. घरी येणारे नातेवाईक म्हणायचे हा छंद काही उपयोगाचा नाही. वडील तेव्हा रागवायचे नाही

        आई गेल्यावर त्यांनी मला आईची उणीव भासू दिली नाही. आईसारखी माया माझ्यावर केली. कधी मी आजारी पडून घरी राहिलो की माझी चिठ्ठी ते दुकानात नेऊन द्यायचे. माझ्या अंगावर पांघरुन घालून येताना फुटाणे वगैरे आणायचे

       मला आठवते. आई तेव्हा शालिमारजवळ सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होती. तेव्हा ते घरी स्वयंपाक करुन हाॅस्पिटलमध्ये जाऊन शाळेतही जायचे. परत घरी येऊन संध्याकाळी स्वयंपाक करायचे. हाॅस्पिटलमध्ये आई कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला होती. तिला ते संत्री मोसंबी सोलून खाऊ घालायचे. आई म्हणायची 'आता माझ्या विलासचे कसे होईल' तेव्हा ते तिला धीर द्यायचे. कॅन्सरवरील महागाचे उपचार करण्याइतपत त्यांची तेव्हा परिस्थिती नव्हती. मी शाळकरी वयाचा. पुरेशी समज न आलेला.

         त्यांची हतबलता तेव्हा मला समजण्यासारखी नव्हती. मी जरा जाऊन येतो असे म्हणून ते हाॅस्पिटलमध्ये जाऊन यायचे. एके दिवशी ते अक्षरशः हंबरडा फोडतच आले. 'आपली पमा आपल्याला सोडून गेली रे' असे म्हणून ते रडतच होते. मला काही समजत नव्हते. मी मनात तेव्हा म्हटले 'बरे झाले गेली. मारतच होती.' आज मला अगदी ओशाळल्यासारखे वाटते.

         तेव्हा आम्ही चरण पादुका रोडला बोराडे यांच्या सीता स्मृती वाड्यात पहिल्या मजल्यावर रहायचो. आईला वडीलांनी टॅक्सीत घालून आणले. तेव्हा नुकतेच जंबुसरवरुन मामा कंपनी घरी आली होती. त्यांनी आणलेला ब्रेड लाकडी कपाटात तसाच पडलेला होता.

         आईला हिरव्या लुगड्यात सजवण्यात आले. हिरवा चुडा भरण्यात आला. तोंडात पानाचा विडा ठेवण्यात आला. तिला घेऊन यात्रा निघाली तेव्हा वडील भाऊ पुढे विस्तव घेऊन चालत होता.

         आईला सरणावर ठेवण्यात आले तेव्हा मात्र मला वेगळीच जाणीव झाली. आई उठत का नाही म्हणून मला एकसारखे वाटायला लागले तोच वडील भावाने आईला अग्नी दिला. खांद्यावर पाण्याच्या मडक्याला दगडाने कोच पाडून पाण्याची धार सांडत सांडत प्रदक्षिणा घातल्या आणि पाठीमागून एके ठिकाणी मडके मागे सोडून दिले. ते फुटले तेव्हा आगीच्या ज्वाळांनी मला भडभडून आले.

          आई आता पुन्हा दिसणार नाही ही जाणीव मला त्या वयात झाली. आई गेल्याचा माझ्या बालमनावर परिणाम होऊ नये म्हणून वडीलांनी पुढे मला फार जपले. ते सारखे माझ्याकडे लक्ष ठेवून असायचे.

२

            एकटाच खिडकीत बसलो की वडीलांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा डोळ्यापुढे तरळत राहतात. कधी ते अंगातली कोपरी खिडकीशी उन्हात बसून शिवत बसायचे. तर कधी गुडघ्यावर धोतर शिवत बसायचे. त्यांची लालबुंद गव्हाळ कांती उन्हाच्या तिरीपेत चमकत रहायची. कधी कागदाच्या कपट्यावर शिसपेन्शिलने माझ्या आईचा चेहरा रेखाटत बसायचे. गुडघ्यांसाठी त्यांनी रुमानार्थी आयुर्वेदिक औषधे आणून ठेवलेली असायची ती ते घ्यायचे आणि सकाळी किंवा सायंकाळी वरच्या पेठेपासून ते थेट खालच्या पेठेपर्यंत फेरफटका मारुन यायचे. मध्ये राममंदिर लागले की तेथील ओट्यावर भेळभत्ता घेऊन खायचे. कधी कधी निवृत्त लोक कट्ट्यावर जमायचे तिथे त्यांच्यात जाऊन बसायचे. एकदा त्यांच्या चष्म्याची एक काडी तुटली तर तिथे दोरा लावून तोच चष्मा त्यांनी शेवटपर्यंत वापरला. शेवटी एक काच फुटली तर उरलेल्या काचेतून ते पेपर वगैरे वाचायचे. तो चष्मा जपून ठेवायला हवा होता अशी हळहळ आज वाटते. प्रथेप्रमाणे त्यांच्या वस्तू गंगेत विसर्जित केल्या त्या करायला नको होत्या असे आज वाटते.

          सकाळी अंघोळ केली की ते एका हाताने देवपूजा करायचे आणि कपाळाला गंध लावायचे.

          मोठ्या मुश्किलीने मी त्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकरण त्यांचे सेवापुस्तक ज्या शाळेत होते तिथे जाऊन, त्यांचे सन १९५० ते १९७६ चे वेतनाचे तपशील मिळवून करवून घेतले होते. रु ६० निवृत्ती वेतन बसले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळलेले मी पाहिले होते. ते वाढत जाऊन शेवटी ते रु ७०० इतके निवृत्ती वेतन घ्यायचे. त्याचेही त्यांनी हिस्से ठरवलेले होते. माझ्या हिस्स्याचे पैसे ते घरात द्यायचे व नाशिकला जाऊन माझ्या भाऊ बहीणीला त्यांच्या हिश्श्याचे पैसे कनवटीला ठेवून देऊन यायचे. स्वतः साठी  तंबाखूची पुडी आणि भेळभत्ता एवढाच खर्च भागावता येईल एवढेच पैसे ते जवळ बाळगायचे. नवरात्रात पहाटे कोरा नेहरुशर्ट व कोरे धोतर घालून ते पायीच घाटनदेवीचे दर्शन घेऊन यायचे.

३

#एक चंदनाची कहानी

              शुभ्र नेहरुशर्ट . शुभ्र धोतर आणि शुभ्र टोपी याच वेशात ज्यांना मी आयुष्यभर पाहिले.ज्यांचे जीवन अगदी साधे सरळ भाबडे आणि तितकेच खडतरही होते.त्या माझ्या वडिलांनी माझ्या आयुष्यातील जवळ जवळ सगळाच भाग व्यापलेला आहे. माझे बालपण, किशोर आणि तरुण वय त्यांच्या सावलीत गेलेले आहे

        रविवार दि १५/४/१९१७ रोजी त्यांच्या जन्माने आनंद झाला म्हणून त्यांचे नाव 'आनंदा' ठेवण्यात आले. त्यांच्या पाठोपाठ यमुना 'दगु' 'मुरलीधर' झाले. नगरसूल गावात शेती होती. लहानपणी आंब्याच्या झाडावरुन पडण्याचे निमित्त झाले आणि वडिल डाव्या हाताने अधू झाले. शेतीच्या कामासाठी कुचकामी ठरले. शेळ्या मेंढ्या सांभाळायच्या कामाचेच फक्त उरले.

        मालेगावच्या मामांनी त्यांना आपल्याकडे शिकायला घेऊन गेले. तिथे व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे सातवीपर्यंत शिकले. ते सांगायचे तेल्याच्या दुकानात ते दिवसभर तेल विकायचे. मोठे कष्टाचे ते दिवस होते.

      नंतर नाशिकमध्ये पीटीसी केली. खिर्डीसाठे इथे शाळा सुरु केली. पुढे मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या बाल शिक्षण मंदिर, गोराराम गल्ली नाशिक येथे प्राथमिक शिक्षक म्हणून लागले.

        पहिली पत्नी हाडके घराण्यातील होती. वडील नाशिकमध्ये नोकरी करीत होते तरी ती नगरसूलला शेतीकाम करायची. बाळकृष्ण तीन वर्षाचा असताना व उषाचा नुकताच जन्म झाला तेव्हा ती त्यांना सोडून देवाघरी गेली

       तेव्हा ते पंचवटीत रहायचे. नगरसूलची सकडे आजी भोईरवाड्यात बहिणीकडे यायची. तिने वडीलांना पाहिले. माझी आई तिची भाची. तिच्यासाठी माझे वडील योग्य वाटले. तिने मग लग्न जुळवले.

       तुटपुंज्या पैशात संसार सुरु झाला. पहिल्या पत्नीची मुलं आई सांभाळणार नाही असा त्यांना त्यावेळी सल्ला मिळाल्याने त्यांना त्यांनी आपल्या बहिणीकडे ठेवले. आईला तिच गोष्ट मनस्वी लागली. वडील पगारातून त्या दोन मुलांचा संभाळ करण्यासाठी बहिणीला वरचेवर पैसे द्यायचे त्यामुळे घरात चणचण भासायची. त्यावरुन आई बाबा यांच्यात नेहमी खटके उडायचे.

       आई आणि बाबा यांच्या वयातही खूप अंतर होते. आई वयाने लहान सुंदर होती. सगळ्यांमध्ये उजवी होती. त्यामुळे तिचा सगळ्यांकडून दु:श्वास होत रहायचा. कोणी आईला चांगले पहायचे नाही. तिने खालुन वाहून आणलेल्या प्यायच्या पाण्यात आधीची मुलगी राख टाकून द्यायची. खणदूसपणे वागायची

        बाबांचा आईवर खूप जीव होता. तिचा संताप राग सहन करुन घ्यायचे. आई रागावली की बाबा घराबाहेर निघून जायचे.

             शुक्रवार दि १५फेब्रुवारी, १९७४ रोजी आई कॅन्सरने गेली तेव्हा वडील एकटे पडले. घरातला स्वयंपाक पाणी एका हाताने करुन ते शाळेत जायचे. घरातली भांडी ते एका हाताने घासायचे. मी तेव्हा आठवीला होतो. असमंजस आणि हट्टी होतो. एकदा दारावर लाकडी टेबल विकायला आले तर मला अभ्यासाला वडीलांनी घेऊन दिले. टेबलाला खुर्ची पाहिजे म्हणून मी हट्ट धरला तर वडीलांनी मला फर्निचरच्या दुकानात नेऊन माझ्या पसंतीने घडीची लाकडी खुर्ची घेऊन दिली. खुर्ची घेऊन आम्ही रामसेतू पुलावरुन येत होतो तेव्हा श्रीराम विद्यालयाचे तेव्हाचे मुख्याध्यापक श्री टेकाडे गुरुजी भेटले. ते माझ्याकडे पाहून म्हणाले गुरुजींना किती त्रास देतो.

        एकदा हट्ट करुन मी बाबांना किशोर मासिक घ्यायला लावले होते. दोन रुपये किंमत होती तरी तेव्हा ते महागच होते. तेवढ्या किमतीत तेव्हा दोन तीन किलो गहू मिळायचा.

        बाबा जून १९७६ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्या आधी फंडातून पैसे काढून उषाचं लग्न करुन दिले. सेवानिवृत्त झाले पण पेन्शन नाही. खासगी संस्थेत तेव्हा पेन्शन नव्हते. घरातले एकेक पितळी भांडे कुंडे विकून एकेक दिवस कसाबसा चालला होता. तेव्हा आम्ही दोघेच लाटेवाड्यातच पण आतेमामांच्या शेजारी रहायचो. आतेमामांनी आत्या गेल्यानंतर दुसरे गंधर्व लग्न केले होते. बाळकृष्ण आणि उषा तेव्हा आतेमामांकडेच रहायचे. उषाच्या लग्नात जेवण कमी पडले तर आतेमामाने आईच्या हातची मोठी पंचपात्री ठेवून घेतली व पैसे पुरवले तेव्हा पंगतीत वाढता आले.

            सणासुदीला इकडे आम्ही दोघे आज काय खायचे या विवंचनेत असायचो तर शेजारी मोठमोठ्याने मामा श्रीखंड काय मस्त आहे असे मुद्दाम आवाज यायचे. आतेमामाने बाळकृष्णाला मालविय चौकात रथ रस्त्याच्या कोपर्‍यावर पानपट्टी टाकून दिली होती. कधी कधी मीही त्या पानपट्टीवर बसायचो.                                                                    सेवानिवृत्त झाल्यावर उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. तेव्हा आतेमामाने पंचवटी कारंजावरील एक पानपट्टी बाबांना चालवायला दिली. तेव्हा मी दहावीत गेलेलो होतो. पानपट्टीच्या माळ्यावर व घरी रात्री आल्यावर रस्त्यावरील लाईटच्या उजेडात मी अभ्यास करायचो. घरात लाईट नव्हती. चिमणीच्या उजेडात आम्ही रहायचो.

           खूप जणांनी उधारी बुडवल्याने पानपट्टीही चालली नाही. मग बाबा चार रुपये रोजाने द्राक्षाच्या बागेत रात्री राखणदारी करायला तपोवनाकडे जायचे. येताना जाळण्यासाठी रानातून काड्याकुड्या गोळा करुन आणायचे. एकदा आतेमामाने त्यांच्याकडील कोरिया जपानची भारी पॅन्ट घालायला दिली आणि दुसरया दिवशी मागूनही घेतली होती. सकाळी गाणगापूरहून आणलेल्या सोन्याच्या साखळ्यांच्या गप्पाही कधी कधी ऐकू यायच्या.

         मी दहावीत गेलो तेव्हा एकमुखी दत्ताकडे रहात असलेल्या पिसोळकर सरांनी त्यांची जुनी खाकी फुलपॅन्ट जी मागे सीटवर विरली होती ती देऊन ठिगळ लावून वापर असे सांगितले होते.

        अशा एकेक आठवणी आज जाग्या होत आहेत.

४.

#एक चंदनाची कहानी

              तो काळच वेगळा होता. आज तो धूसर सोनेरी भासत आहे. पावसाळ्यात वडील घरी यायचे तेव्हा मोठी बंद छत्री ते दाराच्या पाठीमागे उभी करुन ठेवायचे. धोतर वर पोटरयांवर खोचलेले असायचे. 'काय शिळंदार पाऊस' असे अंगभर ओले कपडे झटकत म्हणायचे. 'जरा पल्याड जाऊन येतो' म्हणून टोपी चढवून ते निघायचे. एकदा मला त्यांनी गोदावरी पलिकडे यशवंतराव पटांगणातून चढ असलेल्या मार्गाने त्यांच्या शाळेत नेले होते. बाल शिक्षण मंदिर ही गोराराम गल्लीतील शाळा भरायची तो एक वाडाच होता. वर्गात मुलं जमीनीवर बसकर पट्ट्या टाकून बसायचे. दर शनिवारी वर्ग सारवायचे. वडील उत्तम चित्रकार होते. बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील रंगीत चित्रे त्यांनी हुबेहुब त्याच रंगात रंगवून वर्गात लावली होती. तेव्हाच्या लोकराज्य वगैरे मासिकातील चित्रे, पक्षांची पिसे, राजा रवीवर्माने काढलेल्या श्रीकृष्णाची चित्रे यांचा सुंदर चित्र संग्रह त्यांनी बनवलेला होता. इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पुस्तकातील शिवाराची श्रीमंती, जत्रा, माझ्या मामाची रंगीत गाडी इत्यादी धडे कवितांची त्यांनी आपल्या वळणदार निळ्या अक्षरात काढलेली टिपणवही मी अजून जपून ठेवली आहे. त्यांचे अक्षर मोत्यासारखे टपोरे सुंदर होते. एका वहीत माकडा माकडा कान कर वाकडा सारख्या बडबड गीतांचा त्यांनी स्वअक्षरात केलेला संग्रह देखील मी जपून ठेवला आहे. मोडीमध्ये त्यांची आ गो कुडके ही स्वाक्षरी सर्वत्र असायची.

          शाळेतून सायंकाळी परतताना ते हमखास मालविय चौकातून मोठी बालुशाही घेऊन यायचे.

          मला घेऊन ते शाळेत जायचे तेव्हा दुपारच्या सुट्टीत सुंदरनारायण मंदिराजवळील त्यांच्याच एका विद्यार्थ्याच्या हाॅटेलमध्ये घेऊन जायचे व मस्त गोल भजी खाऊ घालायचे.वर्गात ते शिकवायचे तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा अगदी धाक होता. चुकले की त्यांच्याकडून जोरात गुद्दा मिळायचा. कधी कधी तर ते कानही अगदी लाल होईपर्यंत पिळायचे. पाढे बाराखडी धडे कविता ते अगदी घटवून घ्यायचे. मुलांचे पालक शाळेत आले की ते वडीलांशी अगदी घरच्यासारखे बोलायचे. वडील त्या शाळेचे कीर्द खतावणी सुद्धा लिहायचे. स्व. खासदार वसंत पवार हे त्यांचे विद्यार्थी होते. सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तेव्हा वडील ८७ वयाचे होते. तेव्हा स्व. खासदार वसंत पवार त्यांना म्हणाले 'मला ओळखले का गुरुजी, मी तुमचा विद्यार्थी, तुम्ही माझा कान पिळला होता.' वडीलांनी आठवून आठवून मग मान हलवली होती.

         बाल शिक्षण मंदिर या शाळेत मागील बाजूस एक दगडी चौक होता. तिथे सुतकताईचे चरखे असायचे. मोठ्या वर्गातील मुलांना ते सुतकताई सुद्धा शिकवायचे. अशा कितीतरी आठवणी जाग्या झाल्या आहेत.

@विलास आनंदा कुडके 

Wednesday, June 9, 2021

फजितीचे क्षण

 फजितीचे क्षण

    काही क्षण फजितीचे असतात. असे क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी आलेलेच असतात. त्या क्षणापुरते आपल्याला वाटते आपली फजिती झालेली कोणीही पाहू नये. फजिती होत असतांनाचा क्षण युगासारखा वाटायला लागतो. कधी एकदाचा तो क्षण संपावा आणि आपण सुटकेचा नि:श्वास टाकावा असे होऊन जाते. असे क्षण आपण आयुष्यातून घाईघाईने पुसून टाकू पाहतो. आजवर लिहिल्या गेलेल्या आत्मचरित्रात कोणीही फजितीचे क्षण उल्लेखिलेले आढळत नाही. काही अपवाद असतीलही पण अशी आत्मचरित्रे अद्यापही वाचनात आलेली नाहीत.

    प्रत्येक जण आपले व्यक्त्तिमत्व अगदी रांगत असल्यापासून विकसित करीत असतो. आपलं रुपडं सजवित असतो. कोणावरही छाप पडेल अशी देहबोली, शैली आपण आत्मसात करीत असतो. आपल्याला पाहून कोणीही आकर्षित व्हावे, राजस, राजबिंडे, देखणे म्हणावे म्हणून सारी आपली धडपड असते. आवडत्या हिरोचे राहणीमानाचे आपण अनुकरण करतो. काही स्वत:च इतरांचे आदर्श बनू ठरू पाहतात. अशावेळी फजितीचे क्षण म्हणजे दुधात खडा! अशा फजितीच्या क्षणी त्रिफळा उडते तेव्हा आपला झालेला अवतार पाहण्यासारखा असतो पण आपण स्वत:ही आरशात तो कधी पहाण्याचे टाळतो. कोणीजर चुकून पाहिले तर जणू काही त्याने पाहिलेच नाही अशी मनाची खोटी समजूत करुन घेतो.

    कल्पना करा एखाद्या खास कार्यक्रमासाठी महागड्या सौंदर्यप्रसाधनगृहात नखशिखांत शृंगारलेली ललना ऐनवेळी तिच्या पायातील त्राणीचा अंगठा नाहीतर बंध तुटला तर कोण घोर प्रसंग उभा राहिल. अशा साजशृंगारलेल्या अवस्थेत दुरुस्तीच्या दुकानापुढे उभे राहायचे म्हणजे किती नामुष्कीचा प्रसंग. शत्रूस्त्रीवर सुद्धा असा प्रसंग नको यायला किंवा धरणीमाय पोटात घेईल तर बरे होईल असे तिला क्षणभर वाटल्याशिवाय राहणार नाही. बरं ती तुटकी पादत्राणी तशीच सोडून जावे तर कोमल पावले भूमीवर ठेवावी कशी? अशा पेचात ती बिचारी सापडते. बरे अशा ललनांकडे दुर्लक्ष कोण करणार आणि ही फजिती लपवणार तरी कोणाकोणापासून. मरुन मेल्यासारखी अवस्था म्हणतात ती हीच असते.

    असाच जीवघेणा क्षण धो धो पावसात अजिबात उघडत नसलेल्या छत्रीमुळे येतो. ऐरवी पाऊस नसताना किती छान उघडत होती आणि आताच हिला काय झाले म्हणून आपली किती झटापट होत रहाते. बरं अशा न उघडलेल्या छत्रीला त्यावेळी फेकताही येत नाही. वेडी आशा वेडी म्हणजे किती वेडी असते ते आपल्या अशी छत्री उघडण्याच्या निष्फळ प्रयत्नांवरुन आणि पूर्ण भिजलेल्या कपड्यांवरुन कोणाच्याही लक्षात येते. अशावेळी येणारा जाणारा जणुकाही आपल्याचकडे पाहून हसतोय असा भास होत राहतो आणि आपण त्याच्याकडे आपले जळजळते कटाक्ष टाकत राहतो. 

    ऐन पावसात वाऱ्याने छत्री उलटी होणे, काडी न काडी मोकळी होणे ही तर फटफजिती झाली. माणूस केळाच्या सालीवरुन पडला तर साधीच फजिती होते. किमान हसणारा माणूस हसू दाबून मदतीचा एक हात तरी पुढे करुन पडलेल्याला उठवतो आणि केळीचे साल टाकणाऱ्याचा उद्धार करीत शिव्याही घालू लागतो. फार पूर्वी अहो तुमचे पोस्ट ऑफिस उघडे आहे असे सांगून न कळत फजिती करायचा आणि आपला चेहरा गोरा करुन टाकायचा. अशावेळी थँक्सही म्हणायचे अगदी जीवावर येते. बरं, सांगणाऱ्याचा चेहरा न बोलता सांगत असतो की किती अजागळ! एक घडलेला प्रसंग. कार्यालय सुटल्यावर मागे बॅग अडकावून निघालेल्या एका सहकाऱ्याला एका सहकारिणीने मागून आवाज दिला सर तुमची चैन उघडी आहे . तिला बॅगची चैन अभिप्रेत होती. पण सहकारी बिचकले आणि कमाल आहे मागून पुढची चैन कशी दिसेल? असे म्हणून घाईघाईने पँटची चैन चाचपडून पाहली. चैन तर बरोबर आहे, यांना नेमकी कोणती चैन उघडी दिसली, या विचारात त्यांची अगदी घालमेल झाली. पुढे खुलासा झाला ती गोष्ट वेगळी. परंतु त्यावेळी त्यांची जी फजिती झाली ती विचारता सोय नाही. आजकाल ऐनवेळी न खुलणाऱ्या किंवा अजिबात न लागणाऱ्या चैनींमुळे फार मोठा घोटाळा होतो. जड बॅगेचा पट्टा तुटण्यासारखी फजितीच नाही. वरची गुंडीही गळ्यापर्यंत लावण्याची सवय असलेल्याला ऐनवेळी वरची गुंडी तुटल्यावर छातीवरचे केस वाऱ्यावर भुरभुरत उघडे ठेवताना ज्या मरणप्राय यातना होतात त्या तुम्हा आम्हा गुंड्या उघड्या ठेवणाऱ्यांना कळायच्या नाहीत. एवढेच कशाला रस्त्याने मिशी पिळत जायची सवय असलेल्याची मिशी चुकून भादरली गेली तर काय जीवघेणा अपमानास्पद, लांछनास्पद प्रसंग उभा राहतो त्याची तुम्हाला कल्पना येणार नाही. हवी तशी मिशा उगवायला वेळ लागतो, मेहनत लागते, तेवढे दिवस तोंडाला रुमाल बांधूनही वावरता येत नाही. फारच कठीण अवस्था असते. अशा छोट्यामोठ्या फजितीच्या क्षणांना आपण पावलंपावलं जपतच राहतो. रात्रंदिवस घोकंपट्टी करुन परीक्षेला जावं आणि येत असूनही वेळेवर उत्तरच न सुचणे किंवा मोठ्या तावातावाने भाषण करायला ध्वनीक्षेपक घेऊन उभे रहावे आणि ऐनवेळी काय बोलावे हेच न सुचणे... किती किती फजितीचे क्षण सांगावे. मोठ्या प्रेमाने मोठ्या हॉटेलात कोणाला घेऊन जावे आणि पैशाचे पाकीट एटीएम कार्डसकट कोणी मारावे यासारखा दैवदुर्विलास नाही! 

राष्ट्रीय कार्यक्रमाला कांजी लावून कडक इस्तरीत पांढरेशुभ्र होऊन जावे आणि खिशातील कलमानेच घात करावा, ही फजिती कोणती म्हणावी? किती वेळ शाईचा डाग हाताच्या पंजाने लपवून ठेवणार! बरं एवढ्याशा कारणावरुन कार्यक्रम सोडूनही जाता येत नाही. 

एखाद्याने मोठ्या त्वेषाने दातओंठ खावून यावे आणि त्यातच त्याचा पुढचा दात निखळून पडावा, असेही अप्रिय प्रसंग घडतात. दाढ उठलेल्या माणसाला नेमके हसवणारे इतके लोक येऊन भेटतात आणि हसायला भाग पाडतात की विचारु नका! त्यामुळे त्याची अक्षरश: हसून हसून पुरेवाट होते. 

फजिती ज्याची होते त्याला धड हसताही येत नाही आणि रडताही येत नाही. रेडिमेड कपड्यांच्या दुकानातून काही पँटी घेतेवेळी बरोबर येतात आणि वापरायला सुरु केली त्याच दिवशी त्यांची नको तिथे शिलाई उसवल्यावर दे माय धरणी ठाय असे होऊन जाते. म्हणूनच आपण खात्रीशीर न उसवणारी शिलाई मारणाऱ्याकडूनच कपडे शिवत राहतो. बोटाने शिलाई उसवली तर जात नाही ना ते दहावेळा पाहतो. शिलाई उसवणे हे तर फजितीचे हमखास कारण. पूर्वी लोक टोपीमध्ये आतून सुई टोचून ठेवायचे. ती अनेकोपयोगी असायची म्हणजे पायात काटा घुसला, शिलाई उसवली, माळ ओवायची असेल किंवा संरक्षक छोटे शस्त्र म्हणूनही उपयोगी पडायची. 

शाळेत असतांना काही इब्लीस पोरं गुरुजी वर्गात यायच्या आधी त्यांच्या खुर्चीवर खाजकुहली पसरून ठेवायचे आणि मग गंभीर चेहऱ्याने शिकवता-शिकवता गुरुजींच्या ज्या हालचाली सुरु व्हायच्या त्या पाहून वर्ग खुसूखुसू न कळत हसत राहायचा. असली फजिती मात्र व्हायला नको आणि ती कोणी करायलाही नको. प्रवासात देखील मित्रमंडळींमध्ये गप्पांमध्ये रंगलेल्या एखाद्या मित्राला मागून शेपटी लावण्याचे प्रकार होतात किंवा मी गाढव आहे असे लेबल चिकटवले जाते आणि मग त्याच्याशी गंभीर चेहऱ्याने गप्पा मारल्या जातात. आजुबाजूचे लोक मात्र लोटपोट होऊन हसत असतात. अशावेळी हसण्याचे कारण कळाल्यावर जी फजिती होते ती कोणालाही विसरता न येणारी असते. 

चारचौघात जशी फजिती होत असेत तशी ती घरात काहीवेळा होत असते. म्हणतात ना शिंक्यावर झेप घ्यायच्या प्रयत्नात शिंकेच तुटावे आणि ज्याच्यासाठी जीव चालला होता, सगळा आटापीटा होता ते दही दूध सहज अंगावर अभिषेक होऊन मिळावे आणि हा आनंद म्हणायचा की दु:ख ते समजत नसताना अंगावरचेही घाईघाईने चाटून पुसून घ्यायची वेळ यावी आणि तोंडात ना ओठात पडता वाढून गेलेल्याकडे पाहून हळहळत बसावे तसे सगळे असते.

घरोघरी गॅसच्या शेगड्या तसे घरोघरी अडगळ, पसारा हा ठरलेलाच असतो. त्यात घरात वावरणारे आताशा भ्रमणध्वनीत व्यस्त असल्याने घरातील पसारा पूर्वीच्या मानाने खूप वाढला आहे आणि आवरणारे हात शोधावे लागत आहेत. पूर्वी हौसेने घर आवरले जायचे पण आज हौस जिरेल एवढा पसारा वाढला आहे कारण जीवनावश्यक गरजांबरोबर इतरही गरजाही वाढल्या आहेत. हे सर्वांना कळते पण जरा कुठे आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो की आपण तिथला पसारा पाहून डोळे विस्फारतो. तेच जर आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर आपल्या पायाखालची फरशीच सरकते. पसारा आणि तोही पाहुणे यायच्या आत आवरतांना आपली भंबेरीच उडते. भंबेरीवरुन एक गोष्ट आठवली. शाळा तपासायला दिपोटी अचानक आल्यावर आपल्याच नादात संजिवनी  मळणाऱ्या गुरुजींची बोबडी वळली. त्यांनी घाईघाईने संजिवनी टेबलाच्या ड्रावरमध्ये आणि टेबलावरची शाईची दौत खिडकीतून बाहेर फेकली, असा फजितीचा क्षण!

असेच एक विभागीय प्रमुख अधिकारी होते. त्यांच्याकडे अचानक विभागप्रमुख चक्क जिन्सची पॅन्ट आणि टी-शर्टवर एकट्याने भेट दिली. शिपायाने त्यांना अजिबात ओळखले नाही. त्यांना सरळ बाकड्यावर बसायला सांगून साहेब बिझी आहे असे सुनावले. झाले. विभागप्रमुख बराचवेळ बाकड्यावर साहेब कधी मोकळे होतात त्याची वाट पहात गाणे गुणगुणत बसले. त्यावरही शिपायांनी त्यांना शांतता पाळायला सांगितली. शेवटी त्यांनी विचारले, तुमचे साहेब कितीवेळ बिझी असतात  आणि तडक दालनाचा दरवाजा उघडून शिपाई अरे अरे  म्हणेपर्यंत आत शिरले तर विभागीय प्रमुख अधिकारी धुम्रपानात धुरांच्या वलयात पुढील पदोन्नतीचे स्वप्न पाहण्यात तल्लीन झालेले! काय रे विड्या ओढतोस का? या प्रश्नाने स्वप्नभंग झाला आणि डोळ्यासमोर साक्षात मृत्यू दिसावा अशा मुद्रेने क्षणात ते अधिकारी गलितगात्र झाले. हातातले सिगारेट केव्हा गळून पडले ते त्यांचे त्यांनाही कळले नाही. विभागप्रमुख निघून गेल्यानंतर जवळजवळ तासाभराने त्यांना आपण कोठे आहोत त्याची जाणीव झाली आणि मग या फजितीला कारणीभूत ठरलेल्या शिपायाला त्यांनी किती झापले असेल ते विचारायलाच नको!

@ विलास आनंदा  कुडके

Sunday, June 6, 2021

आईच्या आठवणी 21(7/4/2018)

 #आईच्या आठवणी 

              आठवणींनीच मनाला जाग यावी तसे अलिकडे होते. आईकडे पाच दहा पैसे मागणे म्हणजे दिव्य होते. मला आठवते तेव्हा शाळेत रक्षाबंधन होते. शिक्षकांनी आदल्या दिवशी सर्व मुलींना रक्षाबंधनसाठी वर्गात राख्या घेऊन यायला सांगितले होते. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी मुलामुलींना एकेक रांगेत उभे केले आणि जवळच्या मुलाला राखी बांधायला सांगितले. तोपर्यंत मी राखी कधी बांधली नव्हती. सावत्र बहिण भाऊ तेव्हा गाणगापूरला आत्याकडे होते. आईचा मी एकुलता एक होतो. मला बहिण नव्हती. एका मुलीने राखी बांधल्यावर मला वेगळीच हुरहुर जागवणारी जाणिव झाली. राखी बांधल्यावर बहिणीला काही द्यायचे असते हेही मला माहित नव्हते. सगळ्या मुलांनी त्यांना जवळच्या मुलींनी राखी बांधल्यावर खिशातून पाच दहा वीस पैसे काढून दिले. ती मुलगी मी काय देतो असे पाहू लागली. मला अगदी खजिल झाल्यासारखे वाटले. काही हरकत नाही असे म्हणून ती मुलगी शाळा सुटल्यावर घरी निघून गेली. मला चुटपुट लागून राहिली.

@विलास आनंदा कुडके 

Friday, June 4, 2021

आम्ही नासिककर

 *न्यूज स्टोरी टुडे*

*०४.०६.२०२१*


*-आम्ही नासिककर……* 

*✒️ विलास कुडके*  👇

http://www.marathi.newsstorytoday.com/आम्ही-नासिककर/


*आम्ही नासिककर*

  

           श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पावनभूमीत आपला जन्म व्हावा आणि गोदाकाठावर अवघे बालपण सरावे यासारखे भाग्य नाही. पंचवटीचा परिसर, काळाराम मंदिर, रामकुंड, तपोवन, व्हिक्टोरिया ब्रिज ( आजचा अहिल्याबाई होळकर पूल) यांची पार्श्वभूमी बालपणाला लाभावी यासारखे समृद्धपण नाही.

      कळत नव्हते त्या वयात आईने बोटाला धरुन कितीदा काळाराम मंदिरात सिन्नरकर बुवांच्या किर्तनाला नेले असेल. त्यामार्गात सीतागुंफा, पाच प्रचंड प्राचीन वटवृक्ष, सीतामाईचा संसार दर्शन घडवणारे मंदिर लागायचे. लाकडी खेळण्यांची दुकाने लागायची. काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाज्यालगत वटवृक्षाखाली शितला मातेचे मंदिर लागायचे जिथे लहानपणी गोवर कांजण्या निघाल्या की हमखास दहीभाताचा नैवेद्य दाखवला जायचा. काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजाला हळदी कुंकूचे दुकान आणि बाहेर घास घालण्यासाठी गाई बांधून ठेवलेल्या असायच्या. काळाराम मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेर काळभैरवाचे छोटे मंदिर आठवते. 

      काळाराम मंदिराच्या प्रांगणात हरिनाम सप्ताह व्हायचे. एकदा गीताभारती सुद्धा येऊन गेलेल्या होत्या. तेथील सभागृहात सिन्नरकर बुवांचे किर्तन रंगायचे.डोक्यावर लाल पगडी, गुडघ्यापर्यंत लांब पांढराशुभ्र कूर्ता, धोतर आणि खांद्यावरुन हातांपर्यंत लांब शेला अशी सिन्नरकर बुवांची मूर्ती कधी कमरेवर हात ठेवून तर कधी जागीच उडी मारुन आख्यान रंगवायचे. त्यांच्या रंगात बाजूचे मृदंगवाले आणखी रंग भरायचे. आई एकीकडे तल्लीन व्हायची आणि बसल्या जागी डुकल्या काढणार्‍या मला एका हाताने हलवून जागं करीत रहायची.

     काळाराम मंदिराकडून पुढे खाली गेले की सरदार चौक व त्यापुढे सांडव्यावरची देवी व पुढे नारोशंकर मंदिराची मागील बाजूस फोटोफ्रेमची रांगेत दुकाने. समोर उसाची गुर्‍हाळे, रामाचा रथ निघायचा तेव्हा इथेच जत्रेतील फोटो स्टुडिओ,रहाटपाळणे, जादूचे आरसे, मोटार सायकलचे चित्तथरारक खेळ, यम दरबार, बुढ्ढी के बाल, फुगे यांनी परिसर गजबजून जाई.

         रामनवमीनंतर निघणाऱ्या रामरथ गरुडरथ हनुमानरथ यांच्या यात्रा, तो उत्साह दरवर्षी पाहण्यासारखा असतो. पुढे गोदामाईच्या पूरामध्ये नारोशंकर मंदिराची एक दगडी छत्री वाहून गेलेली दिसेल. तिथून पुढे गेले की रामसेतू पूल लागेल. सतत गजबजलेला. येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा होणार नाही अशा बेताने तिथे हमखास गाई रवंंथ करतांना दिसतील. कुठे कुठे जडीबुटी घेऊन बसलेल्या मशेरी लावून लावून दाताच्या कडा काळ्या झालेल्या आदिवासी लेकुरवाळ्या दिसतील. तिथेच तुम्हाला जुन्या काळातील एक आणे दोन आणे यासारखी नाणीही फडक्यावर पसरुन दिसतील. रामसेतू पुलाचा आधार घेऊन पांडे मिठाईचे दुकान दिसेल. तिथून पुढे गेले की भांडी बाजार. बालाजी मंदिर. कुंकवाची दुकाने. मला आठवते आई भांडी बाजारातील एका मोडीच्या दुकानातून हमखास घसमर जुनी भांडी निवडून घ्यायची.

           रामसेतूवर उजव्या हाताला खाली उतारावर मोठमोठे आरसे लावलेले एक सलून होते. तिथे वडील मला केस कमी करायला घेऊन जायचे. केस किती कमी करायचे याच्या सूचना आईने आधीच दिलेल्या असायच्या. तशा सूचना देत देत वडील मागे बाकावर पेपर वाचत बसायचे आणि त्याप्रमाणे केस कमी करता करता न्हावी मला एकसारखे हाताने खाली वाकवायचे. तेवढे वाकून वाकून मान दुखून यायची. कानाजवळ मागून वस्तरा फिरताना हमखास गुदगुल्या व्हायच्या आणि हलू नको म्हणून सूचना यायच्या. केस कमी करताना समोरच्या मोठ्या आरशात नारोशंकर मंदिर आणि परिसर दिसत रहायचा. घरी गेल्यावर परत सांगितल्याप्रमाणे केस कमी झालेच नाही अशी आईची नाराजी वडीलांना ऐकून घ्यावी लागायची ते वेगळेच. 

         तेथून  खाली उतरुन गेले की पुढे यशवंत पटांगण लागायचे. देव मामलेदारांचे मंदिर पुरात वाहून गेल्यावर तिथे आता दुसरे मंदिर बांधले आहे. या पटांगणात उभे राहिले कि पश्चिमेस एकमुखी दत्ताचे मंदिर आहे व उजव्या बाजूला समोर व्हिक्टोरिया पूल दिसतो. व्हिक्टोरिया पूलाच्या शेवटी सुंदरनारायण मंदिर आहे.जवळच वडीलांच्या विद्यार्थ्याचे भज्याचे दुकान होते. तेथे वडील मला नेहमी घेऊन जायचे. यशवंत पटांगणात कित्येक वर्षापासुन वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत असते. त्यात अनेक दिग्गज व्याख्याते येऊन गेलेले आहे.

           गोदाकाठी फिरायला येणाऱ्यांचे इथे एक आकर्षण म्हणजे कोंडाजी माधवजी चिवड्याची भेळभत्त्याची दुकाने. समोर गांधी ज्योत, रामकुंड, तशीच आणखी कुंडे, प्राचीन गोदावरी मंदिर, कपडे बदलण्याचे ठिकाण दिसेल. मुख्य म्हणजे दरवर्षी गोदावरीला पूर किती आला आहे याचा अंदाज बांधता येईल असा मोठ्ठा दुतोंडी मारुती दिसेल. पलिकडे उंचावर कपालेश्वर मंदिर दिसेल. गोदाकाठी अनेक मंदिरे दिसतील.याच मंदिरांच्या रांगांमधील सिद्धीविनायकाच्या मंदिराजवळ एक अहिल्याराम व्यायामशाळा होती. मला आठवते तेव्हा मी तिथे जिम्नॅस्टिकसाठी जायचो. मलखांबावरील प्रात्यक्षिके नंतर यशवंत व्यायाम शाळेत झाली तेव्हा त्यात मीही भाग घेतला होता. 

            रामकुंडाच्या दोन्ही किनार्‍यांवर दशक्रिया पिंडदान, श्राद्ध, अस्थिविसर्जन करण्यासाठी भारतभरातून येणाऱ्या भाविकांची रेलचेल दिसेल.गोदाकाठी वटपिंपळ वृक्षांवर कावळ्यांचे थवेच्या थवेही दिसतील. पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या पंडित ब्राह्मणांची सोवळ्यातील लगबग इथे दिसेल.

         गोदाकाठी एके ठिकाणी जुने बाड घेऊन पंडित यात्रेकरूंच्या नावाची गोत्राची नोंद करुन घेत असतात आणि यापूर्वी त्यांचे कोणते पूर्वज तिर्थयात्रेस येऊन गेले त्याच्या नोंदी काढून दाखवतात. पिढ्यानपिढ्या जतन केलेल्या हस्तलिखित जुन्या दुर्मीळ पोथ्यासुद्धा या ठिकाणी पहावयास मिळू शकतात.

          गोदाकाठी रामकुंडावर गेलो की मला हमखास आठवतात ते दिवस जेव्हा माझ्याच वयाच्या मामाने मला पहिल्यांदा रामकुंडात हळूच ढकलले होते आणि मग पोहायला शिकवले होते. नंतर कितीतरी दिवस आम्ही रामकुंडावर पोहायला जायचो. 

            मला आठवते त्या वयात गोदावरीचा पूर पहायला आम्ही व्हिक्टोरिया पुलावर जायचो तेव्हा एक भरदार मिशांचा पहिलवान टायर घेऊन पुलाच्या कठड्यावरुन तेवढ्या पूरात उडी घ्यायचा व पोहत पोहत पलिकडे जायचा.ते पाहतांना अगदी छाती दडपून जायची. 

             गोदाकाठीच पलिकडे गोराराम गल्लीत वडिलांची बाल शिक्षण मंदिर ही शाळा होती. तिथे ते मला रामकुंडावरुनच न्यायचे. येतांना गोदाकाठी भरलेल्या भाजी बाजारातून भाजीपाला घ्यायचे. आईपण बुधवारी गोदाकाठी भरणाऱ्या बाजारातून मीठमसाले वगैरे बाजार करायची. 

         गोदाकाठी आणखी एक आकर्षण होते आणि ते म्हणजे सांड्यावरच्या देवीजवळ गुढीपाडव्याच्या आसपास लागणारी हारडे करड्यांची रंगीत दुकाने. आईबरोबर मी देवीच्या दर्शनाला आलो की त्या टांगून ठेवलेल्या हारडे करड्यांकडे अगदी आशाळभूत होऊन पहात राही.

         गोदाकाठावरील आणखी एक आठवण म्हणजे गोराराम गल्लीतील श्रीकृष्ण मंदिर. जन्माष्टमीच्या दरम्यान इथली श्रीकृष्णाची चल मूर्ती रोज वेगवेगळ्या रुपात सजवली जाते आणि तिच्या दर्शनासाठी अक्षरशः झुंबड उडते.

            माझे सगळे बालपणच जणू या गोदाकाठी बागडते रहाते. सिंहस्थ पर्वणीत कधी ते तपोवनातील विविध साधुंच्या जथ्यात रमत राहते. तेथे शिरापुरीच्या भंडार्‍यात रमत रहाते. राम लक्ष्मण सीता यांच्या वेषभूषेत आशीर्वाद गोळा करीत रहाते. तपोवनातील साधूंच्या शोधात कधी जनार्दन स्वामींचेही शिवमंदिर उभारताना अवचित दर्शन होते.बालपणी काळाराम मंदिराजवळ उत्तर भारतातून 'रामलीला' करणारी मंडळी यायची तेव्हा त्याचेही आकर्षण असायचेच.

        पंचवटीतील नाशिककर स्टुडिओ आठवतो. आई व तिच्या मैत्रिणी तिथे फोटो काढून घ्यायला जायच्या. मला आठवते पंडित नेहरु गेले तेव्हा त्यांची रक्षा हेलिकॉप्टराने रामकुंडात विसर्जित करण्यासाठी आणली होती तेव्हा नाशिककर फोटो स्टुडिओने काढलेल्या फोटोत आईचा रामकुंडावरील एक फोटो आलेला होता. त्याकाळी फोटो मात्र अगदी अभावानेच काढले जाई त्यामुळे त्याकाळातील बालपणातील एकही फोटो आज नाही याची खंत वाटत रहाते. पण तो काळ मात्र सतत डोळ्यासमोर तरळत रहातो. 

        गोदाकाठीच रथाजवळच्या शाळेत मी अंकुष या बालमित्राबरोबर एकटाच पहिलीला प्रवेश घ्यायला गेलो होतो हे आज आठवले की हसू येते. नंतर सोनूबाई हिरालाल केलाची नवीन शाळा व त्यादरम्यान गांधीजींची जन्मशताब्दी निमित्ताने शाळेत वाटलेले स्मृतीचिन्ह पुस्तके आठवतात. नंतर पाचवीला जवळच श्रीराम विद्यालयात गेल्याचे व त्या दरम्यान सर्वात मोठा आलेला 1969 चा पूर व नंतर 1971च्या युद्ध प्रसंगी बेंचखाली बसणे आठवते. तिथेच शनिचौकात रंगपंचमीला खोदलेले रंगांचे रहाड छातीत धडधड वाढवायचे. जवळच सरदार चौकातील ग्रंथालयात पहिल्यांदा स्वीकारलेले सदस्यत्व व तेथून लागलेली पुस्तकांची गोडी मला विसरता येणार नाही. बालपणात नाशिकची कक्षा अशी हळूहळू माझ्या दृष्टीने विस्तारत राहिली. 

           वडील तेव्हा रोज म्हणायचे मी 'पल्याड' जावून येतो. तेव्हा अर्थ कळायचा नाही पण आज कळते पल्याड म्हणजे गोदावरी पलिकडे जाणे. गोदावरी ओलांडण्याबाबतही तेव्हा समजूती होत्या. पूर्व बाजूला रहाणारे पूर्व काठावरच श्राद्ध आदी विधी करणार आणि पश्चिमेला राहणारी मंडळी पश्चिमेलाच ते विधी करणार. मला आठवते माझे आते मामा व आत्या गाणगापूरवरुन आले तेव्हा प्रथम गोदावरीच्या पश्चिमेला भाड्याने खोली घेऊन राहिले होते व गोदावरीची विधीवत पूजा करुन मग अलिकडे पूर्वेस राहत्या घरी आले होते.

       मला नंतर कामानिमित्त व शिक्षणानिमित्ताने गोदावरी ओलांडून पलिकडे मेनरोडवर व गंगापूररोडला जावे लागायचे. त्या निमित्ताने माझ्या दृष्टीने नाशिकची कक्षा तेवढी विस्तारली होती. नेताजी भोईर यांची नाटके दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत व्हायची तेव्हा त्यांच्याबरोबर कधीतरी लहानपणी परशुराम सायखेडकर नाट्यगृह व त्यांची नाटके पाहिली ते आठवते. तर कधी गणेश विसर्जन मिरवणूकीत त्यांच्या ट्रकमधून व्हिक्टोरिया पूलावरुन गेल्याचे व गोदावरी ओलांडल्याचे आठवते.नववी दहावीला असताना परशुराम साईखेडकर नाट्यगृहाजवळच सार्वजनिक वाचनालयात मी सदस्य झालो आणि माझ्या वाचनाच्या कक्षा आणखीच रुंदावल्या. 

            कधी संवगड्यांसह  आनंदवल्ली सोमेश्वरला गेल्याचे तर कधी मातीचे गंगापूर धरण, पांडवलेणी, चांभारलेणी पहायला गेल्याचे आठवते. आजीच्या पाठुंगळी बसून वणीच्या सप्तशृंगी देवीच्या गडाच्या तेव्हाच्या निव्वळ उंच दगडांच्या एकेक दमछाक करणार्‍या पायर्‍या चढल्याचे आठवते. आयुष्यातील निम्मी वर्षे अशारितीने नासिकनेच घडवली. ढिगभर जाहिरातींचे कागद खिशात बगलेत कोंबून खाकी शर्ट विजारीतील डोक्यावर हॅट घातलेले व खांद्यावर कर्णा अडकवलेले व विशिष्ट आवाजात मेनरोडला जाहिरात करणारे वडणेरे काका मला अजून आठवतात. 'कुल्फेss' अशी साद देत हातगाडीवर मटक्यातील कुल्फी विकणारा भैय्या माझ्या स्मरणात आहे. धुळवडीला होळी होळीला प्रदक्षिणा घालत नाचणारे वीर आठवतात. रविवार कारंजावरील चांदीचा सुंदर गणपती आठवतो. सोमेश्वरच्या रस्त्यावर पेरुच्या बागा आठवतात. दोन दोन पैशात पेलाभर दूध मुलांना वाटणारे पांजरपोळ आठवते. बाज इनून घ्या बाज अशी उन्हात हाळी देत येणारा म्हातारा आठवतो. ये नागs नरसोबा म्हणून चित्र विकणारी मुले आठवतात.पंचवटीत कोकिळा काशिनाथ गवळी मावशी तपोवनात काळाराम मंदिराबाहेर गोदाकाठी मोठ्या रांगोळ्या घालण्याबद्दल प्रसिद्ध होती. ती आठवते. नासिकच्या कितीतरी आठवणी आहेत. त्यांना नासिकचा एक सुगंध आहे जो सतत दरवळत राहतो. 

         नासिककर म्हटला की कसा सरळ, मनमोकळा, निरागस, भाबडा, काय असेल ते सडेतोड तोंडावर बोलणारा, भांडायला नेहमी तयार असणारा पण दुसर्‍या दिवशी लगेच गोडही होणारा. त्याला कुत्सितपणा, चिकटपणा, चिकित्सकपणा असा माहितच नसतो. टोमणे मारणे देखील त्याच्या स्वभावात येत नाही. शुद्ध मराठीत न बोलता तो रांगड्या भाषेत कडक बोलणार. नासिककर कसा ओळखायचा तर गंमतीने उदाहरण दिले जाते. ते म्हणजे सगळीकडे 'एकोणीस' म्हटले जाते पण 'एकोणाविस' म्हटले की तो हमखास नासिककर असतो. नासिककर' नासिक' म्हणतो तर बाहेरचा 'नाशिक'. 'काय वो नाना' म्हटलं की ओळखावं नासिककर समोर आहे.

       नासिककराचे पहिले प्रेम म्हणजे इथली तर्रीदार तिखटजाळ मिसळ. अशी मिसळ की जिच्यात मूग मटकी शेव पोहे असतील व ती बनपावाबरोबर असेल आणि पाहिजे तितका तिखट तर्रीदार रस्सा मिळेल. इथल्या मिसळमध्ये तुम्हाला कधी कधी साबुदाणा खिचडी पण टाकलेली दिसेल. नाशिकची खास ओळख म्हणजे झणझणीत कोंडाजी चिवडा आणि बुधा हलवाईची शुद्ध तुपातील जिलेबी. नासिककर कधी कधी सायंतारा मध्ये साबुदाणा वडाही आवर्जून खाईल. नासिककराला इथल्या गोड द्राक्षांचाही अभिमान असतो. जगभरात नासिकची द्राक्षे प्रसिद्ध आहेत.

        थंड आरोग्यदायी हवामानाचे हे नासिक शहर एकेकाळी निसर्ग रम्य घनदाट वनराईंनी वेढलेले होते. पेशव्यांचा सरदारवाडा इथे पाहिला की वाटते त्यांनाही इथल्या थंड हवामानाची भुरळ पडलेली होती. गोपिकाबाई सुद्धा नासिकजवळ आनंदवल्ली येथे वाडा बांधून राहिल्या होत्या. आजचे नाशिक पाहिले तर निसर्गरम्य वनराईच्या जागी चौफेर सिमेंट क्रांकिटचे जंगल उभे राहिले आहे. नासिक चौफेर विस्तारत चालले आहे. रस्ते चौपदरी होत आहेत. रहदारी वाढली आहे. उड्डाणपूल उभारले गेले आहेत. तिर्थक्षेत्र म्हणून प्राचीन काळापासून नासिकची ओळख आहेच पण  आता द्राक्ष उत्पादक नासिक  वाईनरी मुळे आपली  नवीन ओळख मिळवू पहात आहे. नाशिकचे यशवंतराव मुक्त विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ, अनेक शैक्षणिक संस्था यांचा नासिककरांना अभिमान वाटतो. नासिककर आलेल्या पाहुण्यांचे नेहमी हसतमुखाने स्वागत करतो. 

       आज या नाशिकचा चौफेर झालेला विस्तार पाहिला की थक्क व्हायला होते. काही भाग काळाच्या ओघात बदलून गेले. आधुनिक झाले. जुन्या नासिकातील वाडे कोसळता कोसळता सावरत अजूनही आपला इतिहास अजून जपून आहेत. पंचवटी कारंजा रविवार कारंजा येथे एकेकाळी खरोखर कारंजे होते आणि तिथून टांगे धावायचे. आज फक्त अशी भागांची नावे राहिली आहेत. नासिक कितीही विस्तारले तरी बालपणात जडणघडणीत जे नासिक मी अनुभवले तेच आजही मनात जपून ठेवलेले आहे. नासिकचे प्राचीनत्व, नासिकचा इतिहास, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर, गोदावरी उगम असलेली ब्रम्हगिरी पर्वत, पंचवटी, तपोवन इत्यादी पार्श्वभूमीवर नासिकचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून असलेले महत्त्व आठवून अभिमानाने म्हणावेसे वाटते 'होय, मी नासिककर आहे.' या पुण्यक्षेत्राचे गोदाकाठाचे आपल्यावर अनंत ऋण आहेत. याच भूमीत ऋषितुल्य कवि कुसुमाग्रज लाभले. वसंत कानेटकर सारखे नाटककार लाभले. कवि आनंद लाभले. साहित्याची मोठी परंपरा लाभली. स्वातंत्र्य चळवळीत तेजस्वी विचार देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर या भूमीने दिले. आंबेडकर चळवळीतील दादासाहेब गायकवाड याच भूमीत लाभले. अशा नासिक पुण्यभूमीस शत शत नमन!

*@विलास आनंदा कुडके*

Thursday, June 3, 2021

आईच्या आठवणी 20(11/4/2018)

 #आईच्या आठवणी

           आठवणी भरुन आलेल्या आभाळासारख्या असतात. एका आठवणीतून दुसरी दुसरीतून तिसरी तर काहीवेळा मधेच एखादी आठवण डोकावून जाते. लाटेवाड्यात रहात असतानाची आणखी एक आठवण मध्येच आठवली. तेव्हा नगरसूलवरुन सकडे आजी नेहमी घरी यायची. आई तिला मावशी म्हणायची. येताना ती किटलीभरुन काकवी आणायची. तिचे बोलणं नेहमी चिडवून दिल्यासारखे असायचे. ती निघाली की मी तिच्या मागे लागायचो. सकाळी अकरा वाजता नाशिक - नगरसूल गाडी असायची. निघण्यापूर्वी ती जेवून घ्यायची. एकदा मी तिच्या खूप मागे लागलो तेव्हा तिने आईला सांगितले विलासला घेऊन जाते म्हणून. तिच्या बरोबर मी नगरसूलला गेलो. रस्त्यावरच तिचे छोटेसे घर होते. ओटा केलेला. पुढे बाग केलेली. बागेत एका कुंडीत शिवलिंग आणि नंदी होता. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्याला हाळी देऊन काय कसे काय म्हणून विचारपूस करायची तिची पद्धत होती. घरात पुढच्या छोट्या खोलीत कोनाड्यात लाल वस्रावर देवाचे टाक होते. पुंजाबा सकडे म्हणजे आजोबा सकाळी गंधगोळी उगाळून देवपूजा करायचे. डोक्यावर आडवी टोपी. धोतर कुर्ता नाहीतर बंडी असा त्यांचा वेष असायचा. देवपूजा झाली की पांढरा गंध कपाळी लावून ते दगडी मूर्ती पाटा वरवंटा घडवायला बसायचे. आजी ऊसाच्या गुरहाळात कामाला जायची. मलाही बरोबर घेऊन जायची. मोठ्या कढाईत हात घालून गरमागरम गूळ खायला द्यायची. घरात काकवी असायची ती भाकरीबरोबर खायला द्यायची. एकदा फाटक उघडून मी खेळायला बाहेर पडलो तर माझ्या पायात मोठा काटा घुसला. माझं रडणं ऐकून आजी धावून आली. घाईघाईने काटा काढून रक्त वहात होते तिथे चूना भरला.

                      आजी कधी कधी जनार्दन पाटलाच्या वाड्यावरसुद्धा कधी कधी कामाला जायची. दत्तु मामा तेव्हा बहुतेक चौथीला असेल. त्याचे मराठी वाचनमाला पुस्तक चौथे मी हातात घेऊन आजीला खोटे खोटे वाचून दाखवायचो. आजी पाटी पेन्सिल द्यायची तेव्हा त्यावर शिवाजी महाराज, देव, देवीचे चित्र काढून दाखवायचो तेव्हा आजीला मोठे कौतुक वाटायचे. आई नगरसूलला गेली की आजीकडेच रहायची. दोघांच्या गप्पा गोष्टी चालायच्या. मध्येच आजीला मला चिडवून द्यायची लहर यायची. आईला मी ठेवून घेते तू एकटाच नाशिकला परत जा असे म्हटले की मला ते खरेच वाटायचे. मग मी भोकाड पसरुन द्यायचो. मला असे रडवायला तिला खूप आवडायचे. आई नगरसूलला आली की ती हमखास आमरस पुरणपोळीचा बेत करायची. घरची परिस्थिती जेमतेम असूनही लेक घरी आली की ती कुठूनतरी उसनवारी करुन हे सर्व करायची.

            आजीच्या घराला लागूनच मारुतीचे मंदिर होते. समोर खंडोबाचे देऊळ. देऊळासमोर चौथऱ्यावर दर शुक्रवारी बाजार भरायचा. त्या बाजारात मी हुंदडत राहायचो. आजी गुडीशेव भेळभत्ता घेऊन द्यायची. कधी कधी काडीला लावलेली गोल गुल्फी घेऊन द्यायची. पावसाळ्यात काही ठिकाणी गढूळ पाणी साचलेले असायचे त्यात आकाश दिसायचे तेव्हा मला आपण त्यात बुडू की काय अशी भिती वाटायची. एकदा पावसाळ्यात बहीण नगरसूलला आल्यावर आम्ही शेतावर मातीत पाय खूपसून खोप करुन खेळत होतो तेव्हा पावसाच्या सरी मातीवर पडून गंध दर्वळला तेव्हा अगदी आनंदून गेलो होतो.

            दांडी पौर्णिमेला खंडोबाची मोठी जत्रा भरायची. बारा गाडे ओढले जायचे. तेथील खंडोबाचे दर्शन मात्र आम्हाला दुसर्‍या दिवशी घ्यावे लागत कारण आमचे कुलदैवत म्हणजे वाकडीचा खंडोबा.

आजी कधी कधी मळ्यात घेऊन जायची तिथे निंबाची बिब्ब्याची घनदाट झाडी होती. आजी बिब्ब्याची गोड फळे वेचून खायला द्यायची.

          एकदा मळ्यात आईने आजीची मदतीने कारण केले होते तेव्हा मी बोकड्याचा बळी देताना पाहिले होते. का कुणास ठाऊक ती घटना माझ्या बालमनावर तेव्हा परिणाम करुन गेली. कुठल्याही जीवाची हिंसा वाईटच असे मनावर ठसून गेली. तेव्हा सगळे जेवले पण मी कशालाच शिवलो नाही.

         आजी तेव्हा भाकरी करुन जा गोपाबाबाला देऊन ये म्हणायची. असाच एकदा मी गोपाबाबाला भाकरी द्यायला गेलो तेव्हा ते उन्ह खात काठी घेऊन बसलेले होते. गोपाबाबा म्हणजे माझ्या वडीलांचे वडील म्हणजे माझे आजोबा. त्यांची नजर गेलेली होती. त्यांना डोळ्यांनी दिसायचे नाही. घ्या बाबा भाकरी घ्या असे म्हटल्यावर ते काठी उगारुन कोण कोण असे करायला लागले. त्यांच्या काठीचा एक फटका मला बसला तसा मी भाकर त्यांच्याकडे भिरकावून तसाच आजीकडे रडत रडत परत आलो. तेव्हा आजी गोपाबाबांकडे जाऊन म्हणाली तुमचा नातू भाकर देतो ते वळखू आले नाही का. तेव्हा आजोबांना पटले त्यांनी तसेच मला जवळ घेतले व चाचपडून कुठे लागले ते पहायला लागले. गावातील पोरं त्यांची चेष्टा करायचे त्रास द्यायचे त्यामुळे ते नेहमी काठी फिरवत राहायचे. अशा या एकेक आठवणी११/४/२०१८

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 19(9/4/2018)

 #आईच्या आठवणी

          आठवणी पाठलाग करीत असतात. आपण विसरु म्हणता विसरता येत नाही. अशीच एक विलक्षण आठवण. बहुधा ते १९६५ चे वर्ष असावे. अंकुश माझा बालमित्र. त्याच्याकडे मी नेहमी खेळायला जायचो. जत्रेत आई मला कचाकड्याची खेळणी घेऊन द्यायची. पंखा, रेडिओ, मोटारगाडी. ती खेळणी कधी एकदा अंकुशला दाखवतो असे होऊन जायचे. अंकुशला ती खेळणी दाखवली की त्याला आत काय आहे याची उत्सुकता असायची. मग तो पंखा रेडिओ मोटार खोलून पहायचा. आत काहिच नसायचे. घरी गेल्यावर आई बघायची मी खेळणी तोडून आणलेली. मग काय प्रसाद मिळायचाच. पुन्हा नवीन खेळणी घेतली की आधीचे काहीच लक्षात नसायचे. मी ती खेळणी घेऊन पुन्हा अंकुशकडे खेळायला जायचो. तो पुन्हा नेहमीप्रमाणे ती खोलून पहायचा. तेव्हा युद्ध चाललेले होते. शत्रूची विमाने घिरट्या घालायची. विमानांचा आवाज आला की आई मला घरी घेऊन जायची. त्यावेळी आम्ही ओट्यावर बसून याव करु त्याव करु अशी कल्पनेने लढाई रंगवत बसायचो. त्यांच्या घराच्या पलिकडे रस्ता ओलांडला की पलिकडे लहानेंचा वाडा होता. तेथील अंगणात गल करुन आम्ही गोट्या खेळायचो. तिथेच तुतीचे एक झाड होते. त्यावर चढून तुतीची लालचुटुक फळे खायचो. आमच्या आवाजाने झोपमोड झालेले घराबाहेर येऊन आमच्यावर ओरडायचे.

                  तिथेच जवळच एक प्रिंटींग प्रेस होता. तिथली जागा बालवाडी चालवण्यासाठी मालकाने एका शिक्षिकेला दिलेली होती. गल्लीतील मुलं तिथे जायला लागली होती. अंकुशही तिथे जायला लागला. मी खेळायला जायचो तर तो बालवाडीत असायचा. त्याचे पाहून मीही बालवाडीत जायला लागलो. शिक्षिका गोरीपान. लाल साडी असायची. लहान माझी बाहुली. मोठी तिची सावली. नकटे नाक उडविती असे म्हटले की ती नाकाला हात लावून दाखवायची. सगळी मुलं गलका करत ते गाणे पाठोपाठ म्हणायची. एकदा मला घरी जायचे म्हणून मी रडायला लागलो तर त्या शिक्षिकेने मला थांब म्हणून उचलून प्रिंटींग मशीनवर बसवले. त्यामुळे मी आणखीनच रडून आकांत केला.

           वडील तेव्हा मला कधी कधी शाळेत घेऊन जायचे. तिथल्या मुली मला पेरु द्यायच्या. गुरुजींचा मुलगा म्हणून माझे सर्व कौतुक करायचे. अंकुशला मी हे सर्व सांगायचो. मग तोही त्याचे वडील भिकुसा विडीच्या कारखान्यात त्याला कसे घेऊन जातात. तिथे तो किती मजा करतो ते रंगवून सांगायचा. एके दिवशी आम्ही वडिलांच्या शाळेत व नंतर कारखान्यात जायचा बेत आखला. दोघे एकमेकांच्या गळ्यात हात घालून अंदाजाने निघालो. खूप चालूनही वडिलांची शाळा येईना. मग अंकुश म्हणाला विडीच्या कारखान्यात जाऊ. मग मार्ग बदलून आम्ही पुन्हा अंदाजाने चालत राहिलो. पण कसचे काय. कारखानाही येईना. सगळी वेल्डिंगची कारखाने मशीद कोंबड्या गॅरेज असे ठिकाण लागले. घरी परत कसे जायचे तेही कळेना. आम्ही अगदी रडेवेले झालो. जवळ जवळ रडायलाच लागलो. एक मुसलमान म्हातारा होता. त्याने आम्हाला रडताना पाहिले. बच्चे भटक गये है असे तो काहीतरी म्हणाला. किसके बच्चे है असे तो करीत राहिला. आम्हाला काहीच सांगता येईना. त्याने मत रोओ मत रोओ करुन पापडी घेऊन दिली. आम्ही ती रडत रडतच खाल्ली.आम्हाला पापडी खाताना रवी भोईर यांनी सायकलवरुन जाताना पाहिले आणि सायकलवर बसवून घरी पंचवटीत आणले. इकडे तोपर्यंत अंकुशची आई बकुळामावशी व माझी आई यांच्यात कडाक्याचे भांडण झालेले होते. तुझ्याच मुलाने माझ्या मुलाला घेऊन गेला असे त्या दोघी एकमेकांना म्हणत एकदम हातघाईवर आल्या होत्या. बराच वेळ भांडण होऊन जिकडे तिकडे शांतता पसरली होती. आता या मुलांना कोठे शोधायचे असा दोघींनाही प्रश्न पडला होता. आई सायंकाळ झाल्याने स्वयंपाकाला लागली होती. तेवढ्यात रवी मामाने मला सायकलवरुन ओट्यावर उतरवले. मला पाहताच आई दाण दाण करीत आली. माझे बखोटे धरुन कोठे गेला होता तडफडायला म्हणून फडाफडा मारायलाच सुरवात केली. जाशील का परत अंकुशकडे म्हणून मला आणखीनच दणके ठेवायला लागली. पलिकडे बकुळा मावशीने पण माझ्या आईचे पाहून अंकुशलाही तसेच खडसावून कुटायला सुरुवात केली. वडील आले तेव्हा माझी आईच्या तावडीतून सुटका झाली. मोठा बाका प्रसंग होता. आज वाटते मारायला का होईना पण आई असायला हवी होती!9/4/2018

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 18(11/4/2018)

 #आईच्या आठवणी

             चंद कागजके तुकडोंपर बची है मा तेरी यादे.. सहज मी आईच्या तसबीरींचा शोध घेतो तेव्हा एक तिची मैत्रीण तारा मावशीबरोबर नाशिककर फोटो स्टुडिओत जाऊन काढलेली तसबीर, गोदाकिनारी जंबूसरची मलेटे कंपनी व मुठाळांची नलू, १९६९ मध्ये पं जवाहरलाल नेहरुंची रक्षा व फुले हेलिकॉप्टरने गोदावरी पात्रात वरुन टाकण्यात आली त्या गर्दीत असलेली, रामाचा रथ निघाला त्यावेळी गाडगे महाराज पटांगणात भरलेल्या जत्रेत बाबांबरोबर हौसेने काढलेली एवढ्या तसबीरी जपता आल्या. भोईरवाड्यात आजीच्या पुढील खोलीत कृष्ण धवल पणजोबा आजोबा यांच्या सह पोरसवदा एक आईची तसबीर होती पण जशी आजी गेली तशा जुन्या तसबीरी त्यांनी काढून टाकल्या होत्या त्यामुळे ती तसबीर काही मिळू शकली नाही.

         भोईरवाड्यातील आठवण आहे. तेव्हा आई वाळवणं करायला आजीच्या घरी जायची. घराच्या उंबरयावर उभी मोठी फळी ठेवून शेवया काढल्या जायच्या. मोठमोठी पितळी पातेले असायची. कुरडया उडदाचे पापड उडदाचे वडे. मोठी गडबड असायची. एकेक पाट उन्हात नेऊन ठेवायची कामगिरी आम्हा मुलांकडे असायची

        आई आजी मावशा पापड लाटायला बसायचे तेव्हा उडदाच्या लाट्या खायला मिळायच्या. मोठी गंमत वाटायची. वृंदा मावशी हंस अंडरसनच्या सुमती पायगावकरांनी मराठीत लिहिलेल्या परिकथेच्या पुस्तकातील छान छान चित्रे दाखवायची. आजीकडे चांदीचे रुपये होते ते कधी काढून दाखवायची. आजीच्या पुढील खोलीच्या ओट्याखाली कोंबड्यांचे खुराडे होते. कधी कधी आजी त्यातून अंडी काढायला सांगायची. त्यातील एक अंडे हळूच मी लाटेवाड्याजवळील पंजाब्याला नेऊन द्यायचो तेव्हा तो पंजाबी खुशीत चाराणे द्यायचा. त्या पैशात आखरावरील दुकानातून गोळ्या बिस्किटे घेऊन खायचो. ही चोरी आहे असे त्यावेळी कल्पनाही नव्हती. बटाट्यांचे वेफर्स जेव्हा आजीने केले मात्र आईने बटाट्याची भाजी केली तेव्हा मला आईचा खूप राग आला. फुगून मी जेवलोच नाही. एवढी चांगली भाजी झाली तरी मी जेवत का नाही म्हणून आईने मला विचारले तेव्हा म्हटले तू बटाट्याचे वेफर्स का नाही केले. वेफर्स फक्त उपवासाला खायचे असतात. रोज बटाट्याची भाजीच खायची असते असे नानापरीने समजावले पण मी रुसूनच बसलो. मग आईने बाजारातून भरपूर बटाटे आणले आणि वेफर्स केले तेव्हा माझे समाधान झाले

           आई जशी लाटण्याने बडवायची तशी हट्टही पुरवायची. पतंगांच्या दिवसात पतंग फिरकी मांजा घेऊन द्यायची. नागपंचमीला घरात झोके बांधून द्यायची.

        नगरसूलची आजी म्हणायची लेकीला मी किती त्रास देत असतो असं म्हणून मला चिडवून द्यायची व थांब तुझ्या आईला घेऊन जाते म्हणून मला घाबरावयाची.

        तेव्हा बजूदादा भोईर निवडणूकीत उभे राहिले तेव्हा आई प्रचार मिरवणूकीत घेऊन गेली होती. बिल्ले झेंडे वाटणे. मिरवणुकीत नारे देणे यात आई हिरीरीने सामील झाली होती. तो गजबजलेला काळ आठवतो. बजूदादा भोईर तेव्हा दांडपट्टा असे फिरवायचे की पहात रहावे. ते निवडून आले तेव्हा गुलाल उधळत मोठी मिरवणूक निघाली होती. आम्हा मुलांनाही तेव्हा भोईरवाड्यात दांडपट्टा लेझीम शिकवण्यात आले होते.

         नेताजी भोईर तेव्हा भोईरवाड्यात एकेक नाटकांची रंगीत तालीम घ्यायचे. लाल कंदिल, काळाच्या पडद्यातून, आमार सोनार बांगला अशी कितीतरी नाटके आम्ही मुलांनी तेव्हा पाहिली. नेताजी भोईर तेव्हा नाटक बसवायचे आणि स्पर्धेला घेऊन जायचे. स्पर्धेत मिळालेले कप आणि प्रमाणपत्र त्यांनी आपल्या खोलीत लावून ठेवलेले होते. नेताजी भोईरांना आम्ही दादामामा म्हणायचो. पास झालो की त्यांच्याकडे निकालपत्रक घेऊन जायचो तेव्हा ते प्रत्येकाला पेढे आणायला चार चाराणे द्यायचे. दुपारी ते खोलीत झोपायचे तेव्हा त्यांचे पायाची बोटे ओढण्याचे ते प्रत्येकाला पाच पाच पैसे द्यायचे. गणपतीच्या दिवसात भोईरवाड्यात गणपती करायचे. आम्हीही इवलेसे गणपती करुन पहायचो. एकदा दादामामांना शिवाजी महाराजांवरील नाटकाच्या वेळी स्टेजवर चक्कर आली होती. तेव्हा लक्षात आले की नाटक सुरु होण्यापूर्वी रंगदेवतेला नारळ फोडायचे राहून गेले म्हणून हा त्रास झाला. दादामामांचे बँडपथकही होते. तिथे रात्री नेहमी प्रॅक्टिस चालायची ती घरी ऐकू यायची.

           आई देव्हारयात छोटा गणपती बसवायची व गणपतीच्या मागे कागदाची उलगडून बसवायची रंगीबिरंगी महिरप सजवायची. फुलपात्रात किसलेले खोबरे व साखर असा प्रसाद करायची. विसर्जनासाठी गणपतीची मूर्ती ती भोईरवाड्यात देऊन टाकायची. तिथे ती ट्रकवर मोठ्या मूर्तींबरोबर मिरवत मिरवत गोदावरी पात्रात विसर्जित व्हायची. मोठा आनंदाचा तो काळ होता.११/४/२०१८

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 17(10/4/2018)

 #आईच्या आठवणी

       आठवणी व्याकुळही करुन टाकतात. मन आक्रंदायला लागते. डोळे एकसारखे भरुन येतात. काही केल्या पाणी खळत नाही. असाच तो कालावधी होता. गाणगापूरहून आतेमामा, आत्या, सावत्र भाऊ बहीण परतले.

         सुरुवातीला ते गोदावरी ओलांडायची नाही म्हणून मधल्या होळीत बुधा हलवाई आणि गोरख पान गादीच्या गल्लीत भाड्याने खोली घेऊन राहिले. आई डब्यात पीठ घेऊन त्यांना नेऊन द्यायची. बरोबर मीही असायचो. एके दिवशी ते लाटेवाड्यात परतले. आतेमामाने दाढी वाढवलेली होती. आत्या छातीतील कर्करोगाने ग्रासलेली होती. फार मायाळू. मी कधी आईबरोबर गाणगापूरला जायचो तेव्हा ती मायेने इलास हाक मारुन जवळ घेऊन डोक्याला तेल लावून द्यायची. मोठा सावत्र भाऊ मठात तिर्थ द्यायला होता. मठात भक्तांकडून मिळणारे पेढे नारळे घरी घेऊन यायचा. काही भक्त सोन्याची साखळी अंगठी द्यायचे ते त्याच्या गळ्यात बोटात असायचे. सकाळी आंघोळ करुन सोवळे नेसून तो मठात जायचा. मठाच्या देवडीवर पहाटेपासून चौघडा झडायचा.

            दगडी फरशांचे आवार होते. मठासमोर उंच मंडप होता. आत्या कधी कधी सायंकाळी आरतीला त्या मंडपावर चढून जायची व तरातरा खाली उतरायची. तेव्हा ती खाली पडेल की काय म्हणून फार भिती वाटायची. भाऊ मला उंच उचलून झरोक्यातून नृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका आणि त्रैमूर्तीचे दर्शन घडवायचा. मठा बाहेर तसबीरींची दुकाने होती. तिथे मी एकेक तसबीर निरखित हरखून जायचो. गुरुचरित्राच्या सुट्ट्या अध्यायांच्या पुस्तकांवर दत्तात्रेय महाराजांची चित्रे मनमोहक असायची. दुपारी सगळे बारा ते साडेबारा या दरम्यान माधुकरी मागायला निघायचे. घरोघर ओट्यावर माधुकरी मागायला आलेल्यांना शेंगदाणे गुळ भाजी पोळी वरण भात असे काही काही पदार्थ माधुकरी म्हणून वाडग्यात वाढायचे. पाच घरी माधुकरी मागितली की मिळेल त्यावर रहायचे असा नियम होता. घरी स्वयंपाक नव्हता. पहाटे उठून सर्व भीमा अमरजा संगमावर आंघोळीला जायचे. तिथे भस्माचा डोंगर होता. आई नेहमी तेथून घरी घेऊन जाण्यासाठी भस्म घ्यायची. वाटेत दत्तात्रेय महाराजांचा विश्रांती कट्टा लागायचा.

         मठात चंदन केसर कापूर यांचा दर्वळ असायचा. दर्शनाला आलेल्या सेवेकरयांच्या प्रदक्षिणा चालू असायच्या. आवारात गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले सेवेकरी असायचे. कधी मठातून दत्तात्रेय महाराजांची पालखी निघायची. मोठे अद्भुत वातावरण होते ते.

        आत्या घरी आली ती अंथरुणाला खिळूनच होती. एके दिवशी मी झोपेत असताना सगळ्यांचे रडण्याचे आवाज ऐकू आले. आत्या गेली होती. तिला हिरवे पातळ हिरवा चुडा तोंडात विडा असे अंगणात सजवून ठेवले तेव्हा सर्व हंबरडा फोडत होते. मला काहीच समजत नव्हते पण मीही गलबलून गेलो होतो. आतेमामा धायमोकलून रडत होते. सर्वच रडत होते. नंतर लक्षात आले की आत्या आता उठणार नाही. तिला चौघांनी खांद्यावर नेले तेव्हा आईने मला जवळ घट्ट धरुन ठेवले होते. मृत्यू म्हणजे काय हे कळत नसलेल्या वयात एवढ्या जवळून पाहिलेला तो पहिलाच मृत्यू होता. 

             आत्या गेल्यानंतर आतेमामा भाऊ बहीण आणि आम्ही एकत्र त्याच घरात राहू लागलो. मधेच कशावरुनतरी बिनसले. आईने सगळी पितळी भांडी कुंडी भोईरवाड्यात आजीच्या घरी नेऊन ठेवली. आम्ही त्या वाड्यातून निघून आजीकडे रहायलो गेलो. आई मग दिवसभर भाड्याची खोली शोधायला बाहेर जायची. चरण पादुका रोडला बोराडे यांच्या सीता स्मृती वाड्यात पहिल्या मजल्यावर एक खोली मिळाली. तीस रुपये महिना भाडे होते. तेथून मी श्रीराम विद्यालयात जायचो.

         एकाएकी आईला पोटात त्रास सुरु झाला. ती म्हणायची कोणीतरी पोटात शिंगं मारतय. अनेक ठिकाणी दाखवून झाले पण त्रास काही कमी होत नव्हता. राणा प्रताप चौकात एक धोबी होता. त्याच्या घरी ती जायची. तो काहीतरी उपचार करायचा पण गुण येत नव्हता. कोणीतरी सांगितले मेनरोडकडे विश्रामबागेत एक नाथपंथी आहे. तिथे गुण येईल. आई मला तिथे घेऊन जायला लागली. केशवपुरी गोसावी संसारी होते. नाशिकरोडला प्रेसमध्ये होते. गोसावी वाडीत त्यांचे घर होते. ते भक्तांसाठी विश्राम बागेत यायचे. छोटीसी खोली होती. धुनीजवळ देव्हारयात सप्तशृंगीची पितळी मूर्ती होती. ते बसायचे तिथे पाठीमागे त्यांच्या गुरुची तसबीर होती. तसबीरीत भगव्या वेशात दाढी वाढवलेले ते नाथपंथी साधू होते. केशवपुरी महाराज ब्रिस्टॉल सिगारेट ओढायचे. येणाऱ्या भक्तांना आयुर्वेदीक औषधे विनामोबदला द्यायचे. सप्तशतीचे पाठ करायचे. तेवढ्याशा खोलीत भिंतीवर सगळ्या देवदेवतांच्या तसबीरी लावून ठेवलेल्या होत्या. त्रिकाळ ते सर्व देवांना धूप अगरबत्ती करायचे. गुरुवारी भक्तांची गाऱ्हाणी ऐकून उपाय सांगायचे. त्यांच्या अंगात भगवे जाकीट आणि धोतर असा वेष असायचा. दाढी केलेली असायची. त्यांच्या कानावर दाट केस होते. त्यांच्या पायावर डोके ठेवायला आई सांगायची. वडीलही बरोबर असायचे. तेही त्यांच्या पायावर डोके ठेवायचे. एके दिवशी त्यांनी आम्हा सर्वांना अनुग्रह दिला. मला गुरुसाठी फळ सोडायला सांगितले तेव्हा मी म्हटले नारळ तेव्हा म्हणाले नारळ नको. मग तुला प्रसाद खाता येणार नाही. कसेबसे सगळी फळे आठवून शेवटी मी रामफळ सोडले. गुरुपौर्णिमेला गोसावी वाडीत त्यांचा मोठा उत्सव असायचा. त्या दिवशी ते सर्व जमलेल्या भक्तांना अध्यात्मिक उपदेश करायचे. मालपुव्याचा प्रसाद द्यायचे. तेव्हा मला गुरु म्हणजे काय ते तितकेसे कळत नव्हते. त्यांनी एकदा विचारले तू गुरु का केला. मी म्हटलं मला ब्रम्ह ज्ञान हवे. आईकडून ऐकलेला शब्द तेव्हा मी उच्चारला तेव्हा ते माझ्या लहान वयाकडे पाहून नुस्तेच हसले होते.

                   आईचा त्रास दिवसेंदिवस वाढत गेला. स्वयंपाकसुध्दा तिला करता यायचा नाही. मला शाळेत जायचे असायचे तेव्हा ती मला ताटात दूध पोहे साखर घालून द्यायची. कधी कधी वडील स्वयंपाक करायचे. नंतर नंतर ती गुडघ्यात डोके खुपसून बसायची. तिला होत असलेल्या त्रासाची कल्पना येत नसायची. चिडचिडेपणाही वाढला होता. एकदा मी स्काॅलरशीपला बसायला फीचे पैसे मागायला लागलो तर ती वैतागली. काही मिळायचे नाही पैसे. निबंधाच्या वह्यांनाही पैसे मिळेना. मला वर्गात तोंड दाखवायची लाज वाटू लागली. एके दिवशी आईचे व वडीलांचे कशावरुनतरी कडाक्याचे भांडण झाले. वडील मला घेऊन घराबाहेर रात्री एक सतरंजीची वळकटी घेऊन बाहेर पडले. जिना उतरुन आम्ही खाली ओट्यावर आलो. शेवग्याचे झाड होते. खरं तर वडीलांना रागाच्या भरात असताना मला घेऊन कुठेतरी दूर जायचे होते.

पण आम्ही रात्रभर डासांचा मारा सहन करीत शेवग्याखाली ओट्यावर सतरंजी अंथरुन आणि तिच थोडी अंगावर ओढून झोपलो पण आई काही जिना उतरुन खाली आली नाही कुठे गेले ते पहायला. आईला वडीलांचा स्वभाव माहित होता. कितीही भांडले तरी ते एकवेळ त्यावेळी घराबाहेर जातील पण घर सोडून जाणार नाही.

माझे सातवीचे वर्ष होते. घर सोडून गेलो तर माझ्या शिक्षणाचे काय असा वडीलांना प्रश्न पडला असावा. सकाळी पुन्हा जिना चढून आम्ही दरवाजा ठोठावला. आईने दरवाजा उघडला. म्हणाली फिटली का हौस. बोराडे आठवतात. पत्नी गेल्यानंतर एकटेच भाड्याने दिलेल्या खोल्यांची देखरेख करीत असायचे. रात्री दहाला लाईट बंद म्हणजे बंद असा त्यांचा दंडक होता. मेन स्वीच दहाला आॅफ करण्यापूर्वी ते सर्वत्र फिरुन जेवणं झाली का असे विचारायचे. त्यांची मुलगी आमच्या शेजारीच रहायची. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती. ते काही खायचे झाले की दोन्ही हातांनी लपवून खात. शेजारी एक शिक्षक होते. ते सदाचार चिंतामणी पुस्तक वाचत असायची. मलाही बोलावून वाचून दाखवायचे. अशा एकेक आठवणी.

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 16(10/4/2018)

 #आईच्या आठवणी

            सहानेवर चंदन उगाळावा तशा या आठवणी मनाच्या सहानेवर जो जो उगाळत जाव्या तसतसं मन त्या सुगंधात दर्वळायला लागते. मन प्रफुल्लित होऊन जाते. आई गव्हाळ वर्णाची होती. डोळे तपकिरी सुंदर होते. केसांचा अंबाडा बांधायची. नववारी नेसून अंबाड्यावरुन पदर घ्यायची. घरातील सर्व कामे आटोपली की कधी कधी ती मैत्रिणींबरोबर चित्रमंदिर मधुकर हेमलता टाॅकीजला सिनेमाला जायची. ब्लॅक अँड व्हाईट देवदेवतांचे राजेरजवाडीचे धार्मिक सिनेमे तिला आवडायचे. तेव्हा तिकीट दरही एक रुपया दोन रुपये तीन रुपये असे असायचे. कधी मला सिनेमाला घेऊन जायची तेव्हा सिनेमातील सैन्य घोडे जसे काही आपल्या अंगावर येत आहे का या भितीने मी घाबरुन जायचो आणि आईला अगदी बिलगून बसायचो. मी आईच्या मांडीवर असायचो त्यामुळे माझे तिकीट काढलेले नसायचे. अंधाराचीही मला प्रचंड भिती वाटायची. त्यामुळे मला घरात ठेवून बाहेरुन कडीकुलूप लाऊन आई सिनेमाला जायची. मला स्वयंपाक घरात काहीतरी नादी लावून अलगद जायची. दार उघडायचा मी प्रयत्न करायचो तेव्हा लक्षात यायचे की आई बाहेर गेलेली आहे. मीनाकुमारी आईची आवडती नटी होती. तिचे सिनेमे तिने कितीतरी पाहिले होते. कधी कधी ती म्हणायची तिचे जीवनही एक कादंबरीसारखे आहे.

          ती अशी सिनेमाला गेली की घरात कोंडलेला मी अस्वस्थ होऊन जायचो. स्वयंपाक घरात खांबाला टांगलेल्या ट्रान्झिस्टरकडे कडे पहात रहायचो. तो बंद असायचा. माझा हात पुरु नये म्हणून तो उंचावर टांगलेला असायचा. आईने ट्रान्झिस्टर आणला तेव्हा त्यात गाणारी बाई आत कुठे बसलेली आहे हे मी डोकावून डोकावून पाहिले होते तेव्हा मला अगदी नवल वाटले होते.

            मला आठवते तेव्हा हेमलता टाॅकीजमध्ये जय संतोषी माता सिनेमा लागलेला होता. तुफान गर्दी असायची. गल्लीतील बायका त्या सिनेमाला जायच्या. आई दर शुक्रवारी त्या सिनेमाला मला घेऊन जायची. सोळा शुक्रवारचे व्रत तिने केले होते. त्या दिवशी ती मला बाहेर खेळायलासुध्दा जाऊ द्यायची नाही. बाहेर जाऊन मी कुठेतरी आंबट खाईल अशी तिला भिती वाटत रहायची. सोळा शुक्रवार ती मनोभावे पोथी वाचायची आणि चण्याच्या भाजी पोळीचा संतोषी मातेला नैवेद्य दाखवायची. उद्यापनाला वडीलांच्या शाळेतील सर्व शिक्षक घरी आले होते. कोणी कडीचा डबा. कोणी ग्लास. कोणी ताट असे काही काही दिले होते. मी पंक्तीत वाढायची कामगिरी केली होती तेव्हा सर्वांनी माझ्या इवल्या हातांनी वाढण्याचे कोण कौतुक केले होते. आई नथ घालून सर्वांना जेवणाचा आग्रह करीत होती. पुढील देवघर तेव्हा अगदी गजबजून गेले होते.

         तेव्हा सिनेमाचे मोठमोठे पोस्टर हातगाड्यावर ठेवून रस्त्यावर स्पिकरवर ओरडून सिनेमाची जाहिरात केली जायची. कधी कधी टांग्यावर पोस्टर ठेवून आणि सिनेमाच्या गाण्याची घडी घातलेली रंगीत पुस्तिका फुकट वाटून आणि स्पिकरवर सिनेमातील गाणे वाजवून जाहिरात केली जायची. आम्ही पोरं ती पुस्तिका गलका करुन टांग्याच्या पाठीमागे पळून मिळवायचो.

         पोस्टरवरची चित्रे तेव्हा हाताने रंगवलेली असायची. भोईरवाड्यात मी आजीकडे जायचो तेव्हा तिथे वृंदा मावशीकडे फिल्मी संगित नावाचं गाण्याचे मासिक असायचे. त्यात तेव्हाच्या सिनेमातील सर्व गाणी असायची. आई घेऊन द्यायच्या खेळण्यांमध्ये मग छोटा कचकड्याच्या सिनेमा मला घेऊन द्यायची. तेव्हा मालविय चौकात एका दुकानात पाच पैशाला पाच याप्रमाणे कट केलेल्या फिल्म मिळायच्या. त्या मी आणून छोट्या सिनेमात त्या पहायचो. पहात असताना तेव्हाचे आवडलेले गाणे रिमझिम बरसका सावन होगा ते गुणगुणायचो तेव्हा सिनेमा पाहत असल्यासारखा भास व्हायचा. असे ते रंगीत दिवस होते.10/4 /2018

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 15(8/4/2018)

 #आईच्या आठवणी

            एकाएकी आभाळ भरुन यावे तशा या आठवणी. गेलेले दिवस पुन्हा मनात परतून येतात आणि चिंब चिंब भिजवून टाकतात. अगदी अबोध मन होते तेव्हाच्या आठवणीही तरळून जातात. एक आठवण अजूनही सारखी अस्वस्थ करीत राहते. पंचवटीत तेव्हा घोटकरांच्या घराच्या ओट्यावर वडील मला कुशीत घेऊन झोपायचे. आत खोलीत आई झोपायची. मला लवकर झोप लागत नसायची. मग मी मंद रस्त्यावरील बल्बच्या उजेडात हलणारया निंबाच्या पानांकडे पहात कितीतरी वेळ जागाच रहायचो. एकदा त्या निंबाच्या पानाच्या हालचालीत एक बाई सज्जात हातात ताट घेऊन काहीतरी निवडत असल्यासारखा भास झाला. बल्बचा उजेड त्या पानांवर पडलेला अगदी अद्भुत होता. एकामागून एक चित्र सरकावे तसे मी त्या हलणारया पानांमधून ती बाई अंगण झाडत आहे. पाणी भरुन ठेवत आहे अशा चित्रभासात हरवून गेलो. कदाचित उघड्या डोळ्यांना दिसलेले ते एक स्वप्नही असावे. मला नेहमी प्रश्न पडतो की काहीच कळत नव्हते त्या वयात नेमके ते भास काय असावे कळत नाही.

         समोरच बोळीत उंच पार करुन उंबराचे झाड होते. तिला लागून असलेल्या खोलीत एक फेरीवाला रहायचा. एका काठीला खेळणी चष्मे पिपाण्या भिरभिरे शिट्ट्या लावून तो दिवसभर ती विकायचा. एकदा आम्ही सारया लहान पोरांनी त्याच्या खोलीत डोकावून पाहिले तर कोपर्‍यात खेळण्याची काठी उभी करुन तो परातीत शेव कुरमुरे आणि दोन बुंदीचे लाडू घेऊन सावकाश खात होता. एकटाच होता. घरी दुसरे कोणीही नव्हते. कदाचित तेच त्याचे जेवण असावे. तिथल्या उंबराच्या पारावर आम्ही पोरं किती धुडगूस घालायचो पण तो जराही रागवायचा नाही.

          घोटकरांच्या घरातील तेव्हाची ती खोली अंधारी होती. आत चुलीच्या जाळात स्वयंपाक करीत असलेली आई रस्त्यावरुनही सहज दिसायची. माझ्या पाठीवर एक भाऊ होता मला. त्याला घेऊन आई बाजेवर पहुडलेली असायची आणि मी बाजेला टेकून ताटात वाढून दिलेला दूध भात वेचून वेचून खात असायचो. नंतर तो भाऊ रात्री एकाएकी गेला.

            तेव्हा सार्वजनिक नळावरुन वडील हंडे भरभरुन आणायचे तेव्हा मी झोपेत असायचो. पण त्यांच्या पायांची धाप धाप मला झोपेत ऐकू यायची.त्याच नळावर आम्ही पोरं घसरगुंडी खेळायचो. जवळच शामराव यांचे घर होते. ते सायंकाळी दारु पिऊनच घरी यायचे आणि ओसरीवर बराचवेळ एकटेच कोणालातरी शिव्या देत रहायचे. 

            सकाळीच एक नाथपंथी अल्लख निरंजन म्हणत यायचा. त्याच्या कमरेला सोडलेल्या एका घुंगराचा हेलकाव्याने निघणारा नाद अजून माझ्या स्मरणात आहे.

           बहुधा तेव्हा कुंभमेळा असावा. तेव्हा एक साधू घरी आला होता. वडिलांच्या भालप्रदेशावरील रेषा पाहून त्याने वडिल खूप भाग्यशाली असल्याचे उद्गार काढले होते असे मला आठवते. घराच्या पाठीमागे तारा मावशी माझ्या आईची जिवलग मैत्रीण रहायची. ती नेहमी घरी जिलेबी तळायची व मला हाक मारुन जिलेब्या खायला द्यायची. एकदा वडीलांनी माझ्यासाठी जव जवान ड्रेस आणला होता. तो घालून मी ओट्यावर कितीतरी वेळ स्टाईलमध्ये हुंदडत राहिलो. गल्लीत घरोघरी जाऊन मिरवून आलो होतो मला आठवते.

           समोरच्या बोळीत छत्रे कंपनी रहायची . चेहऱ्यावर रबराचा मास्क चढवून भो करुन ते मला एकसारखे गंमतीने घाबरवत रहायचे. एकदा तर दक्षिणेकडून उगवलेल्या लालसर चंद्राकडे बोट दाखवून तो बघ आला तुला खायला म्हणून घाबरवले तेव्हा मी धूम ठोकून आईकडे आलो होतो तेव्हा आईने त्यांना चांगलेच दटावले होते. त्याच घरात नगरसूलच्या सकडे आजीने मला बाहेरील मोरीत पायांवर पालथे पाडून तेल लावून चोळून चोळून आंघोळ घातलेली होती. कितीतरी आठवणी मनात गर्दी करतात.8/4/2018

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 14(8/4/2018)

 #आईच्या आठवणी

      आईची आठवण काढता काढता आपल्या आयुष्याचा पट उलगडत चाललाय. खूप दिवसात न उघडलेला फोटो अल्बम चाळायला घ्यावा तसे झाले आहे. एकेक फोटो पाहताना जसे एकेक घटना आठवत जावी तसे होत आहे. आई दिवाळीला मला घेऊन नंदूरबारला जायची. तेथे एका वाड्यात भाड्याच्या खोलीत वारी आजी शरद मुरलीधर व शिवाजी मामा रहायचे. शिवाजी मामा तेव्हा बहुतेक चौथीला होता. सकाळी सायकलवर घरोघरी पाव विकायचा. वारी आजी धुणीभांडीची कामे करायची. घरी येताना पदराखाली झाकून मालकिनीने दिलेले वरण भात भाजी पोळी आणायची. आई सांगायची. आजी ज्या घराण्यात दिली ते श्रीमंत घराणे होते. नारायण लक्ष्मणराव शेळके म्हणजे माझे आजोबा त्यांना सगळे अप्पा म्हणायचे. अप्पा गेल्यानंतर तेथे शेतीत शेण उचलायचे काम आजीला अपमानास्पद वाटल्याने ती मुलांना घेऊन नंदूरबारला पळून आली होती.

           नंदूरबारला भाड्याची छोटी खोली होती. उन्हाळ्यात एके रात्री सगळे गरम होते म्हणून दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. शरदमामा उंबरयावर उशी ठेवून झोपला होता. सगळे गाढ झोपेत असताना कधी चोर घरात शिरले आणि त्यांनी अलगद घरातले सगळे सामान लंपास केले कोणाला कळले सुद्धा नाही. सकाळी सगळे उठून पाहतो तर पिण्याच्या पाणाचा माठ सुद्धा नाही. प्रातर्विधीला जायला डबा नाही. आंघोळीला पातेले नाही. घराच्या ओट्याखाली पाण्याचा नळ होता. तिथेच मग सगळ्यांनी हातपाय तोंड धुतले. नव्याने मग एकेक वस्तु आणून वारी आजीने पुन्हा छोटासा संसार उभारला. दिवाळीच्या दिवसात आजी रहायची त्या गल्लीत सर्वत्र शेणाचा सडा सारवण असायचे त्यामुळे वातावरणात तोच दर्वळ असायचा. आजी व आई धुणे धुवायला तापी नदीच्या काठी जायचे. तिथल्या एका खडकावर मी नदीच्या लाटा पहात उभा रहायचो तर असा भास व्हायचा की मी उभा असलेला खडक पाण्यातून लाटा कापत पुढे पुढे चालला आहे. मोठी मौज वाटायची. तिथेच एक मारुतीचे मंदिर होते. गल्लीत फटाके फुटत रहायचे आणि रस्ता कपट्यांनी भरलेला असायचा व जळालेल्या दारुचा वास येत रहायचा. मुरलीधर मामा मला बाजारातून बंदूक आणि टिकल्यांची पाकिटे घेऊन द्यायचा.

               आजी रहायची त्याच्या शेजारीच वयस्क आजोबा होते. ते टॅक्सी चालवायचे. मी हळूच डोकावून ते काय करतात ते पहायचो तर ते चहाच्या कपात लालसर तपकीरी पेय पित बसायचे. त्यांचे डोळे तारवटलेले लाल झालेले असायचे. मला का कोणास ठाऊक पण त्यांची भिती वाटायची. आईपण दम द्यायची तिथे जाऊ नको म्हणून पण मी आईचा डोळा चुकवून हळूच तिथे डोकवत रहायचो. त्या आजोबांनी मला डोकावताना बघितले व प्यायचे थांबवून आत ये म्हणाले. काय आहे चहा आहे का म्हणून मी जिज्ञासेपोटी कपाकडे बोट दाखवून विचारले तर ते हसत म्हणाले की तुला प्यायचे का. मी मान हलवली. त्यांनी दुसऱ्या कपात बाटलीतून काहीतरी ओतले. तेवढ्यात आईची हाक आली 'विलास' मी तिथूनच ओ दिली. नंतर लक्षात आले की आपल्याला इथे यायला आईने सांगितले नव्हते. आता आईचा मार बसून माझी लटलट सुरु झाली. आईच्या हाका सुरुच होत्या. मी कसाबसा घाईघाईने तिथून जायला लागलो तर माझा तोल जाऊन मी खाली नळ होता त्या दगडी चौकात जाऊन पडलो. डोक्याला नळ लागून चांगली खोक पडली. रक्त यायला लागले. तेवढ्यातही आईने चांगलेच कुथलून काढले. एक दिवस सुखाचे खाऊ देत नाही. काहीतरी रोज डोक्याला ताप करुन ठेवतो. सांगितले होते ना जाऊ नको तिथे. का गेलास तिथे म्हणून ती मला दणक्यावर दणके ठेवत होते. मामा कंपनी धावून आली. आजोबाही बाहेर येऊन त्यांनी आईला विनवले. माझे रडणे सुरुच होते. कसेबसे खोक पडली तिथे आजीने हळद दाबली. मोठा बाका प्रसंग उभा राहिला होता. आज अगदी जसाच्या तसा आठवतो.8/4/2018

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 13(7/4/2018)

 #आईच्या आठवणी

             आठवणी एवढ्या सुंदर आणि सुगंधी असू शकतात हे मला आज इतक्या वर्षांनी उमगले. १९६७ ते १९७४ चा तो कालखंड एकेक गंमती जमतीने भरलेला होता. सुरवातीला घोटकरांच्या घरात मग आतेमामा आत्याला घेऊन गाणगापूरला गेले तेव्हा लाटेवाड्यातील त्यांचे घर ते गाणगापूरहून परत येईपर्यंत रहायले दिले होते. पुढील खोलीत त्यांचेच देवघर होते. आई सकाळ संध्याकाळ तेथे दिवा लावायची. दत्ताची नृसिंह सरस्वती यांची मोठी तसबीर व पुढे चंदनी पादुका मोठा शंख आणि घंटी असा कोपर्‍यात देव्हारा होता.

             याखेरीज एकमुखी दत्ताच्या किंवा देवमामलेदार यशवंतराव यांच्या यात्रेत मातीची रंगीत दत्ताची मूर्ती आई घेऊन द्यायची तिची खोटी खोटी पुजा मी वेगळ्याच खणात खिडकीजवळ मांडायचो. ते वेगळेच. सगळे घरच दत्तभक्तीत होते. 

           आईने मधल्या अंधारया खोलीत वर उंचावरल्या कोनाड्यात आपले देव ठेवलेले होते. तिथे ती सकाळ संध्याकाळ तुपाची निरंजनी लावायची. मला देव काही दिसायचे नाही पण निरंजनाचा उजेड तेवढा दिसायचा. आई दोन्हीकडे हात जोडायला सांगायची. सायंकाळी ती नेहमी कुठलेतरी गाणे गुणगुणत रहायची.

           पुढील देवघर आणि मधली अंधारी खोली यांच्यात एक जिना होता. त्या पायर्‍यांवरुन मी खेळून आलो की दबकत दबकत वर येऊन बाबा आले आहे की नाही याचा अंदाज घ्यायचो. बाबांचा बराच वेळ आवाज आला नाही की तसाच खाली उतरुन पुन्हा अंगणातील गोल दगडावर बसून सायंकाळी बाबांची वाट पहात वर आकाशाकडे नजर लावून बसत असत. पावसाळ्यात आकाशाचे बदलते रंग पाहता पाहता त्या रंगात मी हरवून जायचो. ढगांवर पडलेल्या मावळत्या किरणांनी जणूकाही एक रस्ता आणि त्यावरुन बाबा पिशवी घेऊन येत आहेत असा मला भास व्हायचा.

         बाबा घरात आल्याशिवाय मी घरात जात नसे कारण ते घरात असले की आईला मला मारता यायचे नाही. तरी देखील मारलेच तर बाबा विनवायचे पमा नको मारत जाऊ पोराला.

         आई मला मारायचे म्हणून मारत नव्हती. एकूण सगळ्या परिस्थितीचा संताप ती माझ्यावर काढायची. नंतर तिचा तिलाच पश्चाताप व्हायचा आणि मग ती जवळ घेऊन कुरवाळत रहायची. कोणी म्हणायचे तिला गरका येतो. पण तसे नव्हते. स्वतःचं घर असावे असे तिला नेहमी वाटायचे. एक महंत उत्तर प्रदेशात जायला निघाला तेव्हा त्याने त्याची पंचवटीतील गजानन चौकातील जागा विकायला काढली होती. अवघ्या ३०० रुपयात. आईने पोटाला चिमटे काढून थोडे थोडे करुन तेवढे पैसे गुपचूप गाडग्यात वडीलांच्या नकळत जमवलेही होते. आईने ती जागा घ्यायचा विषय बाबांकडे काढला तेव्हा वडिलांना त्या बचतीबद्दल कळले.

         नेमके त्याचवेळी आत्याने बाबांकडे हट्ट धरला एक सायकल घेऊन द्या. आतेमामा तेव्हा बांधकामाच्या कामासाठी काम मिळेल तिथे जायचे. त्यांना कामावर जाण्यासाठी सायकल लागत होती. झालं बाबांनी आईकडून ३०० रुपये घेऊन बहिणीकरिता आतेमामाला सायकल घेऊन दिली आणि ती जागा हातची गेली. आतेमामा नेहमी म्हणायचे मास्तर मागच्या बाजूला खोल्या बांधायच्या आहेत त्यातली एक खोली तुम्हाला. वडीलही त्या भरवशावर तिथेच लाटेवाड्यात राहिले पण ते बांधकामही झाले नाही आणि खोली मिळणे तर दूरच. 

पण ते घर आजही माझ्या मनात आहे. एकदा मी दुपारी झोपेतून उठलो तर खिडकीत संध्याप्रकाश दाटलेला. मला वाटले सकाळ झाली म्हणून मी शाळेत जायचे म्हणून तयारी करायला लागलो तर आई म्हणे आता कुठे शाळा आहे. शाळा उद्या आहे. आणि खरेच थोड्यावेळाने अंधारले व रात्र झाली.

          स्वयंपाक घरात बारदान व फळ्यांचे पार्टीशन होते. पलिकडे कंदिलाच्या उजेडात सायंकाळी इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे, देवाचे घर बाई उंचावरी अशी कविता ऐकू यायची.

           लाटेवाड्याला उत्तरेकडे एक चिंचोळी बोळ होती. त्या बोळीतून भोईरवाड्याकडे जाणे येणे व्हायचे. एकदा तर गंमतच झाली. येण्याजाण्याच्या वाटेवर एक बकरी रवंथ करीत बसली होती. मी लहान. पलिकडे कसे जायचे या विवंचनेत पडलो. तिच्यावरुन टांग टाकून जायला लागलो तर ती धडपडत उभी राहिली आणि मी पडलो दातावर. पुढचा दात खालच्या ओठातच शिरला. मग रडारड. हळद जखमेत भरणे असे सगळे झाले. तिथेच रखमा व त्याची मंडळी रहायची. दोघेही विठ्ठल भक्त. घरची गरिबी. दिवाळीला विठ्ठलाच्या फोटोपुढे फक्त एक पणती लावायचे. रखमा मग कोरे धोतर कुर्ता घालून वर टोपी चढवून बुक्का कपाळी लावून सकाळीच घरोघरी जाऊन काय कसे काय चालले विचारायचा. तिथे दिलेला बशीभर फराळ तारीफ करीत चाखायचा. अशा रितीने त्यांची दिवाळी व्हायची. त्यावेळी उन्हाळ्यात घरोघरी सातुचे पीठ गुळात मिसळून चाटून खायचे. असे सगळे आठवते.७/४/२०१८

@विलास आनंदा कुडके 

आईच्या आठवणी 12(6/4/2018)

 #आईच्या आठवणी 

            मला लहानपणापासून खिडकीचे आकर्षण आहे. लाटेवाड्यात माझे बरेचसे बालपण पहिल्या मजल्यावरील आतेमामाच्या घरात गेले. पुढे उतरत्या कौलारु छताखाली छोटे स्वयंपाक घर. मध्ये अंधारी आयताकार खोली. जिना. पलिकडे देवघर. स्वयंपाक घरात छोटी गजांची खिडकी होती आणि उभे राहता येईल अशी भिंतीच्या जाडीइतकी जागाही होती. या खिडकीचे वैशिष्ट्य म्हणजे या खिडकीत मी शिरुन गजांना घट्ट धरले की आईला बाहेर खेचताही यायचे नाही. या खिडकीतून सकाळी मस्त उन्हाची तिरीप आत यायची आणि कोपर्‍यात ठेवलेल्या पितळी पंचपात्रीवर पडायची. त्या उजेडात सारवलेल्या जमीनीवर बसायला व मराठी वाचनमाला पुस्तक पहिले यातील रंगीत धडे कविता चाळताना मी रंगून जायचो. आई मला त्यातील एकेक धडा कविता वाचून दाखवायची. वडिल शाळेत गेले की मी खिडकीत उभा राहून उन्हाच्या सरकत्या सावल्या निरखित त्यांची वाट पहात बसायचो. खाली गोठा होता. गाईगुरांच्या गळ्यातील घंट्यांची नाजूक किणकिण ऐकत बसायचो. समोरच पिंपळाचे झाड होते. त्याच्या पानांची सळसळ ऐकत बसायचो. पिंपळाखाली कधी कधी सारे सवंगडी गोळ्या बिस्किटे भुगा करुन खोटे खोटे जेवण करायचो. नागपंचमीला त्याच पिंपळाला मोठ्ठा झोका बांधला जायचा आणि आळीपाळीने झोके खेळले जायचे. मला मात्र त्या उंचावर बांधलेल्या झोक्याची खूप भिती वाटायची. मग आई देवघरात छोटा सायकलच्या ट्युबचा नाहीतर दोरीचा छोटा झोका बांधून द्यायची.

          खिडकीत बसले की आत समोरच  आई सकाळी छोट्या ओट्यावर स्वयंपाक करीत असलेली दिसायची. मधूनच चुलीतून धूर उठला की फुंकणीतून आईचा फूँ फूँ आवाज ऐकू यायचा. पुढे दुसरी तिसरीला गेल्यावर कित्तावही, बोरु आणि दौत घरी आली. एकेक अक्षर गिरवून काढायला वडील शिकवायचे. एकदा काय झाले आईने छानपैकी घर सारवलेले होते. ती कुठेतरी बाजारात गेली होती. वडील शाळेत गेलेले होते. मी खिडकीशी बसून मराठी वाचनमाला पुस्तक पहिले चाळत बसलो होतो. माझा चुकून धक्का दौतीला लागला आणि सारवलेल्या जमीनीवर शाई सांडली. मोठा ठळक निळा डाग पडला. काय करावे सुचेनासे झाले. आईचा मार खावा लागेल या विचारानं माझ्या पोटात गोळा आला. अचानक माझे लक्ष स्वयंपाक घरात मांडणीतील पितळी भांड्यांच्या रांगेत 'गृहलक्ष्मी' या कपबशांच्या घराला लटकवलेल्या उलथनीकडे गेली. ती उलथनी काढून ते शाईचे डाग घासून काढले.डाग दिसेनासे झाले पण सारवलेल्या जमीनीवर उलथनी घासण्याच्या खुणा तशाच होत्या. आई बाजारातून आली. मी त्या खराब झालेल्या जागेवरच फतकल मारुन बसून राहिलो. पोरगं जागचं उठत का नाही म्हणून आईला शंका आली. उलथनीही जागेवर दिसत नव्हती. अरे इथे उलथनी होती, कुठे गेली म्हणून मला विचारले तर मी एक नाही आणि दोन नाही. शेवटी तो प्रकार आईच्या लक्षात आलाच. मग काय तिचे आवडते शस्त्र म्हणजे लाटणे. त्या लाटण्यानेच तिने माझा खरपूस समाचार घेतला.तेव्हापासून माझा आणि लाटण्याचा घनिष्ठ संबंध निर्माण झाला. कधी कधी तर आईने मारुन फेकलेल्या लाटण्याला मला चुकविण्याचा प्रसंग यायचा. मग तर आई भयंकर चिडायची आणि लाथाबुक्क्यांनी आणखी मारायची. पुढील स्वयंपाक घर आणि मधली अंधारी खोली यांच्यात एकच बल्ब होता. अंधारया खोलीत मधल्या दाराजवळ कोनाड्यात देव होते. तिथे आई संध्याकाळी निरंजन लावायची आणि काहीतरी गुणगुणत रचून ठेवलेल्या लाकडांतून लाकडे निवडून स्वयंपाकाला लागायची.आंब्यांच्या हंगामात वडील भरपूर रसाचे आंबे घरी आणायचे. मग आई खिडकीशी एकेक आंबा मोठ्या पातेल्यात पिळून रस करायची. त्यावेळी एकूणएक साल व कोय मला चाखायला मिळायची.

            मधल्या अंधारया खोलीत दाराजवळ उंचावर एक कोनाडे होते. वडिलांनी त्यात खूप पुस्तके ठेवलेली होती. मला त्यावेळी वाचता येत नसले तरी पुस्तकांतील रंगीबिरंगी चित्रे पहायला मला फार आवडायचे. मग मांडणीतून एकेक डबा काढून डब्यावर डबा रचून त्यावर चढून मी एकेक पुस्तक काढून पाहायचो. पण त्या पुस्तकांमध्ये चित्रे नसायची. नंतर वडिलांकडून कळले की त्यात परशुरामाच्या लावण्या अशी काही काही पुस्तके होती. गल्लीत एका टपरीवर गोष्टींची पुस्तके पाच पैसे देऊन वाचायला मिळायची. हिमगौरी आणि सात बुटके, बुटका जादुगर अशी छोटी छोटी गोष्टींची पुस्तके मी खाऊच्या पैशातून आणून वाचायचो. पहिली दुसरीला आम्हाला पुस्तकात काळी पांढरी चित्रे असायची. फक्त पहिलीच्या पुस्तकात रंगीबिरंगी चित्रे होती. वाघसिंह सर्व प्राणी एकत्र जमलेली असे एक रंगीत चित्र होते. तिसरीला गेलो तेव्हा बालभारतीची रंगीत पुस्तके आली तेव्हा आम्ही एकमेकांच्या पुस्तकातील एकसारखी रंगीत चित्रे पहात बसायचो.

        तेव्हाचे ते विश्वच वेगळे होते. त्या विश्वात आईचा धाक होता. वडीलांची शाळेतून येण्याची वाट पाहणे होते. सवंगड्यांबरोबर खेळणे हुदडणे होते.. अतिशय गोड असा तो काळ होता.६/४/२०१८

@विलास आनंदा कुडके 

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...